News Flash

एमपीएससी मंत्र : राज्य लोकसेवा आयोग आरक्षण तरतुदी

सन २०२०चे आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक मागील महिन्यामध्येच घोषित झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

सन २०२०चे आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक मागील महिन्यामध्येच घोषित झाले आहे. त्यानुसार वेगवेगळ्या परीक्षांच्या अधिसूचना जाहीर होत राहतील आणि अर्ज भरणे, शुल्क भरणे, कागदपत्रांची तयारी अशी अभ्यासबाह्य पण अत्यंत आवश्यक अशी कामेही चालू होतील. अर्ज भरताना उमेदवारांमध्ये एक नेहमीची साशंकता किंवा भीती असते ती, आरक्षणविषयक तरतुदी आणि त्यांचा लाभ मिळेल की नाही किंवा कसा घेता येईल याबाबत. आयोगाच्या अधिसूचनेमध्ये खुलासेवार तरतूदी दिलेल्या असल्या तरी तयारीचा ताण, ऑनलाइन प्रणालींमध्ये येणारे अडथळे त्यातच अधिसूचनेची बोजड शासकीय भाषा यामुळे तटस्थपणे या तरतुदी समजून घेणे आणि निशंकपणे अर्ज भरून परीक्षेला सामोरे जाणे सहज शक्य होत नाही. त्यातच आरक्षणाबाबत होणारे नवनवे निर्णय आणि त्यांची कायदेशीर ग्राता माहीत नसल्याने आपले काय होणार हा प्रश्न वारंवार भेडसावत राहतो. या लेखामध्ये सद्यस्थितीत लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षांमध्ये अवलंबण्यात येणारे आरक्षणविषयक धोरण स्पष्ट करण्यात येत आहे.

* आरक्षणाचे प्रकार    (Verticle)

उभ्या आरक्षणामध्ये सामाजिक प्रवर्गानुसार अनूसूचित जाती, जमाती, भटक्या/विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, सामाजिक-आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग इत्यादी प्रवर्ग येतात.

*    समांतर (Parallel)

यामध्ये वैयक्तिक वैशिष्टय़ांनुसार महिला, दिव्यांग, अनाथ, गुणवत्ताधारक खेळाडू, माजी सैनिक इत्यादी आरक्षणे येतात. समांतर आरक्षणे ही प्रत्येक उभ्या आरक्षण प्रवर्गामध्ये वाटली जातात. उदाहरणार्थ खुल्या, अनूसूचित जाती, जमाती, भटक्या/विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, सामाजिक-आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग अशा सर्व उभ्या प्रवर्गासाठी उपलब्ध जागांमधील प्रत्येकी ३० टक्के जागा त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असतात.

आरक्षणाचे फायदे

* कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत अमागास (खुला) प्रवर्गासाठी परीक्षा देण्याची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा पुढीलप्रमाणे शिथिल करण्यात आली आहे

* दिव्यांग व्यक्ती आणि खुल्या प्रवर्गातील महिला वगळून इतर सर्व प्रवर्गासाठी ४३ वर्षे.

* दिव्यांग व्यक्तींसाठी ४५ वर्षे

* गट क आणि ड मध्ये प्रवेशासाठी माजी सनिकांना त्यांचा एकूण सेवा कालावधी अधिक तीन वर्षे इतकी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

* खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी वयोमर्यादेमध्ये सवलत नाही. (म्हणजेच ३८ वर्षे)

* गुणांची सीमारेषा व संभाव्य सवलत

* पूर्वपरीक्षेतून उपलब्ध पदांच्या १२ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी उपलब्ध होतील अशा प्रकारे सर्वसाधारण सीमारेषा निश्चित करण्यात येते. राखीव प्रवर्गासाठीच्या पदांसाठी बारापट उमेदवार उपलब्ध न झाल्यास सीमारेषा खाली ओढण्यात येते म्हणजे कमी गुणांवर आणण्यात येते.

* उपलब्ध पदांच्या तिप्पट उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध व्हावेत अशा पद्धतीने मुख्य परीक्षेच्या लेखी परीक्षेचा निकाल लागतो. लेखी परीक्षेसाठी शतमत (Percentile) पद्धती लागू आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या किमान ३५ शतमत गुण अमागास उमेदवारांसाठी, सर्व मागास प्रवर्गासाठी ३० तर दिव्यांग आणि खेळाडू उमेदवारांसाठी २० शतमत इतके गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत.

* पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि अंतिम निकाल लागताना सर्वसाधारणपणे खुल्या प्रवर्गासाठीचा cut off (गुणांची सीमारेषा) हा आरक्षित/राखीव प्रवर्गाच्या cut off  पेक्षा जास्त असणे अपेक्षित असते. म्हणजे राखीव प्रवर्गातून उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गापेक्षा कमी गुण असले तरी चालतील असे अपेक्षित असते. मात्र भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीचा कट ऑफ हा सातत्याने खुल्या प्रवर्गापेक्षा जास्त लागत असल्याचेही दिसून येते. याचे कारण उपलब्ध जागा कमी आणि उत्तम गुण मिळवणारे उमेदवार अपेक्षेपेक्षा जास्त!

निवड आणि शिफारशीसाठीच्या तरतुदी

* अनाथ उमेदवारांना केवळ खुल्या प्रवर्गामधून समांतर आरक्षण उपलब्ध आहे.

* एकूण उपलब्ध पदांच्या ४% इतके सरळ आरक्षण दिव्यांग उमेदवारांसाठी आहे. त्यांचेसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी बनविण्यात येते. दिव्यांग उमेदवार कोणत्याही सामाजिक-आर्थिक प्रवर्गातील असला तरी त्याचा याच यादीमध्ये समावेश होतो. त्याच्या सामाजिक प्रवर्गातील समांतर आरक्षणासाठी विचार करण्यात येत नाही.

* विमुक्त जाती, भटक्या जमाती (ब),

(क), (ड) या चार प्रवर्गातील आरक्षणाची पदे आंतर परिवर्तनीय आहेत. याचा अर्थ उदाहरणार्थ, यापैकी भटक्या जमाती (ब) प्रवर्गाच्या आरक्षित पदासाठी त्या प्रवर्गाचा पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तर इतर तीन प्रवर्गातील पात्र उमेदवारांचा त्या पदासाठी विचार करण्यात येतो.

* जर राखीव प्रवर्गातील उमेदवारास खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळाले असतील आणि तो वय व इतर निकषांप्रमाणे खुल्या प्रवर्गातील पात्रतेमध्ये बसत असेल तर त्याचा खुल्या प्रवर्गातून शिफारशीसाठी विचार करण्यात येतो.

* मात्र जे उमेदवार पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये राखीव प्रवर्गासाठी खाली आणलेल्या सीमारेषेनुसार उत्तीर्ण झाले आहेत त्यांचा अंतिम निकालापर्यंत त्याच प्रवर्गातील राखीव पदांसाठी विचार करण्यात येतो.  पुढील टप्प्यामध्ये अशा उमेदवारांच्या प्रवर्गातील सीमारेषा खुल्या प्रवर्गापेक्षा जास्त निश्चित झाली असल्यास उमेदवार खुल्या प्रवर्गातील सीमारेषेच्या वर गुण असले तरी त्यांचा खुल्या प्रवर्गामध्ये विचार होत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 2:33 am

Web Title: mpsc exam preparation in marathi mpsc study tips in marathi zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी
2 विद्यापीठ विश्व : तंत्रज्ञानाचे माहेरघर
3 महाराष्ट्र विधानसभा चालू घडामोडी सराव प्रश्न
Just Now!
X