News Flash

एमपीएससी मंत्र : कृषिसेवा पूर्वपरीक्षा इंग्रजीची तयारी

प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन सेन्स यांची खूप मदत होते

फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एक मराठी घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये इंग्रजी घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी १५ प्रश्न इंग्रजी भाषा घटकाचे आहेत. पेपरचा स्तर पदवी परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल अशा काठिण्य पातळीचा असल्याचे लक्षात येते.

या पेपरच्या अभ्यासक्रमाचे ढोबळमानाने भाषिक आकलन (शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार व उताऱ्यावरील प्रश्न) आणि व्याकरण (शब्दांचे प्रकार, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती (case), आणि वाक्यरचनेतील काळ, प्रयोग आणि वाक्याचे प्रकार, Degrees of comparison, direct & indirect speech) असे दोन भाग दिसून येतात.

भाषिक आकलन

* समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे / स्पेलिंगचेपण वेगळे अर्थ असणारे शब्द अशा वेळी फसवे ठरतात. उदा. Decent आणि descent या शब्दामध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

* एकाच शब्दाचे पूर्णपणे वेगळे असे अर्थ असू शकतात. उदा. Sanction या शब्दाचे मान्यता देणे आणि शिक्षा देणे असे जवळजवळ विरोधी अर्थ आहेत. ते वाक्यातील संदर्भातून समजून घेणे आवश्यक आहे.

* म्हणी व वाक्प्रचार हा या पेपरमधील खूप महत्त्वाचा भाग आहे. यावरील

प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन सेन्स यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे भाषेतील म्हणी, वाक्प्रचार वारंवार नजरेखालून जातात आणि त्यांचा समर्पक अर्थही लक्षात येतो व राहतो.

* तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले

छोटेसे पुस्तक किंवा पिंट्रआउट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा.

* उताऱ्यावरील प्रश्न आतापर्यंत विचारलेले नसले तरी त्यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने त्यांचीही तयारी आवश्यक आहे. यासाठी सराव हाच महत्त्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष पेपर सोडविताना आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.

व्याकरण

* अभ्यासक्रमामध्ये वाक्यरचना आणि व्याकरण यांचा वेगवेगळा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांवरील प्रश्नांची संख्या कमी-जास्त होऊ शकते हे लक्षात घेऊन वाक्यरचना हा भाग जास्त भर देऊन अभ्यासावा लागेल.

* वाक्यरचनेमध्ये काळ आणि प्रयोग यांची उदाहरणे नुसती पाठ करून वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविता येत नाहीत. त्या त्या काळाची किंवा प्रयोगाची वाक्यरचना, त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद, अव्यये यांचे स्थान व इतर घटकांशी संबंध व्यवस्थित समजून घेतले तर हे प्रश्न सोडविणे सहज सोपे होते.

* इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचे कोष्टक पाठ करायला हवे. या कोष्टकामध्ये रोज एका वाक्याचे सगळ्या काळ आणि प्रयोगात रूपांतर करायचा सराव करत राहिल्यास नियम पक्के लक्षात राहतील. या सरावाने वाक्यातील काळ आणि प्रयोगाच्या रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात.

* Degrees of comparison, direct & indirect speech यांच्यासाठीसुद्धा नियमाच्या आधारे सराव करणे हाच तयारीचा उत्तम पर्याय आहे. वाक्य पृथकरण (Clauses) हा घटक अवघड वाटत असल्यास त्याचा आढावा घेऊन बाजूला ठेवला तरी चालण्यासारखे आहे.

* उर्वरित व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमामध्ये शब्दांच्या जातीचा (Parts of Speech) स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच व्याकरणदृष्टय़ा कोणते वाक्य बरोबर आहे, अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषी वाक्यरचना यासाठीचे कोष्टक आणि महत्त्वाच्या क्रियापदांची past participle, past perfect participle यांचे कोष्टक पाठच असायला हवे.

व्याकरण हा नेमक्या नियमांनी बनलेला घटक असल्याने नियम व्यवस्थित समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतील. अर्थात पदवी परीक्षेची काठिण्य पातळी आहे म्हटल्यावर व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागणार नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच प्रश्न व्यवस्थित सोडविता येतील. या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये शब्दरचना / वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:15 am

Web Title: mpsc exam preparation tips tricks for mpsc exam preparation zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : नीतिनियमविषयक विचारसरणीची चौकट
2 विद्यापीठ विश्व : आशिया खंडातील अभिनव विद्यापीठ
3 घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था व पदे
Just Now!
X