आईवडिलांनी दिलेला पॉकेटमनीपैपै खर्च करायची महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सवयही गेल्या मंगळवारी अचानक मोडीत निघाली. आहेत त्या पैशांमध्ये गेले आठ दिवस काढावे लागले आणि आता दहावा दिवस उगवला तरीही परिस्थितीत सुधारणा नाही. त्यामुळे कॉलेज कट्टय़ावरपैशाची चणचण अधिकच गहिरी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या काळातील गरिबी म्हणजे काय हे मोदी सरकारच्या काळात कळाले आहे, अशी मिश्किल टिप्पणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

निश्चलनीकरणाने (डिमोनिटायझेशन) सध्या सर्वसामान्यांची भंबेरी उडाली असून आपल्या बँक खात्यात पैसे असूनही पुन्हा एकदा पै-पै जमवण्यासाठी अनेकांच्या नशिबी वणवण आली आहे. समाजातील प्रत्येकालाच या नोटबंदीची झळ बसली असून यापासून महाविद्यालये आणि त्यातील युवाही सुटलेले नाहीत. एरवी भरगच्च पॉकेटमनीमुळे ‘कॉलेज कट्टय़ावर’ पैशाची चणचण भासत नसते. मात्र नोटबंदीने कॉलेज कट्टय़ाच्या भाळीदेखील गरिबी आली आहे. त्यात चहावाल्याकडे सुटे पैसे मागण्याची व उधारीची सोय उरली नसून रिकाम्या खिशांमुळे कॉलेजसमोरच्या हॉटेलची पायरी या मंडळींना टाळावी लागते आहे. तर काहींना फी भरण्यासाठी अडचण निर्माण झाली असून महाविद्यालयीन अभ्यासासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासही अनेकांना जड जात आहे. त्यामुळे या चलनकल्लोळात ३० डिसेंबपर्यंत तरी युवा जीवन होरपळणार असे दिसत असून अनेकांना तर ३१ डिसेंबर कसा साजरा करायचा, ही चिंतादेखील सतावते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत घोषित केलेली पाचशे व एक हजारच्या नोटांवरील बंदी तशी देशहितार्थ वगैरे महत्त्वाची असली तरी त्यानंतर सामान्यांच्या आयुष्यात लक्षणीय गोंधळ उडाला आहे. बँक खात्यात ‘श्रीमंती’ दिसत असली तरी पैशांच्या उपलब्धतेअभावी अनेकांना ‘गरिबी’तले दिवस आठवू लागले आहेत. मुंबईतील महाविद्यालयीन युवांनादेखील याची चांगलीच झळ बसलेली दिसते. मोदी शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे, काळा पैसा संपून जाईल अशा प्रतिक्रिया ही युवा मंडळी देत असली तरी घरात व पर्यायाने व्यक्तिगत आयुष्यात निर्माण झालेली आर्थिक टंचाई त्यांना बोचल्याशिवाय राहत नाही. एरवी तसे कॉलेजचे कॅन्टीन असो की समोरचा झेरॉक्सवाला की अगदी पानटपरीवाला, यांच्याकडे उधारीची या मंडळींना सवय असते. मात्र आता हे दुकानदार उधारी तात्काळ चुकती करण्यासाठी मागे लागले असून त्यांना पैसे द्यायचे कुठून, हा एका पहाडासारखा प्रश्न या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. याचबरोबर अनेकांपुढे तांत्रिक अडचणींचे पेचही उभे राहिले आहेत. जय साळुंके या विद्यार्थ्यांला एका अभ्यासक्रमाची फी भरायची होती, मात्र नोटबंदीमुळे फी भरता न आल्याने अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार की नाही ही भीती त्याला आहे. तर महाविद्यालयांमध्ये सध्या सहामाही परीक्षा, प्रकल्प सादर करण्याचे तसेच आगामी काळातील होणाऱ्या मोठय़ा उत्सवांच्या तालिमीचे दिवस आहेत. त्यामुळे इतर वेळी संथ असणारे मुंबईतील महाविद्यालयीन जीवन या काळात कमालीचे व्यस्त असते. एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना लढावे लागत असते. यासाठी पैसेही मोठय़ा प्रमाणात खर्च होतात. पण ते उभे होत नसल्याने प्रकल्प कसे सादर करणार किंवा सांस्कृतिक कार्यक्रम कसे करणार, ही चिंता अनेकांना लागून राहिली आहे. महाविद्यालयीन प्रकल्पांची तर मोठी बाजारपेठच असून ५०० ते ४००० रुपयांपर्यंतचे प्रकल्प या बाजारपेठेत उपलब्ध असतात. अनेक जण आपले प्रकल्प इतरांकडून तयार करून घेऊन त्यांना पैसे देतात. मात्र नोटबंदीनंतर ही बाजारपेठ कोसळल्याचे दिसत असून अनेकांना स्वतचे प्रकल्प स्वत पूर्ण करावे लागत आहेत. ही बाब थोडकी नाही, तर या नोटबंदीच्या काळात अभ्यास सहलींना गेलेल्या विद्यार्थ्यांचेही मोठे वांदे झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाचे विद्यार्थी नोटबंदी जाहीर झाल्याच्या रात्री चार दिवसांच्या पूर्वनियोजित अभ्यास सहलीसाठी उस्मानाबादला निघाले, पण जवळ फक्त ५०० च्या नोटा असल्याने त्यांची पंचाईत झाली. अखेर प्रत्येकाने आपल्याकडे असतील-नसतील तेवढय़ा १०० रुपयांच्या नोटा जमा केल्या आणि कसेबसे १२ हजार रुपये जमवले. चार दिवसांचा साराच खर्च या पैशात त्यांना भागवावा लागला. तसेच नोटबंदीमुळे महाविद्यालयाला दांडी मारून घरचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी अनेकांना आई-वडिलांना मदत करावी लागत असून बँका व एटीएमबाहेरील लांबच-लांब रांगांमध्ये ताटकळावे लागते आहे. अशा परिस्थितीत काही विद्यार्थी आदर्श कामे करीत असून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना पैसे बँकेत टाकण्यासाठी मदत करीत असल्याचे सर्वेश गवस या विद्यार्थ्यांने सांगितले.

