Who Is Kushal Pal Singh: फोर्ब्सने जुलै २०२५ पर्यंतच्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील बलाढ्य उद्योगपतींचा समावेश आहे. हे अब्जाधीश उद्योगपती ऊर्जा, तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि औषधनिर्माण यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यादीत वर्चस्व गाजवले आहे, तर गौतम अदानी यांनी बाजारातील अस्थिरता असूनही दुसरे स्थान कायम ठेवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, सावित्री जिंदाल या अव्वल १० भारतीय श्रीमंतांमध्ये असलेल्या एकमेव महिला आहेत. तर रिअल इस्टेट क्षेत्रातील अनुभवी उद्योजक कुशल पाल सिंह यांनी या वर्षी पुन्हा एकदा अव्वल १० श्रीमंत भारतीयांच्या यादीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, या यादीत अनेक उद्योगपती सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असतात. पण श्रीमंतांच्या यादीत पुन्हा प्रवेश मिळवणाऱ्या डीएलएफच्या कुशल पाल सिंह यांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
कुशल पाल सिंह हे डीएलएफ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी त्यांचे सासरे चौधरी राघवेंद्र सिंह यांनी स्थापन केली होती. गुरुग्राममध्ये अंदाजे १०,२५५ एकर जमीन असून, सुमारे ३,००० एकर जमिनीवर त्यांनी डीएलएफ सिटीची स्थापना केली आहे.
कोण आहेत कुशल पाल सिंह?
१५ नोव्हेंबर १९३१ रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे जन्मलेल्या कुशल पाल सिंह यांचे वडील एक प्रसिद्ध वकील होते. कुशल पाल सिंह यांचे लग्न राघवेंद्र सिंह यांची मुलगी इंदिरा सिंह यांच्याशी झाले आहे. ते डीएलएफ लिमिटेडचे संस्थापक आहेत. कुशल पाल सिंह यांना राजीव सिंह नावाचा मुलगा आणि पिया सिंह व रेणुका तलवार अशा दोन मुली आहेत.
भारतीय सैन्यात निवड
कुशल पाल सिंह यांनी मेरठ कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी युकेमध्ये वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ब्रिटिश ऑफिसर्स सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाद्वारे भारतीय सैन्यात निवड झाल्यानंतर १९५१ मध्ये त्यांना डेक्कन हॉर्समध्ये नियुक्त करण्यात आले होते. १९६० मध्ये त्यांनी अमेरिकन युनिव्हर्सल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये काम सुरू केले. १९७९ मध्ये डीएलएफ, युनिव्हर्सल लिमिटेडमध्ये विलीन झाल्यानंतर, त्यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
१० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती
गुरुग्राममध्ये अनेक भूकंपरोधक अपार्टमेंट, ऑफिस इमारती, मनोरंजन सुविधा आणि शॉपिंग मॉल्सच्या बांधकामामागे त्यांचे मोठे योगदान आहे. कुशल पाल सिंह यांची अंदाजे एकूण संपत्ती १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.