राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये दाखल झालेला ज्ञानरचनावाद हा नवा प्रवाह यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक धोरण ठरविणाऱ्या तज्ज्ञ मंडळींबरोबरच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्याविषयी..

‘मी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवतो आणि माझे विद्यार्थी माझ्या शिकवण्यावर खूप खूश असतात,’ अशी आत्मस्तुती करणारे शिक्षक आपल्याला आढळतात. पण मुळात ‘शिकवणे’ असा काही प्रकारच अस्तित्वात नसतो; अस्तित्वात असते ते फक्त ‘शिकणे’!
शिकवण्यापेक्षा ‘शिकणे’ महत्त्वाचे. प्रत्येक मुलाला स्वतंत्र अस्तित्व असतं आणि आपल्याला आलेल्या अनुभवांमधून ते शिकत असतं, अशा महत्त्वाच्या वैचारिक बठकीवर म्हणजेच ज्ञानरचनावाद आणि सर्जनशीलता यांवर आधारित ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ (ठउा-२००५) तयार झाला. संपूर्ण देशाचा शिक्षणप्रवाह कसा असला पाहिजे, मुलांना शिक्षण देऊन आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे याचं मार्गदर्शन या आराखडय़ात केलं आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली देशातल्या अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, संशोधक यांचा समावेश असलेल्या समितीने हा आराखडा तयार केला आहे. अर्थात, आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात आढळणारी विविधता लक्षात घेऊन हा आराखडा देशातल्या प्रत्येक राज्याने जसाच्या तसा स्वीकारण्याची सक्ती नाही. म्हणूनच स्थानिक वैविध्य आणि गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्राने ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’च्या आधाराने ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा २००५’ आणि त्यानंतर ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१०’ तयार केले.
आता शिक्षण हे मुलाला पारंपरिक पद्धतीने शिकवून द्यायचं नाही तर मग अभ्यासक्रम, पाठय़पुस्तकं, शिक्षक कशाला पाहिजेत, असा स्वाभाविक प्रश्न मनात येईल. शिकण्याच्या या ज्ञानरचनावादी प्रक्रियेत या सर्व घटकांचं महत्त्व खरं तर वाढलंय.
अनेकदा असं म्हटलं जातं की, ‘योजना चांगली आहे; पण ती कागदावरच राहते आहे. प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी झाल्याचं दिसत नाही’. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा यांची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी या आराखडय़ांमध्ये मांडलेले विचार अभ्यासक्रमात प्रतििबबित होणं गरजेचं आहे. कारण अभ्यासक्रमात हे विचार आले तर ते पाठय़साहित्यामध्ये येतील आणि पाठय़साहित्यातून ते शिक्षकापर्यंत पोहोचतील.
वर्गात जाण्यापूर्वी शिक्षकाने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, राज्य अभ्यासक्रम आराखडा यांचा अभ्यास करावा, असं अपेक्षित आहे. या अभ्यासक्रम आराखडय़ांचं वाचन शिक्षकांना सक्तीचे करावे, असाही काहीजणांचा मतप्रवाह आहे. पण शिक्षकाने अभ्यासक्रम आराखडे वाचले की शिक्षण प्रक्रियेत बदल होईल असं समजणं योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे, प्रत्येक शिक्षकाने अभ्यासक्रम आराखडे वाचलेच पाहिजेत, अशी अपेक्षा ठेवणं व्यावहारिकदृष्टय़ा चुकीचं वाटतं. त्याऐवजी शिक्षकाच्या हातात पडणारं पाठय़साहित्य जर तेवढं सक्षम असेल तर अभ्यासक्रम आराखडय़ांमध्ये मांडलेल्या विचारांची आपोआप अंमलबजावणी होईल.
आपल्या राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बदलण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांत म्हणजे २०१४-१५ मध्ये तिसरी, पाचवी आणि सातवीचा पाठय़क्रम बदलेल, तर २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत चौथी, सहावी आणि आठवीचा पाठय़क्रम बदलेल. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातून निवृत्त झालेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. व्यंकटेश गंभीर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने विज्ञानाचा हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
अभ्यासक्रम बदलातील नवीन विषय योजनेनुसार विज्ञान हा स्वतंत्र विषय म्हणून इयत्ता सहावीपासून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम आणि इयत्ता नववी, दहावीचा अभ्यासक्रम अशा दोन्ही टोकांच्या इयत्तांच्या अभ्यासक्रमाशी इयत्ता सहावी ते आठवीचा अभ्यासक्रम सलग ठेवण्याची काळजी घेतलेली आहे.