नोटबंदीची झळ प्रत्येक महाविद्यालयाला व विद्यार्थ्यांना सारखीच बसली असून अनेकांपुढे याने अनंत अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

या दिवसांत महाविद्यालयांमध्ये कराव्या लागणाऱ्या पैशातही घट झाली आहे, तर विद्यार्थ्यांनाही आपल्या हौसे-मौजेला मुरड घालावी लागत आहे. अनेक जण आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याची वाट पाहत असून किमान ३१ डिसेंबर तरी जल्लोशात कसा साजरा करता येईल याचे मनोमन आडाखे अनेक जण बांधू लागले आहेत.

खरेदीचे पैसे घरी द्यावे लागले..

पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे मी स्वागत करते. पण या निर्णयाने मला वेगळाच अनुभव आला. कारण पुढच्या महिन्यात महाविद्यालयाची जयपूर व आग्रा येथे अभ्यास सहल जाणार आहे. या सहलीच्या वेळी तिथे गेल्यावर काही खरेदी करता येईल यासाठी पैसे जमवत होतो. मात्र हा निर्णय जाहीर झाला आणि ते पैसे घरी द्यावे लागले. त्यामुळे आता परीक्षेनंतर काही साजरे करता येणार नाही. तसेच जी काही खरेदी करायची आहे त्याचा बेतपण रद्द करावा लागणार आहे.

वृषाली गावकर

 

क्रॉफर्डमधून घरी परतलो..

नोटबंदी त्या रात्री जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी लवकर माझ्या भाच्याच्या वाढदिवसासाठी सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेलो होतो. फुगे, थर्माकॉलचे गोळे असे सगळ्या प्रकारचे साहित्य मी आवडीने निवडून घेतले. त्याचे ७०० रुपये झाले. मी मात्र दुकानदाराला पैसे कमी करण्यास सांगून त्याचे ५३० रुपये करवून घेतले आणि ५०० व ५० च्या नोटा त्याला दिल्या. त्याने लागलीच ५०० ची नोट नाकारली. यावर थोडा वेळ हुज्जत घालूनही तो ऐकण्यास तयार नव्हता. अखेर क्रॉफर्ड मार्केटमधून घरी परतलो आणि राहत्या घराजवळून अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर सगळे सामान पुन्हा विकत घेतले.

युवराज शिंदे, सिडनेहॅम महाविद्यालय

sanket.sabnis@expressindia.com