08 April 2020

News Flash

करिअर क्षितिज : जीनोम तंत्रज्ञान

जीनोम तंत्रज्ञानाची व्याप्ती खूप मोठी आहे. सजीवांतील जनुकांद्वारे प्रथिनांची निर्मिती केली जाते

डॉ. सिद्धीविनायक बर्वे

शतकाचे शास्त्र म्हणून गणण्यात आलेले जीवतंत्रज्ञान सजीवांचा व सजीवांतील अभिक्रियांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करून घेणारे शास्त्र म्हणून विकसित होत आहे. जीवतंत्रज्ञानाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी विकसित होत असलेले जीवतंत्रज्ञान सजीवांवर तसेच सजीव सृष्टीवर नियंत्रण मिळविणारे शास्त्र म्हणूनही पुढे येत आहे ते सजीव सृष्टीचे अंतरंग उलगडणाऱ्या ‘जीनोमिक्स’ किंवा ‘जीनोम’ तंत्रज्ञानामुळे.

आपल्या सभोवतालच्या प्राणी, वनस्पतींवर पर्यायाने संपूर्ण सजीव सृष्टीवर नियंत्रण मिळवावे, अशी मानवाची पुरातन काळापासून इच्छा राहिली आहे. जीनोम तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवाची ही इच्छा प्रत्यक्षात साकार होत आहे. जीनोम तंत्रज्ञान हे, सजीव सृष्टीचा पट उलगडणारे एक आधुनिक शास्त्र आहे. अर्थातच करिअरच्या प्रचंड संधी असणारे आधुनिक तंत्रज्ञान. खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकाचे शास्त्र.

जीवसृष्टीतील सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात. प्राणी, वनस्पती तसेच सूक्ष्मजीवांच्या पेशीत, या पेशींवर तसेच पर्यायाने सर्व सजीव सृष्टीवर नियंत्रण असणारा डीएनएचा रेणू आढळून येतो. डीएनए रेणूत अंतरंगाची उकल जीनोम तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येते. सजीवांतील डीएनए रेणूतील घटक म्हणजेच जनुकांची रचना, त्यांचे गुणधर्म, त्यात होणारे बदल तसेच डीएनए रेणूतील सर्व घटकांची उकल जीनोम तंत्रज्ञानाद्वारे केली जाते. सजीवांतील डीएनएच्या संपूर्ण संचाला त्या सजीवाचा जीनोम म्हणतात आणि या शास्त्राला जीनोमिक्स. जीनोमिक्स हे आंतरशाखीय संशोधनाधिष्ठित तंत्रज्ञान आहे. या तंत्राच्या विकासात रेणवीय जीवशास्त्र, जीवरसायन शास्त्र, जीवभौतिकी तसेच अनुवंशशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा समन्वय आढळून येतो. जीवसृष्टीवर नियंत्रण मिळविण्याची क्षमता असणाऱ्या जीनोमिक्सवर जगभर मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे. या शास्त्रात शिक्षण, संशोधन तसेच करिअरच्या अमर्याद संधी जगभरात उपलब्ध आहेत.

जीनोम तंत्रज्ञानाची व्याप्ती खूप मोठी आहे. सजीवांतील जनुकांद्वारे प्रथिनांची निर्मिती केली जाते. या प्रथिननिर्मिती प्रक्रियेत सजीवांतील वितंचकांचाही (enzymes) समावेश असतो. प्रथिनांद्वारे सजीवांतील ऊतींची निर्मिती होते. ऊतींच्या एकत्रीकरणातून सजीवांतील विविध अवयवांची निर्मिती केली जाते. सजीवांतील जीनोमचे अंतरंग जाणून घेतल्यामुळे सजीवांच्या जडघडणीवर नियंत्रण मिळविता येते. सजीवांत घडणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया जाणून घेण्यासाठी जीनोमिक्सचा वापर होतो म्हणून या तंत्रज्ञानाला जीवसृष्टीवर नियंत्रण ठेवणारे तंत्रज्ञान असे संबोधण्यात येते.

जीनोम तंत्रज्ञानात डीएनएची पर्यायाने त्यातील जनुकांची रचना सादर केली जाते. ही जनुके ज्या जीवरासायनिक घटकांची बनलेली असतात त्या घटकांची रचना जीनोमद्वारे उलगडून दाखवण्यात येते. सजीवांतील डीएनएतील जनुकांच्या रचनेच्या या साखळीला ‘सिक्वेन्स’ असे म्हणतात. जीनोमिक्समुळे सर्व सजीवांच्या जीनोम्सचे सिक्वेन्सिंग करणे आता शक्य झाले आहे.

या तंत्राद्वारे सर्वप्रथम जिवाणू तसेच विषाणूंच्या जनुकांच्या रचनेची साखळी उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्यांनतर सर्वप्रथम कृमी वर्गातील हिमोफिलस प्रजातीच्या जीनोम रचनेची उकल करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आणि एकविसाव्या शतकात मानवातील जीनोमची उकल करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. मानवातील सर्व जनुकांची जंत्री उपलब्ध असणे, याचाच अर्थ असा की, मानवी जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणाऱ्या गुणधर्मावर नियंत्रण मिळवणे आता शक्य झाले आहे. जीनोमची उकल केल्यामुळे जणू मानवाची जनुकीय कुंडलीच आपल्या हाती लागली आहे. मानवी इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण शोध आहे. मानवातील रोगकारक जनुके हुडकून पुढच्या पिढीत ही जनुके संक्रमित न होण्याची खबरदारी घेतली तर येणारी पिढी सुदृढ आणि आरोग्यपूर्ण होऊ शकते.

जगभरात या उगवतीच्या शास्त्रामध्ये प्रचंड संशोधन सुरू आहे. दिल्लीतील भारत सरकारच्या जीवतंत्रज्ञान विभागातर्फे संचालित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लान्ट जीनोमिक रिसर्च तसेच पश्चिम बंगालमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स अशा जागतिक कीर्तीच्या जीनोमिक्स संस्था भारतात कार्यरत आहेत. देश-परदेशातील अनेक विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतून या क्षेत्रातील अभ्यासक्रम सादर केले जातात.  या क्षेत्रात खरोखर करिअर करायचे असेल तर संस्थेची काटेकोर निवड गरजेची ठरेल.

खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकाचे तंत्रज्ञान असलेल्या या जीनोमिक्सबद्दल जाणून घेण्याची, त्यात करिअर उभारण्याची संधी म्हणूनच विद्यार्थ्यांनी सोडू नये.

(लेखक केळकर शिक्षण संस्थेच्या सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलुंड येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 1:21 am

Web Title: career in genome technology zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सामान्य विज्ञान – विश्लेषण महत्त्वाचे
2 नोकरीची संधी
3 भारतीय नागरिकत्व
Just Now!
X