29 March 2020

News Flash

यूपीएससीची तयारी : विद्यार्थ्यांना पडणारे सर्वसाधारण प्रश्न..

UPSC मुख्य परीक्षेतील एकूण १७५० गुणांपैकी ५०० गुणांचे वेटेज असलेला पेपर म्हणजे वैकल्पिक विषयांचे प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर्स होय

(संग्रहित छायाचित्र)

केतनकुमार पाटील

यूपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांच्या मनात काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत द्विधा स्थिती आढळते. या प्रश्नांवर फार घाईगडबडीने नाही, परंतु विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते. तसेच आपण घेतलेल्या निर्णयाशी बांधील राहणे गरजेचे असते. आजच्या लेखात असे काही महत्त्वाचे मुद्दे आपण विचारात घेणार आहोत. हे मुद्दे पुढीलप्रमाणे – भाषा माध्यमाची निवड, वैकल्पिक विषयाची निवड, परीक्षेच्या तयारीसाठी संगणकाचा वापर आणि अभ्यास साहित्याचा/संदर्भग्रंथाचा वापर इत्यादी होय.

नमूद केलेल्या सर्व मुद्दय़ांची थोडक्यात चर्चा करू या.

१) भाषा माध्यमाची निवड –

UPSCच्या परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा हा मुख्य परीक्षेचा असतो, या टप्प्यावर आपण सविस्तर उत्तरे लिहीत असतो व आपल्या या लिहिण्यास किंबहुना मतप्रदर्शन व विश्लेषणास गुणदान होते, यासाठी व्यक्त होताना आपण आपल्या मातृभाषेत अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ की हिंदी व इंग्रजीमध्ये व्यक्त होऊ, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो.

थोडक्यात, मुख्य परीक्षेची उत्तरे कोणत्या भाषेच्या माध्यमातून लिहावीत, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था असते. मराठी, हिंदी व इंग्रजी यांपैकी कुठलीही भाषा उत्तर लेखनासाठी निवडल्याने गुणप्राप्तीत कुठल्याही प्रकारे बदल होत नाहीत, पण आपण निवडलेल्या भाषा माध्यमामुळे कमीत कमी कालावधीत आशय मांडताना आपली अडचण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Choice of words योग्य असेल, याकडे कटाक्ष असावा. उत्तराचे माध्यम म्हणून भाषेची निवड हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे यूपीएससीच्या अभ्यासाची तयारी सुरू करण्यापूर्वीच या निर्णयावर सर्व बाजूंनी विचार करून शिक्कामोर्तब करावे.

२) वैकल्पिक विषयाची निवड :

UPSC मुख्य परीक्षेतील एकूण १७५० गुणांपैकी ५०० गुणांचे वेटेज असलेला पेपर म्हणजे वैकल्पिक विषयांचे प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर्स होय. साहित्य, तांत्रिक, व्यावसायिक विषय व कला-विज्ञान या विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश असलेल्या विषयांपैकी आपण कुठलाही एक विषय नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय म्हणून निवडणे गरजेचे आहे आणि तो विषय पूर्व परीक्षेचा अर्ज भरताना नमूद करणे गरजेचे असते. (उदा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, व्यवस्थापन, तत्त्वज्ञान ते यांत्रिक अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र वगरे.) वैकल्पिक विषयाची निवड करताना संबंधित विषयाचे सखोल मार्गदर्शन उपलब्ध होणे, संबंधित विषयाचे दर्जेदार साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे,

विषय शिक्षकांकडून त्या विषयांचे शंकानिरसन व UPSCच्या धर्तीवर सराव चाचणी तपासून मिळणे असे काही निकष लावून वैकल्पिक विषयाची निवड करता येईल. याशिवाय अशी निवड करण्याकरिता या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ, विद्यार्थी आणि परिचित अधिकारी यांचे मार्गदर्शन देखील उपयुक्त ठरू शकते.

३) परीक्षेच्या तयारीसाठी संगणकाचा वापर :

UPSC चा अभ्यास करताना महत्त्वाचा घटक म्हणजे या अभ्यासात आपण आपली स्वत:ची मते बनविणे, ती विवेकी आणि तर्कसुसंगत आणि काळाच्या कसोटीवर खरी असणे गरजेची असतात. एखादी घटना घडल्यास त्याची माहिती संगणकावर चटकन उपलब्ध होते आणि त्या घटनेविषयी विविध अंगाने माहिती देणारे अनेक दर्जेदार संदर्भही चटकन मिळू शकतात. उपलब्ध साहित्यांतून कुठले साहित्य वाचावे, हा ‘माहितीच्या विस्फोटा’तून उभा राहिलेला कळीचा मुद्दा आहे. परंतु दर्जेदार संदर्भसाहित्य वाचून आपल्या विश्लेषण क्षमतांचा विकास करावा. अगोदर आपण वाचलेले, टिपण काढलेले साहित्य तयार करावे मगच अधिकच्या माहितीसाठी आपण संगणकाचा वापर करू शकतो. कारण संगणकावरून संदर्भ साहित्य मिळवणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि उपलब्ध झालेले साहित्य किती अस्सल आहे, हे ठरविण्याचे आपल्याकडे कोणतेही मापदंड नाहीत. एखाद्या विषय घटकाचे संदर्भ साहित्य उपलब्ध होत नसेल किंवा एखाद्या मुद्दय़ाबाबत अधिक माहिती वाचायची असल्यास संगणकाचा जरूर वापर करावा.

४) अभ्यास साहित्याची निवड :

आयोगाच्या प्रश्नपत्रिका, NCERT ची क्रमिक पुस्तके वाचून झाल्यानंतर संबंधित विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी संदर्भग्रंथांची निकड असते. परीक्षेच्या तयारीसाठी कोणतेही संदर्भ साहित्य/ग्रंथ निवडताना आपण पुढील काही निकषांचा वापर करावा. उदा. स्पर्धा-परीक्षेचा व्याप-विस्तार ध्यानात घेऊन पुस्तक लिहिले आहे का? माहितीचा/आकडय़ांचा व्याप वगळताही विश्लेपषणात्मक भाग आहे का?

भाषा व संदर्भाची अद्ययावतता इत्यादी. याआधारे आपण निर्णय घ्यावा.  परीक्षेची तयारी सुरू करताना वर नमूद केलेल्या घटकांविषयी आपण कोणता निर्णय घेतो, यावर आपल्या अभ्यासाची दिशा आणि परिणामकारकता अवलंबून असते, एवढे मात्र नक्की.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2020 12:01 am

Web Title: mpsc frequently asked questions for students abn 97
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : उतारा वाचन (आकलनाची चाचणी)
2 करिअर क्षितिज : स्टेम सेल तंत्रज्ञान..
3 यूपीएससीची तयारी : प्रमुख सेवांची ओळख
Just Now!
X