19 September 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : आंतरराष्ट्रीय संबंध

या घटकाच्या विस्तृत स्वरूपामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना त्यावर प्रभुत्व मिळविणे आवाक्याबाहेरचे वाटते.

प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये प्रामुख्याने भारताचे इतर देशांशी व आंतरराष्ट्रीय संघटनांशी असलेले संबंध, आंतरराष्ट्रीय संघटना, जगभरामध्ये मोठय़ा संख्येने असलेले परदेशस्थ भारतीय या विविध घटकाचा समावेश होतो. हा अभ्यास घटक समकालीन असल्याने भारताशी संबंधित आणि भारताच्या हितसंबंधांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या जगभरातील घडामोडींचा नियमितपणे मागोवा घेणे श्रेयस्कर ठरते.

या घटकाच्या विस्तृत स्वरूपामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना त्यावर प्रभुत्व मिळविणे आवाक्याबाहेरचे वाटते. पण इतर अभ्यासघटकांप्रमाणेच यातील स्थिर स्वरूपाचा भाग उदा. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विकास. यामध्ये अलिप्ततावादी धोरण, पंचशील तत्त्वे, समाजवादाप्रति व सोव्हिएत रशियाशी असणारी जवळीक, ‘पूर्वेकडे पाहा’ धोरण, गुजराल सिद्धांत आदी बाबींचा समग्र आढावा घेऊन मागील काही दशकामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले बदल उदा. शीतयुद्ध, सोव्हिएत रशियाचे पतन, एक ध्रुवीय जग, ९/११ चा हल्ला व या बदलांचा प्रतिसाद म्हणून भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये केलेला बदल व अवलंबलेल्या विविध रणनीतींचे सूक्ष्म आकलन करून घेतल्यास आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकावर प्रभुत्व मिळविणे सुलभ होईल.

या अभ्यासघटकाची उकल करताना सर्व प्रथम भारत व शेजारील देश यातील संबंध या उपघटकाचा विचार करूयात. यामध्ये भारताचे चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव या देशांशी असणाऱ्या संबंधाचे अध्ययन करावे लागेल. भारताचे शेजारील देशांशी संबंध अभ्यासताना संबंधांचे महत्व, ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर्थिक संबंध व समकालीन मुद्दे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. उदा. भारत-पाकिस्तान या दोन देशांचे संबंधांचे अध्ययन करताना ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर्थिक संबंध व सीमावाद, दहशतवाद, काश्मीर प्रश्न, द्विपक्षीय चर्चा इ. बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच भारत-बांग्लादेश संबंध अभ्यासताना, भू-सीमा करार, पाणी वाटप विवाद, बेकायदेशीर स्थलांतर, आसाममधील हिंसाचार या बाबींचा विचार करावा लागतो. या अभ्यास घटकातील दुसऱ्या उपघटकांमध्ये भारताचे द्विपक्षीय संबंध अभ्यासावे लागतील. उदा. भारताचे जपान, रशिया, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, आदी देशांबरोबरच्या संबंधाचे अध्ययन करावे. भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी पश्चिम आशिया आणि मध्य आशिया या प्रदेशातील देशांसोबतचे संबंध अभ्यासणे आवश्यक आहे. भारताच्या प्रादेशिक गटांबरोबर असलेल्या संबंधामध्ये सार्क, इब्सा, ब्रिक्स, बिम्स्टेक, असियान आदी प्रादेशिक गटांबरोबरच्या संबंधाचा अभ्यास करावा. तसेच जागतिक व्यापार संघटना, जी-२०, संयुक्त राष्ट्रसंघ, एशियन डेव्हलपमेंट बँक, इस्ट एशिया समीट, अ‍ॅपेक (Asia-Pacific Economic Cooperation) ओइसीडी (Organisation for Economic Co-operation and Development), नाटो आदी आंतरराष्ट्रीय गटासोबतच्या संबंधाविषयी तयारी करावी. उपरोक्त संबंध, सीमावाद, बौद्धिक संपदा अधिकार, जागतिक पर्यावरणीय वाटाघाटी, व्यापारविषयक वाटाघाटी व विवाद, दहशतवादाशी सामना, संरक्षण व सुरक्षाविषयक करार, जागतिक शांतता आदी बाबींच्या अनुषंगाने पाहणे महत्वपूर्ण ठरते. भारत व संयुक्त राष्ट्रसंघ संबंध अभ्यासताना, भारताचे सयुंक्त राष्ट्र संघातील योगदान उदा. शांतता मोहिमांमधील सहभाग, सुरक्षा परिषदेचा विस्तार व भारताचे सुरक्षा परिषदेचा विस्तार व भारताचे सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न आदी बाबींच्या अनुषंगाने करावे.

विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवर होणारा परिणाम उदा. अमेरिका—इमिग्रेशन विधेयक, एच१इ व्हिसा, बौद्धिक संपदा अधिकार याबाबतची धोरणे, तसेच सौदी अरेबिया, चीन इ. देशांच्या देशांतर्गत धोरणे भारतावर परिणाम करतात. विविध देशांमध्ये वास्तव्यास असणारे परदेशस्थ भारतीय नागरिक यासंबंधींच्या ओसीआय (डउक), पीआयओ (ढकड), अनिवासी भारतीय, नागरिकत्वासंबंधीचे मुद्दे इ. बाबींचे आकलन करून घ्यावे. यानंतर भारतातील त्यांचे सांविधानिक अधिकार वैधानिक तरतुदी उदा. मतदानाचा अधिकार, ओसीआय व कार्डाचे सम्मीलीकरण आदी बाबी अभ्यासाव्यात. परदेशस्थ भारतीयांचे भारतासाठीचे योगदान, ते वास्तव्य करत असलेल्या देशातील समस्या, विविध घटना, घडामोडी, राजवटी, धोरणे कशा प्रकारे भारताच्या हितसंबंधाना प्रभावित करतात हे पाहणे संयुक्तिक ठरेल. परदेशस्थ भारतीय कामगारांच्या संरक्षणासाठी व कल्याणासाठी भारत सरकार राबवत असलेल्या योजना, ट्रॅक २ डिप्लोमसीतील त्यांचा सहभाग आदी मुद्दे पाहणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वपूर्ण संघटना, संस्था व फोरम कार्यरत आहेत. उदा. संयुक्त राष्ट्रसंघ व त्यातील युनेस्को, जागतिक आरोग्यसंघटना, युनिसेफ आदी संस्था, त्यांची रचना, उद्दिष्टे पाहावीत. याबरोबर जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यासारख्या आर्थिक व व्यापारविषयक संघटना, त्यांची रचना आदींचे अध्ययन करावे.

परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या मूलभूत आकलनाकरिता ‘इंडिया सिन्स इंडिपेंडन्स’ या एनसीआरटीच्या क्रमिक पुस्तकाबरोबरच नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशीत केलेले ‘इंडियाज फॉरेन पॉलिसी’ – व्ही. पी. दत्त, ‘पॅक्स इंडिका’ – शशी थरुर व ‘इंडियाज फॉरेन पॉलिसी चॅलेंज अँड स्ट्रॅटेजी रिथिकिंग’ — राजीव व सिक्री हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनांविषयक मूलभूत आकलनाकरिता बाजारात उपलब्ध कोणतेही एक गाइड पुरेसे ठरते.

समकालीन स्वरूपामुळे आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण या अभ्यासघटकांची तयारी नियमितपणे करावी लागते. याकरिता दररोज वृत्तपत्रे, मासिके तसेच सरकारी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे या विषयाशी निगडीत लेख वाचावेत. यासाठी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आदी वर्तमानपत्रे उपयुक्त आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावरचे अभ्यासक सी. राजामोहन यांचे लेख पहावेत. या बरोबरच वर्ल्ड फोकस मासिक, परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ, परराष्ट्र मंत्रालयाचा वार्षिक अहवाल आदी स्रोत या अभ्यासघटकाशी निगडित चालू घडामोडींची तयारी करण्यास पुरेसे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2020 2:06 am

Web Title: mpsc exam 2020 mpsc exam preparation in marathi zws 70 2
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० – उच्च शिक्षणातील पुनर्रचना
2 यूपीएससीची तयारी : सामाजिक न्याय
3 एमपीएससी मंत्र : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
Just Now!
X