US Tariffs Effect On Gold Rate Today: वाढती आर्थिक अस्थिरता, जागतिक व्यापार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घोषित करत असलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, भारतातील सोन्याच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आज, ७ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम १०,२५५ रुपये, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ९,४०० रुपये आणि १८ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ७,६९१ रुपये असा सोन्याचा भाव आहे. म्हणजेच एक तोळा २४ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना एक लाखांहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत.
आज भारतात २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅम सोन्याच्या किमती पाहता, तेव्हा हे स्पष्ट होते की किंमत आणि सोन्याची शुद्धता यांचा थेट संबंध असतो.
सर्वात महाग सोने २४ कॅरेट सोने आहे, ज्याची किंमत प्रति ग्रॅम १०,२५५ रुपये आहे. ते बहुतेकदा गुंतवणुकीसाठी वापरले जाते. २२ कॅरेट सोने, ज्याची किंमत प्रति ग्रॅम ९,४०० रुपये आहे, आणि १८ कॅरेट सोने, ज्याची किंमत प्रति ग्रॅम ७,६९१ रुपये आहे, ते बहुतेकदा दागिन्यांमध्ये वापरले जाते.
सोन्याच्या किमती वाढण्याची कारणे
साठेबाज, म्हणजेच घाऊक व्यापारी, सतत सोने खरेदी करत असतात. बाजारात मागणी वाढली की किमतीही वाढतात. याशिवाय, आर्थिक परिस्थितीत अनिश्चितता जाणवत असल्याने लोकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे किमतीही वाढल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशाऱ्यामुळे भीतीचे वातावरण
आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही घटनांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधे आणि चिप्सवर नवीन टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण नवीन टॅरिफ अर्थव्यवस्थेवर दबाव आणू शकतात. जेव्हा जेव्हा अशी अस्थिरता येते, तेव्हा लोक सोने सुरक्षित गुंतवणूक मानून खरेदी करतात, ज्यामुळे त्याची किंमत वाढते. यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली.
भारतात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, आयात शुल्क, कर, रुपया आणि डॉलरमधील विनिमय दर, मागणी आणि पुरवठ्याचा समतोल या आधारावर सोन्याची किंमत ठरवली जाते. भारतात सोन्याचा वापर केवळ गुंतवणुकीसाठीच नाही, तर पारंपरिकपणे लग्न आणि सणांमध्ये देखील केला जातो. त्यामुळे किंमतीतील बदलाचा थेट परिणाम लोकांवर होतो.