डय़ुक विद्यापीठ, अमेरिका

प्रथमेश आडविलकर  itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीना या राज्यातील डय़ुक विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले सव्वीसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १९२४ साली करण्यात आली. मात्र विद्यापीठाच्या स्थापनेचा दुवा १८३८ साली स्थापन झालेल्या ब्राऊन स्कूलबरोबर जोडला गेलेला आहे. डय़ुक विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव ब्राऊन स्कूल असे होते. युनियन इन्स्टिटय़ूट, नॉर्मल कॉलेज, ट्रिनीटी कॉलेज अशा बऱ्याच नामांतरानंतर शेवटी डय़ुक विद्यापीठ असे करण्यात आले. डय़ुक विद्यापीठ हे खासगी संशोधन विद्यापीठ आहे. नॉर्थ कॅरोलीनामधील डरहॅम या शहरात डय़ुक विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस ८६०० एकर परिसरामध्ये आहे. मुख्य कॅम्पस सेन्ट्रल, ईस्ट, वेस्ट आणि मेडिकल सेंटर अशा चार प्रमुख विभागांमध्ये (सब-कॅम्पस) विभागाला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ प्रशासनाने या सर्व कॅम्पसमध्ये मोफत बस प्रवासाची सोय केलेली आहे. तसेच विद्यापीठाचे दोन परदेशी कॅम्पस चीन आणि सिंगापूर या ठिकाणी स्थित आहेत. डय़ुक विद्यापीठामध्ये सध्या जवळपास चार हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास पंधरा हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

विद्यापीठाच्या सर्व कॅम्पसमध्ये मिळून एकूण बारा प्रमुख शैक्षणिक – संशोधन विभाग (स्कूल्स) आणि काही संशोधन संस्था (रिसर्च इन्स्टिटय़ूट्स) आहेत. सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम या स्कूल्स आणि रिसर्च इन्स्टिटय़ूट्सकडून चालवले जातात.

अभ्यासक्रम

डय़ुक विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमातील जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांचा विद्यापीठामध्ये होणाऱ्या संशोधनामध्ये थेट सहभाग असतो. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ५३ मेजर्स, ५२ मायनर्स आणि २३ सर्टिफिकेट विषयांची उपलब्धता करून दिलेली आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने मास्टर्स, पीएचडी, डय़ुएल डिग्री, जॉइंट डिग्री आणि सर्टिफिकेट कोस्रेस यांचा समावेश होतो. डय़ुक विद्यापीठातील डिव्हीनीटी स्कूल, डय़ुक-एनयूएस मेडिकल स्कूल, फुकुआ स्कूल ऑफ बिझनेस, प्रॅट्ट स्कूल ऑफ इंजिनीअिरग, निकोलस स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंट, डय़ुक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ नìसग, डय़ुक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डय़ुक युनिव्हर्सिटी, डय़ुक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ, सॅनफोर्ड स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी आणि ट्रिनीटी कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस या बारा प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या प्रमुख विभागांबरोबरच डय़ुक सेंटर फॉर जिनोमिक अ‍ॅण्ड कॉम्प्युटेशनल बायोलॉजी, डय़ुक ग्लोबल हेल्थ इन्स्टिटय़ूट, डय़ुक इनोव्हेशन अ‍ॅण्ड आन्त्रप्रीनिअरशिप  इनिशिएटिव्ह, डय़ुक इन्स्टिटय़ूट फॉर ब्रेन सायन्सेस, डय़ुक सायन्स अ‍ॅण्ड इनिशिएटिव्ह, डय़ुक युनिव्हर्सिटी एनर्जी इनिशिएटिव्ह, जॉन होप फ्रान्क्लीन ह्य़ुमॅनिटीज इन्स्टिटय़ूट, केनन इन्स्टिटय़ूट फॉर एथिक्स, निकोलस इन्स्टिटय़ूट फॉर एन्व्हायर्नमेंट पॉलिसी सोल्यूशन्स, सोशल सायन्स रिसर्च इन्स्टिटय़ूट या डय़ुक विद्यापीठाच्या स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या संशोधन संस्था आहेत.

सुविधा

डय़ुक विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय केली गेली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पदवीची पहिली तीन वर्षे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे सक्तीचे आहे. त्यामध्येही प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी ईस्ट कॅम्पसमधील वसतिगृहांमध्ये राहणे अपेक्षित आहे. ईस्ट कॅम्पसमध्ये प्रथम वर्षांच्या एकूण १७०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय आहे.  विद्यापीठाकडून विविध स्वरूपात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विद्यापीठाकडून हेल्थ इन्शुरन्स, कॅम्पसमध्ये हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर, पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर सपोर्ट सेंटर, जिम, लायब्ररी, कम्युनिटीज, क्लब्स, म्युझियम, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मदत केंद्र यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापक गुणोत्तर ८:१ एवढे आहे, म्हणजेच दर आठ विद्यार्थ्यांसाठी एका प्राध्यापकाची नियुक्ती केलेली आहे.

वैशिष्टय़

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक नामवंतांचा समावेश आहे. विद्यापीठाने आतापर्यंत १३ नोबेल पारितोषिक विजेते निर्माण केले आहेत. याव्यतिरिक्त विद्यापीठाचे अनेक माजी विद्यार्थी ऱ्होडस आणि चर्चिल स्कॉलर्स आहेत. विद्यापीठाचे उद्योगक्षेत्रातील विद्यार्थी सध्या जागतिक स्तरावरील आघाडीच्या ‘फॉच्र्युन-५००’ कंपन्यांचे प्रमुख आहेत.

मी २०१५ साली डय़ुक विद्यापीठातून ‘मास्टर्स इन इंजिनीअिरग मॅनेजमेंट’ ही अभियांत्रिकी व्यवस्थापनामधील पदव्युत्तर पदवी घेतली. मला वाटते की, भारतीय विद्यापीठांमधील बहुतांश पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रम हे बऱ्यापैकी पारंपरिक आहेत. या विद्यापीठातील इंजिनीअिरग मॅनेजमेंट हा तुलनेने नवीन अभ्यासक्रम आहे. प्रत्येक सेमिस्टरमध्ये विषयांचे ऑडिट करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांकडे आहे. विद्यार्थी कोणत्याही सेमिस्टरसाठी दिलेल्या सूचीतून त्यांना हवे ते विषय या अभ्यासक्रमासाठी निवडू शकतात. या अभ्यासक्रमातील विविध विषय शिकवताना औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये कशी विकसित होतील याची काळजी प्राध्यापकांकडून घेतली जाते. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे ‘बिझनेस’सारखे विषय तुम्ही इतर संबंधित म्हणजे थेट विद्यापीठाच्या ‘फुकुआ स्कूल ऑफ बिझनेस’मधूनही शिकू शकता.’’ अभ्यासक्रमाबाबतची ही लवचीकता विद्यापीठाच्या प्रशासनातही आहे, हे महत्त्वाचे.

– स्मृती राव, मास्टर्स इन इंजिनीअिरग मॅनेजमेंट (२०१५), डय़ुक विद्यापीठ

संकेतस्थळ  https://www.duke.edu/