डॉ. सिद्धिविनायक बर्वे

बदलत्या जगासोबत करिअर्सही बदलत आहेत. अगदी काही वर्षांपूर्वी नॅनो तंत्रज्ञान, जीवतंत्रज्ञान, रोबोटिक्स असे केवळ शास्त्रज्ञांच्या जगातील भासणारे शब्द आज करिअर संधींसाठी परवलीचे झाले आहेत. करिअरच्या अवकाशात उदयास येणाऱ्या अशाच नवीन ‘करिअर क्षितिजां’विषयीचे हे  सदर.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

आंतराष्ट्रीय स्तरावर करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा जीवतंत्रज्ञानाकडे वळताना दिसत आहे. जीवतंत्रज्ञान हे उपयोजित शास्त्र आहे. त्यामध्ये आंतरशाखीय शिक्षणाचा समावेश होतो. या विद्याशाखेत तंत्रज्ञान अभिप्रेत असल्यामुळे  हे प्रामुख्याने जैविक अभिक्रियांचा वापर करून विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. औद्योगिक विकासाकरिता लागणारे तंत्रज्ञान या विद्याशाखेत विकसित करण्यात येते. साहजिकच जागतिक स्तरावर उद्योग क्षेत्रात या शास्त्राचा वापर वाढतो आहे.

जीवतंत्रज्ञान हे संशोधनाधिष्ठित उपयोजित शास्त्र आहे. त्यातील अभ्यासक्रमात जीवशास्त्र व तंत्रज्ञानाची सांगड घातली जाते. अभ्यासक्रमात जीवशास्त्रातील अनेक पोटशाखांसोबत रसायनशास्त्र, अभियांत्रिकी तसेच भौतिकशास्त्रासोबत काही प्रमाणात संगणक तसेच संख्याशास्त्राचा अंतर्भाव होतो. थोडक्यात तंत्रज्ञानाशी निगडित असणाऱ्या सर्व ज्ञानशाखांचा अंतर्भाव असणारे सर्वसमावेशक शास्त्र म्हणून जीवतंत्रज्ञान विकसित होत आहे. जीवतंत्रज्ञानांतर्गत सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, आनुवंशशास्त्र, प्रतिरक्षाशास्त्रासोबत आरोग्य, औषधशास्त्र, शेती, पशुपालन, तसेच पर्यावरणशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा समावेश होतो. विविध ज्ञानशाखांच्या अंतर्भावातून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या जवळपास प्रत्येक क्षेत्रासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणारे हे शास्त्र आहे.

आपल्या देशासंदर्भात शेतीचे उदाहरण घेतले तर जीवतंत्रज्ञानाचेआंतरशाखीय परिणाम जाणून घेता येतील. शेतीसाठी लागणारी रोपे पारंपरिक पद्धतीने तयार करणे हे काम खूप जिकिरीचे आणि वेळखाऊ आहे. परंतु ऊतीसंवर्धन या वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत कमी कालावधीत ते करता येते शिवाय लाखोंच्या संख्येत एकाच वाणाची अधिक सक्षम रोपे निर्माण करणेही शक्य होते. अशाच प्रकारे रेणवीय जीवशास्त्राच्या मदतीने बीटी तंत्रज्ञान वापरून पिकांना लागणाऱ्या रोगांपासून पिकांचे रक्षण करणे शक्य होते. तसेच जनुक अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून अधिक पीक देणाऱ्या वाणांची निर्मिती करता येणे शक्य आहे.

शेतीप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही अधिक चांगली औषधे निर्माण करण्यासाठी तसेच जलद रोगनिदान करण्यासाठी जीवतंत्रज्ञान मदत करते. मोठय़ा प्रमाणावर दुग्धजन्य पदार्थावर प्रक्रिया, पर्यावरणविषयक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी कचऱ्याचे जलद विघटन करणे एवढेच नाही तर क्लोनिंग, जिनोमिक्स, स्टेमसेल अशा आधुनिक तंत्राच्या साहाय्याने मानवी जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठीही जीवतंत्रज्ञान उपयुक्त ठरते आहे.

