14 October 2019

News Flash

एमपीएससी मंत्र : प्राचीन भारत

२०११ साली सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीवर दोन विधाने देऊन प्रश्न विचारण्यात आलेला होता.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ यामधील प्राचीन भारत या घटकाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी यावर चर्चा करणार आहोत.

प्राचीन भारत या घटकाअंतर्गत प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रापाषण कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जातात. या घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण २१ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापकी बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड यावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या लेखामध्ये कला आणि संस्कृती संबंधित प्रश्न ग्राह्य़ धरलेले नाहीत. या घटकाची पुढील लेखामध्ये स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत. यातील काही प्रश्नांचा आपण सर्वप्रथम आढावा घेऊ.

*     मागील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न

*   २०११ साली सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीवर दोन विधाने देऊन प्रश्न विचारण्यात आलेला होता. यातील पहिले विधान ‘धार्मिक गोष्टीचे अस्तित्व असूनही एक धर्मनिरपेक्ष संस्कृती होती’, आणि दुसरे विधान ‘या काळात कापूस वस्त्रनिर्मितीसाठी वापरले जात होते.’

*   २०१२ साली ‘प्रारंभीच्या वैदिक आर्याचा धर्म कोणता होता’, असा प्रश्न विचारला होता. याच परीक्षेत ‘प्राचीन भारताच्या संदर्भानुसार जैन व बौद्ध धर्म यांना काय एकसारखे होते?’ – या प्रश्नासाठी पुढील तीन पर्याय होते. – दु:ख आणि आणि आनंद या दोन्ही भावनाचा अव्हेर, वेदाबाबत अनास्था अथवा विरक्त्ती आणि कर्मकांडाचे महत्त्व अमान्य.

*    २०१३ साली ‘बौद्ध धर्माशी संबंधित निर्वाण’ या संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आला होता. ‘खालीलपकी कोणत्या राज्याचा बुद्ध जीवनाशी संबंध होता?’ आणि यासाठी अवंती, गांधार, कोशल आणि मगध असे चार पर्याय होते. हा प्रश्न २०१४ आणि २०१५ मध्येदेखील विचारण्यात आला होता.

*  २०१६ साली ‘सर्वप्रथम अशोकाच्या शिलालेखाची उकल कोणी केली?’ हा प्रश्न होता. त्यासाठी जॉर्ज बुहलर, जेम्स प्रिन्सिप, मक्स मुल्लर आणि विल्लिअम्म जोनेस असे चार पर्याय दिलेले होते. याशिवाय ‘प्राचीन भारतातील श्रेणी व्यवस्था, परकीय प्रवाशांनी प्राचीन भारताचे केलेले वर्णन’ यासारख्या बाबींवरदेखील प्रश्न विचारले होते.

*   २०१७ साली भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात, खालील विधाने ग्राह्य़ धरा व यासाठी अनुक्रमे

सौत्रान्तिका आणि सम्मितीय (Sautrantika and Sammitiya) हे जैन धर्माचे संप्रदाय होते. (विधान पहिले) सर्वस्तीवादिन (Sarvastivadin) यांचे असे मत होते की आविष्काराचे घटक (constituents of phenomena) हे पूर्णत:  क्षणिक नाहीत, पण ते सदैव अव्यक्त स्वरूपात अस्तित्वात असतात. (विधान दुसरे)

यापकी कुठले विधान/विधाने योग्य आहे/आहेत, असा प्रश्न विचारलेला होता.

*  २०१८ साली भारतातील धार्मिक प्रथांच्या संदर्भात ‘स्थानकवाशी’ संप्रदायाचा संबंध कशाशी आहे? हा प्रश्न विचारलेला होता. त्यासाठी बौद्धधर्म, जैनधर्म, वैष्णव धर्म आणि शैवधर्म हे चार पर्याय देण्यात आले होते.

*     अभ्यासाचे नियोजन

बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड यावर सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे प्राचीन भारताचा अभ्यास करताना विविध टप्प्यांनुसार अथवा कालखंडानुसार विभागणी करून संबंधित कालखंडातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे व्यवस्थित आकलन करणे गरजेचे आहे. सिंधू संस्कृतीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नासाठी सिंधू संस्कृतीकालीन धार्मिक आणि आर्थिक जीवन पद्धतीची माहिती असणे गरजेचे आहे.

हा विषय पारंपरिक स्वरूपाचा आहे, त्यामुळे याचा सर्वागीण अभ्यास करणे गरजेचे आहे. विषय अधिक सुलभ होण्यासाठी संक्षिप्त स्वरूपात स्वत:ची टिपणे काढावीत. त्यामुळे हा विषय कमीत कमी वेळेमध्ये तयार करता येऊ शकेल. या विषयावर सर्वसाधारणपणे प्रश्न कमी विचारले जातात हे मागील प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावरून दिसून येते. त्यामुळे या विषयाची तयारी करण्यासाठी किती वेळ द्यायचा हे निश्चित करणे आवश्यक आहे.

*     संदर्भसाहित्य

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचे वाचन करावे. एनसीईआरटीची इयत्ता आठवी ते बारावी इतिहासाची पुस्तके वाचावी लागतात. विशेष करून इयत्ता बारावीचे Themes in Indian History part- I हे पुस्तक वाचावे. तसेच आर.एस.शर्मा लिखित प्राचीन भारत यावरील एनसीईआरटीचे जुने पुस्तक वाचणे आवश्यक आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या विषयावरील काही निवडक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. शिवाय Early India – रोमिला थापर आणि A History of Ancient and Early Medieval India – उपेंद्र सिंग या संदर्भग्रंथांचा वापर करणे उपयुक्त ठरेल.

First Published on March 14, 2019 12:05 am

Web Title: article about ancient india