Ford Investment in India: अमेरिकेमधील ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोर्ड पुन्हा एकदा भारतात उत्पादन सुरू करण्यास इच्छुक आहे. कंपनीकडून जवळपास ३,२५० कोटींची गुंतवणूक भारतात केली जाणार आहे. या कारखान्यात नवीन इंजिन बनविण्याचा फोर्डचा मानस आहे. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीकडून तमिळनाडूमधील मराइमलाई नगर येथील कारखाना अद्ययावत केला जाणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक इन अमेरिकेचा नारा देत अमेरिकेतच उत्पादन वाढीसाठी दबाव टाकला असतानाही फोर्डकडून भारताला प्राधान्य देण्यात येत आहे.
ब्लूमबर्गने सूत्रांच्या माहितीने दिलेल्या वृत्तानुसार, फोर्डकडून या गुंतवणुकीची अधिकृत घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
४ वर्षांपूर्वी भारतातून घेतली होती माघार
फोर्ड कंपनीने १९९५ मध्ये चेन्नई जवळ आपला पहिला कारखाना थाटला होता. २०१५ साली गुजरातच्या साणंद येथे दुसरा प्लांट सुरू करण्यात आला होता. २०२० साली जिम फर्ले फोर्डचे सीईओ झाल्यानंतर त्यांनी महिंद्रा अँड महिंद्राशसी असलेला भागीदारी करार रद्द केला. त्यानंतर त्यांनी एका वर्षात भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
ज्या बाजारपेठेत नफा होत नाही किंवा नुकसान अधिक होत आहे, अशा देशातून बाहेर पडण्याचा निर्णय फोर्डने घेतला होता. या धोरणाअंतर्गत फोर्डने भारत आणि ब्राझीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच साणंद येथील प्लांट फोर्डने टाटा मोटर्स कंपनीला विकला. याठिकाणी आता टाटाकडून इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाते.
ट्रम्प यांचा दबाव झुगारला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पद सांभाळल्यानंतर मेक अमेरिका ग्रेट अगेन अभियान हाती घेतले. या अभियानाअंतर्गत अमेरिकन कंपन्यांना अमेरिकेतच गुंतवणूक करण्याचा दबाव ट्रम्प यांच्याकडून टाकला जात आहे. तसेच दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवरही ट्रम्प यांनी आयातशुल्क लादले आहे. भारतावरही ५० टक्के आयातशुल्क लादण्यात आले आहे.
भारतावर आयातशुल्क (टॅरिफ) लादलेले असतानाही फोर्ड कंपनीने भारतात पुन्हा एकदा मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्षाला २ लाख इंजिन उत्पादित करण्याचे उद्दिष्ट
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, तमिळनाडूमधील कारखान्यातून वर्षाला २ लाख इंजिन बनविण्याचे उद्दिष्ट फोर्डने ठेवले आहे. या इंजिनांची निर्यात केली केली जाईल. काही दिवसांत याबद्दल कंपनीकडून अधिकृत आणि सविस्तर माहिती प्रसिद्ध होईल. मात्र सध्यातरी फोर्डकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
