प्रथमेश आडविलकर

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, तिरुअनंतपुरम.

itsprathamesh@gmail.com

केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे असलेली नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (एनआयआयएसटी) ही देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. अ‍ॅग्रोप्रोसेसिंगपासून प्रोसेस इंजिनीअिरग, एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजी इत्यादी आंतरविद्याशाखीय वैविध्य असणाऱ्या विषयांमध्ये ही संस्था संशोधन करते. तिची स्थापना १९७५ साली झाली असून, आपल्या संशोधन कार्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार करण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे एनआयआयएसटी हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

 संस्थेविषयी 

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी(एनआयआयएसटी) म्हणजेच राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्था ही सुरुवातीला १९७५मध्ये सीएसआयआर कॉम्प्लेक्स म्हणून स्थापित करण्यात आली. नंतर १९७८ साली या संस्थेला केरळ राज्याच्या प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळेचा दर्जा देण्यात आला म्हणून संस्थेचे नाव बदलून रिजनल रिसर्च लॅबोरेटरी तिरुअनंतपुरम असे करण्यात आले. नंतर २००७ मध्ये पुन्हा एकदा संस्थेचे नामकरण एनआयआयएसटी असे करण्यात आले.

देशात उपलब्ध असलेले स्रोत प्रभावीपणे वापरणे आणि मूलभूत महत्त्व असलेल्या क्षेत्रातील उच्च गुणवत्तेचे संशोधन करणे या हेतूने संस्था कार्यरत आहे. संस्थेने संशोधन क्षेत्रात प्रगत संशोधन करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा स्थापन केल्या आहेत. मसाल्यांच्या आणि तेलबियांच्या क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण तसेच त्यांच्या प्रक्रिया आणि उत्पादनाच्या विकासासाठी आवश्यक सोयीसुविधा संस्थेमध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत. संस्था करत असलेल्या संशोधनावर आधारित एकूण २५२ विद्यार्थ्यांना आतापर्यंत पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आलेली आहे. संस्थेमध्ये आजघडीला सुमारे ६० शास्त्रज्ञ आणि २०० रिसर्च फेलो विविध संशोधन विषयांत कार्यरत आहेत.

आपल्या संशोधनामध्ये मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञान विकास आणि व्यावसायीकरण यांचे मिश्रण संस्थेने केलेले आहे. त्यामुळेच संस्था संशोधनाव्यतिरिक्त प्रादेशिक स्रोतांवर आधारित विविध क्रियाकलाप आणि आर अ‍ॅण्ड डी – उद्योग व शैक्षणिक वातावरणात सहज संचार करत असते.

संशोधनातील योगदान 

एनआयआयएसटी ही मूलभूत विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. ही संस्था पर्यावरण तंत्रज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि अभियांत्रिकी इत्यादी शाखांमधील संशोधनाच्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय संशोधन करत आलेली आहे. इनऑरगॅनिक मटेरियल्स, ऑरगॅनिक केमिस्ट्री, फोटोसायन्सेस अ‍ॅण्ड फोटॉनिक्स, नॅनोसिरॅमिक्स, एनर्जी मटेरियल्स, पॉलीमेरिक मटेरियल्स, इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स, मॅग्नेटिक मटेरियल्स, फंक्शनल मटेरियल्स अ‍ॅण्ड मिनरल्स, मेटॅलिक मटेरियल्स सेक्शन्स, अ‍ॅग्रोप्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी, मायक्रोबियल प्रोसेस अँड टेक्नॉलॉजी, मटेरियल्स सायन्स, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, प्रोसेस इंजिनीअिरग अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजी, केमिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये प्रामुख्याने आपले संशोधन आणि विकासकार्य करणारी ही प्रयोगशाळा आहे. संस्थेने विविध उद्योगातील देश-विदेशातील अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. एनआयआयएसटी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन संस्था व आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्राशी संलग्न आहे. एनआयआयएसटीमधील शास्त्रज्ञांनी आतापर्यंत जवळपास दोनशे आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच ८ भारतीय पेटंट्स तर ९ विदेशी पेटंट्स दाखल केले आहेत. संस्थेच्या लक्षवेधी संशोधनांमध्ये औद्योगिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण एंझाइम, बायोफ्यूल्स आणि बायोपॉलिमर्सच्या उत्पादनासाठी जैव -आधारित प्रक्रिया आणि उत्पादनांचा विकास तसेच तेलाच्या उत्पादनांमध्ये, उत्पादनांचे मूल्यमापन इको – फ्रेंडली प्रक्रिया स्वरूपात कसे करता येईल याचे संशोधन आणि मसाले व तेल वनस्पती इत्यादी उत्पादनांमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करणे इत्यादी बाबींचा समावेश करता येईल.

विद्यार्थ्यांसाठी संधी

एनआयआयएसटीने विद्यार्थ्यांसाठी

पदव्युत्तर व पीएच.डी. या स्तरावर अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. यामध्ये मग  सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार एनआयआयएसटीमध्ये academy of Scientific & Innovative Research (AcSIR)) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. दरवर्षी विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.

संपर्क 

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी

सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी

इंडस्ट्रियल इस्टेट, पप्पनमकोडे,

तिरुअनंतपुरम, केरळ – ६९५०१९

दूरध्वनी  + ९१- ४७१- २५१ ५२२६.

ई-मेल – director@niist.res.in

संकेतस्थळ  – http://www.niist.res.in/