भारतात जीवतंत्रज्ञानाची मुळे खोलवर रुजली आहेत. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून जीवतंत्रज्ञान ही विद्याशाखा भारतात विकसित होत आहे. कलकत्ता येथील जाधवपूर विद्यापीठात साठीच्या दशकात सर्वप्रथम जीवतंत्रज्ञानातील पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. दिल्लीतील आयआयटी या संस्थेने भारतात सर्वप्रथम जीवतंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम विकसित केला. भारतात जीवतंत्रज्ञान क्षेत्राला खऱ्या अर्थाने उभारी आली ती १९८६ साली. त्यावर्षी भारत सरकारद्वारे जीवतंत्रज्ञान विभागाची स्थापना झाली. भारत सरकारच्या या विभागाद्वारे जीवतंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीसाठी देशातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयात जीवतंत्रज्ञान विषयांतील उपयोजित अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्थसाहाय्य देण्यात येते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीच्या अनेक जीवतंत्रज्ञानविषयक संस्था भारतात विकसित झाल्या आहेत. भारत हा जागतिक स्तरावर मोठय़ा प्रमाणावर सरकारी मदतीद्वारे जीवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास करणारा प्रमुख देश ठरतो आहे.  भारतात जीवतंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतातील बहुतेक विद्यापीठे, महाविद्यालय तसेच संशोधन संस्थांद्वारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर विज्ञान शाखेतील उच्चमाध्यमिक स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शिवाय ही तंत्रज्ञानाभिमुख ज्ञानशाखा असल्याने जीवशास्त्राबरोबर गणिताचा अंतर्भाव असणे अनिवार्य आहे.  जीवतंत्रज्ञानातील पदवी अभ्यासक्रमांसोबत अभियांत्रिकी महाविद्यालयांतून तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच या विषयात अनेक विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतून इंटिग्रेटेड पदवी अभ्यासक्रम राबविले जातात. उच्चमाध्यमिक स्तरांनंतर पाच वर्षांचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये असतात. केवळ पदवी अभ्यासक्रमापेक्षा इंटिग्रेटेड अभ्यासक्रमात उपयोजित कौशल्यांचा अंतर्भाव अधिक असल्यामुळे जीवतंत्रज्ञानातील इंटिग्रेटेड पदवीधारकांना अधिक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. जीवतंत्रज्ञानातील पदवी अभ्यासक्रमानंतर भारतातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतून पदव्युत्तर शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पदवीनंतर जीवतंत्रज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा पार केल्यानंतर आयआयटी तसेच देशातील नामवंत विद्यापीठांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.

विद्यापीठ, महाविद्यालय, आयआयटी तसेच तंत्रज्ञानविषयक संस्थांबरोबर भारत सरकारद्वारे स्थापन केलेल्या आयसर, अणुऊर्जा विभागातर्फे स्थापन केलेल्या नायसर तसेच सेंटर फॉर बेसिक सायन्सेस यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांतून जीवशास्त्र तसेच जीवतंत्रज्ञानातील अभ्यासक्रम राबविण्यात येतात. पदव्युत्तर शिक्षणानंतर जीवतंत्रज्ञानातील पीएच.डी. तसेच संशोधन क्षेत्रातीलही अनेक संधी उपलब्ध आहेत. जीवतंत्रज्ञानातील पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन क्षेत्रातील शैक्षणिक संधीसोबत जीवतंत्रज्ञान विषयातील एमबीए या व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतोय. जीवतंत्रज्ञानाचे क्षेत्र विस्तारते आहे. या वाढत्या क्षेत्राचे योग्य नियोजन करण्यासाठी जीवतंत्रज्ञानातील एमबीए पदवीधारकांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत.

जीवतंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांची आणि योग्य संस्थेची निवड अत्यंत आवश्यक आहे. हे शास्त्र कौशल्याधिष्ठित असल्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकावर भर दिला जातो. त्यामुळे तुम्ही जिथे शिक्षण घेणार आहात त्या आस्थापनात चांगल्या आणि आधुनिक सुविधा, योग्य प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक असणेही गरजेचे आहे.

एकूणच जीवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण, उद्योग, संशोधन तसेच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच हा  पर्याय अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.

जगभर जीवतंत्रज्ञानाची क्रांती होत आहे. आपल्या भारतीय तरुणाईला तर ती  चुकवून चालणारच नाही.

लेखक सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलुंड येथे संचालक पदावर कार्यरत आहेत.