प्रथमेश आडविलकर

आघारकर संशोधन संस्था, पुणे</strong>

जैविक शास्त्रांमध्ये संशोधन करणारी देशातील एक महत्त्वाची संशोधन म्हणून नावारूपास आलेली संस्था म्हणजे आघारकर संशोधन संस्था होय. ही संशोधन संस्था विद्य्ोचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात स्थित आहे. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी (डीएसटी) संलग्न असून संस्थेला स्वायत्त दर्जा बहाल केला गेलेला आहे. एआरआय या नावाने ओळखली जाणारी ही संस्था संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रणी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही.

*   संस्थेविषयी

आघारकर संशोधन संस्था ही जीवशास्त्र या विषयामध्ये संशोधन करणारी देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. संस्थेची स्थापना १९४६ मध्ये झाली. त्या वेळेस संस्थेची स्थापना महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स (एमएसीएस) या नावाने झाली. सुरुवातीला संस्थेचे स्वरूप पूर्णत: संशोधन संस्थेचे नव्हते, कारण संस्थेची नोंदणी तेव्हा सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टअंतर्गत झाली होती. कालांतराने संस्थेमध्ये संशोधन आणि त्या प्रकारच्या कामांना गती मिळू लागली. हळू हळू संस्थेचा चेहरामोहरा बदलून तो संशोधन संस्थेच्या स्वरूपाचा होत गेला. त्यामुळेच ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या नावाने संस्थेला वेगळी आणि नवी ओळख देण्यात आली. संस्थेचे संस्थापक संचालक प्राध्यापक कै. डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी सन्मानित करण्यासाठी १९९२मध्ये संस्थेचे तत्कालीन नाव बदलून ते आघारकर रिसर्च इन्स्टिटय़ूट (एआरआय) असे ठेवले गेले.

*   संशोधनातील योगदान

एआरआय ही संस्था प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांमध्ये मूलभूत व उपयोजित संशोधन करणारी संस्था आहे. आघारकर संशोधन संस्था विज्ञानाच्या इतर विद्याशाखांमध्ये आंतरविद्याशाखीय संशोधन करणारी देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. सध्या एआरआय जैवविज्ञान विषयातील सहा प्रमुख शाखांमध्ये संशोधन आणि विकासकार्य (आर अ‍ॅण्ड डी) करत आहे.

संस्थेचे संशोधन बायोडायव्हर्सिटी अ‍ॅण्ड पॅलिओबायोलॉजी, बायोएनर्जी, बायोप्रोस्पेिक्टग, डेव्हलपमेंटल बायोलॉजी, जेनेटिक्स अ‍ॅण्ड प्लँट ब्रीिडग आणि नॅनो बायोसायन्स या सहा शाखांमध्ये होते. याबरोबरच संस्था सध्या डिस्पोजेबल ऑन-चिप रिअल टाइम पीसीआर डिव्हाइसचा विकास, नॅनोपार्टकिल्सचे पृथक्करण आणि शुद्धीकरण यासाठी सूक्ष्म-पेशींची निर्मिती, मानवी व प्राणी रोगजनकांच्या आणि दूषित खाद्यपदार्थामधील दोष जलद ओळखण्याकरिता पोर्टेबल डिव्हाइसेस, कीटकनाशक नियंत्रणासाठी डीएसआरएनए-नॅनोपार्टकिल्सचे वितरण, औषधीय झाडांमध्ये उगवण क्षमता वाढविण्यासाठी बियाण्यांवर योग्य संशोधन इत्यादी विषयांवर संशोधन करत आहे. संस्थेच्या नॅनोबायोसायन्स विभागाने बायोमिमीटिक्स, नॅनोमेडिसिन, मायक्रोफॅब्रिकेशन, नॅनोटेक्नोलॉजी इन अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट या विषयांतील संशोधनावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. शास्त्रज्ञांनी बायोमिमीटिक्स या विषयातील संशोधनाची प्रेरणा जैवविश्वातील संरचना, प्रक्रिया व साधने यांपासून घेतलेली आहे. नॅनोमेडिसिन या विषयातील संशोधन प्रामुख्याने डायग्नोस्टिक्स, ड्रग डिलीव्हरी आणि थेरपिटिक्समध्ये केले जाते.

*   संस्थेमधील विद्वान व अनुभवी संशोधक

प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली डीएसटी, सीएसआयआर, आयसीएआर, आयसीएमआर, डीबीटी, एमओईएफ आणि एमएनईएस यांनी वित्तपुरवठा केलेल्या अनेक संशोधन योजना संस्थेमध्ये चालविल्या जात आहेत. एआरआय देशांतर्गत आणि परदेशातील अनेक सार्वजनिक आणि खासगी संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम करत आहे. त्याबरोबरच संस्थेने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रायोजित संशोधन प्रकल्प आणि तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रम स्वीकारले आहेत.

*   विद्यार्थ्यांसाठी संधी

एआरआय या संस्थेमध्ये ही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडी संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. आघारकर संशोधन संस्था विविध विद्यापीठांबरोबर संलग्न आहे. संस्था आधुनिक पायाभूत सुविधा व जीवशास्त्रातील अत्याधुनिक उपकरणांसह अद्ययावत प्रयोगशाळांनी सुसज्ज आहे. संस्थेमध्ये संशोधक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृह आहे. संस्था संशोधनासाठी स्वायत्त असून एमएस्सी व पीएचडीसारख्या शैक्षणिक पदव्यांकरता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. संस्थेचे अनेक पीएचडी पदवीधारक भारतात व परदेशातदेखील संशोधन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी इथे पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. महाविद्यालयीन तसेच विद्यापीठातील विद्यार्थी संस्थेमध्ये आपले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येऊ शकतात.

*    संपर्क 

आघारकर संशोधन संस्था, गोपाळ गणेश आगरकर मार्ग, पुणे- ४११००४, महाराष्ट्र.

दूरध्वनी   +९१-२०-२५३२ ५००० /+९१-२०-२५६ ५३६८०.

इमेल  director@aripune.org

संकेतस्थळ   http://www.aripune.org

itsprathamesh@gmail.com