या अभ्यासक्रमाची विभागणी सात केंद्रविषयांमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रविषयातील घटक आणि उपघटकांची आखणी ही मुलांचा वयोगट, त्याचं अनुभवविश्व आणि त्यांचं पूर्वज्ञान लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे. प्रत्येक केंद्रविषयातील घटकांचा विस्तार इयत्तेनुसार विस्तारण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जीवसृष्टी या केंद्रविषयात प्राणी आणि वनस्पतींमधील विविधतेची जाण सहावीमध्ये, अधिवासानुसार सजीवांमध्ये आढळणारे अनुकूलन, सूक्ष्मजीवांची कल्पना, त्यांची उपयुक्तता आणि उपद्रव यांसारखे घटक सातवीमध्ये, तर मानवी इंद्रिय संस्था आणि त्यातील अवयव यांसारखे घटक आठवीच्या अभ्यासात समाविष्ट करण्यात आले आहेत.
केवळ घोकंपट्टी करून माहिती मिळवण्याऐवजी या विज्ञान अभ्यासक्रमामध्ये ज्ञानाची रचना करण्याच्या संधी निर्माण केल्या आहेत. उदाहरणार्थ, पाळीव प्राणी ही संकल्पना स्पष्ट करताना केवळ पाळीव प्राण्यांची यादी देऊन चालणार नाही; तर पाळीव प्राणी कोणाला म्हणायचं हे मुलांना समजण्याची गरज आहे. त्यासाठी ‘केवळ आपल्या घरात आढळते म्हणून पालीला आपण पाळीव प्राणी म्हणायचे का’, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांचं अनुभवविश्व वाढावं यासाठी परिसरातले जनावरांचे दवाखाने, कुक्कुटपालन केंद्रात आणि जनावरांच्या गोठय़ात केल्या जाणाऱ्या विशेष सुविधा, प्राणी संग्रहालयात असलेली पशुवैद्यकाची गरज याकडे या उपघटकात लक्ष वेधलं आहे. त्याचप्रमाणे, सजीव व निर्जीव या संकल्पना स्पष्ट करताना मूल आपल्या अनुभवविश्वानुसार निकष लावून समोरची वस्तू सजीव आहे किंवा निर्जीव आहे हे ठरवतं. पण कुत्रा सजीव आहे, हे ओळखण्यासाठी जे निकष लावले जातात, तेच निकष एखादं झाड सजीव आहे, हे ओळखण्यासाठी लावले जात नाहीत. अशा बाबींचा ऊहापोह अभ्यासक्रमात केलेला आहे. थोडक्यात, ‘ज्ञानरचनावाद’ हा केवळ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात न ठेवता तो अभ्यासक्रमात कसा येईल, हे पाहिलं आहे.
प्रत्येक इयत्तेसाठी घटक, उपघटक आणि त्यांची व्याप्ती निश्चित करताना त्यासंदर्भातले कोणते महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे स्पष्ट झालेच पाहिजेत, हे स्वतंत्र रकान्यामध्ये दिलेले आहेत. हे मुद्दे पाठय़साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांना आणि शिक्षकांना उपयुक्त आणि दिशादर्शक ठरतील.
ज्ञानाची रचना करण्याचा प्रयत्न असा वेगळ्या पद्धतीने केल्यावर मुलांनी अपेक्षित पातळी गाठली आहे का, कोणतं मूल कोणत्या टप्प्यावर आहे, हे तपासण्यासाठी मूल्यमापन कसं करावं याबाबतसुद्धा अभ्यासक्रम आराखडय़ांमध्ये मार्गदर्शक तत्त्वं
दिलेली आहेत. ही तत्त्वं अभ्यासक्रमात प्रतििबबित झाल्याचं आढळतं. पाठय़क्रमाशी संबंधित जीवनातले अनुभव, केलेली निरीक्षणं, मिळालेली माहिती इत्यादींचा विचार चिकित्सकपणे स्वत: करून अंदाज करणे, समस्या निराकरण यांसारखी कौशल्ये मुलांमध्ये विकसित होण्यासाठी शिक्षकाने जाणीवपूर्वक
कोणत्या संधी निर्माण कराव्यात, याचे काही नमुने प्रत्येक घटकासाठी दिलेले आहेत. विज्ञानाच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक शिकून झाला
आहे, हे समजण्यासाठी म्हणजेच मूल्यमापन करण्यासाठीसुद्धा या नमुन्यांचा उपयोग करता येईल. अर्थात, हे नमुने केवळ उदाहरणादाखल दिलेले आहेत. मुलांच्या पातळीनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य शिक्षकांना आहेच.
अभ्यासक्रमात प्रतििबबित झालेला हा ज्ञानरचनावाद पाठय़साहित्यामध्ये आणि पाठय़साहित्यातून शिक्षकांच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये दाखल झालेला हा नवा प्रवाह यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक धोरण ठरविणाऱ्या तज्ज्ञ मंडळींबरोबरच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. नवा भारत घडविण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पेलावी, ही अपेक्षा आहे.   

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

(प्रस्तुत लेखक महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक अभ्यासक्रम मंडळाच्या विज्ञान गटाचे सदस्य आहेत)