रोहिणी शहा

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा  – स्वरूप

राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर दोनएक दिवसांचा ब्रेक तो बनता है! मात्र आता त्या प्रभावातून आणि पहिल्यांदा परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी भारावलेपणातून बाहेर येऊन पुढील तयारी सुरू केली पाहिजे. त्या दृष्टीने सर्वात पहिली होतेय ती महाराष्ट्र दुय्यम सेवा  (गट ब  – अराजपत्रित) पूर्व परीक्षा. २४ मार्च रोजी ही परीक्षा होत आहे. या लेखापासून या परीक्षेच्या तयारीविषयी चर्चा करण्यात येत आहे.

सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि गृह विभागाच्या अखत्यारीतील गट ब (अराजपत्रित) सेवांमधील एकूण ५५५ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. उपलब्ध पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता जाहिरातीमध्ये नमूद करण्यात येत असते. त्यामुळे एकूण पदे, त्यामध्ये आपल्या संवर्गामध्ये उपलब्ध पदे असे हिशोब न करता परीक्षेची तयारी सुरू करायला हवी. पूर्व परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम नेमकेपणाने समजून घेऊ.

*      दुय्यम सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप

*      गुणांकन

या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. आणि प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. भरायच्या एकूण पदांच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा नक्की करण्यात येते. या सीमारेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.

*      अभ्यासक्रम  

१.     चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२.     नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

३.     आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

४.     भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पि, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

५.     अर्थव्यवस्था –

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इ.

६.     सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुऑलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).

७.     बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.

अ) बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

ब) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी.

*      काठिण्य पातळी

राज्यसेवा, दुय्यम सेवा किंवा गट क सेवा परीक्षा कोणतीही असो तिचा दर्जा आयोगाने जाहिरातीमध्ये नमूद केलेला असतो. हा नमूद दर्जा म्हणजे त्या त्या परीक्षेची काठिण्य पातळी असे सर्वसाधारण गृहीतक असते. मात्र राज्यसेवा आणि दुय्यम सेवांची काठिण्य पातळी ही पदवीच्या दर्जाची निश्चित करण्यात आली आहे. मग या दोन परीक्षांमधील काठिण्य पातळी वेगळी की समानच? हे समजून घेण्याआधी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमधील ज्या पदांसाठी या परीक्षा घेतल्या जातात ती पदे गट अ, ब, क (वर्ग १,२,३) अशी उतरंड असलेल्या प्रशासकीय रचनेचा भाग आहेत. प्रत्येक पातळीवरील पदांसाठी प्रशासकीय जबाबदारी आणि कामाचे स्वरूप वेगवेगळे आणि निश्चित केलेले असते. त्या त्या जबाबदाऱ्या निभावू शकणारे अधिकारी / कर्मचारी वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून निवडण्यात येतात. आणि त्या अनुषंगाने त्या त्या स्तरावरील पदांच्या परीक्षांची काठिण्य पातळी व स्वरूप निश्चित केलेले असते.

दुय्यम सेवेसाठीच्या प्रश्नांचा दर्जा राज्यसेवेप्रमाणेच पदवीचा असला तरी तो अभ्यासक्रमाच्या आकलनाचा भाग झाला. राज्यसेवेची काठिण्य पातळी ही बहुविधानी प्रश्नांमुळे वरच्या स्तरावर असते. तसेच पर्याय हे जास्त नेमकी माहिती विचारणारे, एकसारखे वाटल्याने संभ्रम वाढवू शकतील असे असतात. दुय्यम सेवेमध्येही बहुविधानी प्रश्न असले तरी ते संभ्रमात टाकणारे कमी असतात आणि नेमके (to the point) असल्याने त्यांच्यातून योग्य पर्याय शोधणे तुलनेने कमी कष्टाचे ठरते.

काठिण्य पातळीबाबत एकदा स्पष्टता आली की, तिचा फारसा विचार न करता जास्तीत जास्त बारकाईने पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन अभ्यास करणे जास्त व्यवहार्य आहे. यातून संकल्पना स्पष्ट होण्यास, नेमका अभ्यास होण्यास आणि त्यातून आत्मविश्वास निर्माण होण्यास खूप मदत होते. ही स्पष्टता सर्वच परीक्षा आणि सर्वच मुलाखतींसाठी फायदेशीर ठरते.

पुढील लेखापासून तयारीबाबत विश्लेषणाच्या आधारे घटकनिहाय चर्चा करण्यात येईल.