योगेश बोराटे

संस्थेची ओळख

त्रिकूट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या आणि ‘मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू शहरामध्ये तावी नदीकिनारी निसर्गरम्य परिसरात जम्मू विद्यापीठाचा विस्तार झाला आहे. सन १९६९ पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर विद्यापीठाचे विभाजन होऊन जम्मू विद्यापीठाची स्वतंत्र निर्मिती झाली. समाजाचा विकास हे उद्दिष्ट ठेवून सुरुवातीपासूनची आपली वाटचाल करणाऱ्या या विद्यापीठाने आता राष्ट्रीय पातळीवरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक संस्थांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’सह नव्याने अस्तित्वात आलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्येही हे विद्यापीठ, आपल्या निर्मितीकाळापासूनचा सोबती असलेल्या काश्मीर विद्यापीठाच्या बरोबरीनेच कामगिरी नोंदवीत आहे. ‘एनआयआरएफ’च्या २०१८ सालच्या क्रमवारीमध्ये हे विद्यापीठ देशात ५१व्या स्थानी आहे.

संकुले आणि सुविधा

जम्मू शहरामध्ये या विद्यापीठाचे मुख्य संकुल आहे. दोन वेगवेगळ्या शैक्षणिक परिसरांमध्ये हे मुख्य संकुल विस्तारले आहे. या दोन्ही परिसरांमध्ये मिळून जवळपास सव्वाशे एकरांच्या जागेतून विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज चालते. त्याशिवाय भडेरवाह आणि कथुआ या दोन ठिकाणांवर विद्यापीठाने स्वतंत्र संकुले उभारली आहेत. जम्मूच्या मुख्य संकुलामध्ये सर्व शैक्षणिक विभाग चालतात. मध्यवर्ती ग्रंथालयाची सुविधाही याच संकुलामध्ये उभारण्यात आली आहे. हे ग्रंथालय धन्वंतरी ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. या ग्रंथालयामार्फत विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास साडेतीन लाखांवर पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. या ग्रंथालयामध्ये जम्मू आणि काश्मीरविषयीच्या पुस्तकांसाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या इतर विभागांमधील सर्व ग्रंथालये या ग्रंथालयाशी जोडण्यात आली आहेत. जम्मूमधील कॅनॉल रोड संकुलामध्ये निवासी सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विद्यापीठामधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची निवासस्थाने आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा समावेश होतो. विद्यापीठ परिसरात विद्यार्थासाठी पाच वसतिगृहे आहेत. यातील तीन मुलांची, तर दोन मुलींची आहेत. विद्यापीठाच्या पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज गेस्ट हाऊसदेखील याच संकुलात आहे.

विद्यापीठाचे बॉटनिकल व कॅक्टस गार्डन हे या विद्यापीठाविषयीचे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र ठरते. वसतिगृहांपासून संबंधित विभाग, ग्रंथालय, प्रशासकीय विभाग, पोस्ट ऑफिस आदी सुविधा अगदी चालत जाण्याच्या अंतरावर असतील अशा पद्धतीने या संकुलाची रचना ठेवण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर सुविधा आहेतच. परंतु विद्यापीठाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर असणाऱ्या व्यक्तींसाठीही आपल्या सुविधांचा विस्तार केला आहे. त्यासाठी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी दूरशिक्षण केंद्राचीही स्थापना केली आहे. १९७६ पासून सुरू असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ व्यावसायिक आणि अव्यावसायिक प्रकारातील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवत आहे.

विभाग आणि अभ्यासक्रम

विद्यापीठाच्या स्थापनेवेळी पदव्युत्तर अभ्यासक्रम देणारे एकूण अकरा विभाग विद्यापीठामध्ये होते. सध्या विद्यापीठात तेहतीस विभागांमधून विविध अभ्यासक्रम चालवले जातात. बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, टुरिझम मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स, एन्व्हायर्नन्मेटल सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, सोशॉलॉजी, सायकॉलॉजी, फिजिकल एज्युकेशन, स्ट्रॅटेजिक अँड रिजनल स्टडीज अशा काही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, तसेच संशोधनांसाठीच्या एम.फिल, पीएच.डी., डी.लिट आदी अभ्यासक्रमांच्या सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधून पदवीपूर्व शिक्षण पुरवले जात आहे. त्यामध्ये नेहमीच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या जोडीनेच बी.एड, मेडिकल एज्युकेशन, इंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजी, आयुर्वेद शिक्षण, संगीत आणि ललित कला आदी अभ्यासक्रमांसाठी म्हणून चालणाऱ्या महाविद्यालयांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या भडेरवाह संकुलामध्ये एमसीए, एमबीए, एम ए इंग्लिश, सर्टिफिकेट कोर्स इन ई-लìनग हे अभ्यासक्रम चालविले जातात. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या कथुआ येथील संकुलामधूनही एमबीए अभ्यासक्रमाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. किश्तवार येथे विद्यापीठाने एमएससी आयटी, पीजी इन काश्मिरी, हायड्रॉलॉजी अँड सॉइल डायनॅमिक्स या विशेष विषयासह जिऑलॉजी विषयातील पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी विद्यापीठाने निर्माण केल्या आहेत. पूंछ येथे सर्टिफिकेट कोर्स इन ई-लìनग फॉर विमेन हा विशेष अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत चालविला जातो. रामनगर आणि रैसी येथील शैक्षणिक संकुलामार्फत विद्यापीठ एमए सोशिओलॉजीचे अभ्यासक्रम चालविते. रामनगरमध्ये विद्यार्थ्यांना एमसीए अभ्यासक्रम शिकण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या उधमपूर संकुलामध्ये एम. कॉम आणि एम. ए. इकोनॉमिक्स हे अभ्यासक्रम चालतात. तर, दोडा संकुलामध्येही सर्टिफिकेट कोर्स इन ई-लìनगची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन जेनेटिक्स विभागामध्ये ह्य़ुमन जेनेटिक्स विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविला जातो. परिसरातील पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या अभ्यासक्रमांवरही या विद्यापीठाने विशेष भर दिला आहे. त्याचीच परिणती म्हणून की काय, विद्यापीठाने फॅकल्टी ऑफ बिझनेस स्टडिजअंतर्गत स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट विभागामध्ये एमबीए हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम, बीबीए हॉटेल मॅनेजमेंट, ग्लोबल डेस्टिनेशन मॅनेजमेंट या विषयातील पदव्युत्तर पदविका आणि टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या विषयातील पीएच.डी. अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

विद्यापीठाच्या लॉ स्कूलमध्ये पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रमही चालविला जातो. याशिवाय विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ स्टॅटेजिक अँड रिजनल स्टडिजही वेगळ्या अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते.