प्रवीण चौगले

मागील लेखामध्ये आपण प्राकृतिक भूगोल व नकाशाचे महत्त्व या बाबींवर चर्चा केली. प्रस्तुत लेखामध्ये आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल व पर्यावरणीय भूगोल या घटकांच्या तयारीचा आढावा घेणार आहोत.

आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो. देशातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र यामधील सद्य:स्थिती, त्याबाबतची सरकारी धोरणे, योजना यांचा चालू घडामोडींच्या अनुषंगाने आढावा घ्यावा.

सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल या घटकांची माहिती घ्यावी. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, घनता, जन्मदर, मृत्युदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी गटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश, इ. घटक अभ्यासणे आवश्यक आहे. यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, इ. बाबी अभ्यासाव्यात. भारताचे लोकसंख्या धोरण, भारतातील वंश, जमात, जात, धर्म, भाषा, इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे.

वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या नागरी व ग्रामीण वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात स्थलांतर वाढले व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या.

भूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा महत्त्वपूर्ण घटक आहे. २०१९ मध्ये भूगोलाशी संबंधित बहुतांश प्रश्न याच घटकावरून विचारण्यात आले होते. या अभ्यासघटकामध्ये प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, हरितगृह परिणाम व तापमानवाढ यांसारख्या गंभीर जागतिक पर्यावरणीय समस्या समकालीन घडामोडींच्या प्रकाशामध्ये अभ्यासाणे आवश्यक आहे. उदा. क्योटो प्रोटोकॉल व तापमानवाढीवर वेळोवेळी बोलाविण्यात आलेल्या UNFCच्या परिषदांची माहिती करून घ्यावी. माद्रिद, स्पेन येथे वातावरण बदलविषयक समिती पार पडली. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या बाबींचा  साकल्याने अभ्यास करावा.

आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय भूगोल या घटकाची व्याप्ती अधिक आहे. परिणामी या घटकांची तयारी परिपूर्ण होण्याकरिता गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांची मदत घ्यावी. यामुळे आपल्या तयारीमध्ये नेमकेपणा येईल.

या अभ्यासघटकांवर २०१९ मध्ये विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा ऊहापोह करूयात.

प्र. १. खालील राज्येविचारात घ्या.

१) छत्तीसगड

२) मध्य प्रदेश

३) महाराष्ट्र

४) ओडिशा

या राज्यांच्या संदर्भात, राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वनाच्छादनाची टक्केवारी लक्षात घेऊन राज्यांचा चढता क्रम लावा.

प्र. २. अलियार, इसापूर आणि कांग्साबती या ठिकाणांमध्ये कोणते साम्य आहे?

१) अलीकडे शोधण्यात आलेले युरेनियमचे साठे.

२) उष्णकटिबंधीय वर्षांवन

३) भूमिगत गुहा तंत्र

४) जलाशय

योग्य पर्याय क्र. ४ . अलियार, इसापूर आणि कांग्साबती या तीन ठिकाणी जलाशय साठे आहेत.

प्र. ३. भारतामध्ये विशिष्ट असुरक्षित जमाती समूहांबाबत (Particulaly Vulnerable Tribal Groups — PVTGS) खालील विधाने लक्षात घ्या.

१) PVTGS देशातील १८ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहतात.

२) स्थिर किंवा कमी होत असलेली लोकसंख्या, PVTGSची स्थिती दर्शविणारा एक निकष आहे.

३) देशामध्ये ९५ PVTGS अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले.

४) इरुलर आणि कोंडारेड्डी या दोन जमाती ढश्ळॅरच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

वरील प्रश्नांच्या विश्लेषणावरून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे या अभ्यासघटकांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा रोख माहितीवर असतो. संकल्पनात्मक बाबींचा अभाव दिसतो. परिणामी परीक्षार्थीनी क्रमिक पुस्तके तसेच संदर्भ ग्रंथांबरोबरच इंटरनेट, वृत्तपत्रे, डाऊन टू अर्थ यांसारखी मासिके आदी स्रोतांचा वापर करणे इष्ट ठरेल.