वसुंधरा भोपळे

तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर नुकतेच निवार हे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ धडकले आहे. या चक्रीवादळाचे निवार हे नाव इराणने सुचविले आहे. निवार या शब्दाचा अर्थ प्रतिबंध असा होतो. जागतिक हवामान संघटना(WMO) आणि संयुक्त राष्ट्राच्या Economic and Social Commission for Asia and the Pacific (ESCAP) यांच्यामध्ये २००० साली झालेल्या करारानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांना नावे बहाल केली जातात. बंगालच्या उपसागरातून या वर्षी आलेले हे दुसरे चक्रीवादळ आहे, मे महिन्यात अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते.

IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे

सागरी क्षेत्रावर ५ ते २० या अक्षांशीय पट्टय़ामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन या कमी दाबाची तीव्रता एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे पोहोचली की हवेला भोवऱ्यासारखी चक्राकार गती प्राप्त होते आणि उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांची निर्मिती होते. चक्रीवादळाचा उगम २६० ते २७० से. तापमान असलेल्या सागरी पृष्ठावर होतो. चक्रीवादळाची तीव्रता कमी दाब क्षेत्राशी संबंधित असलेल्या वाऱ्याच्या गतीवरून ठरविली जाते. चक्रीवादळात वाऱ्याची गती ६३ किमी/तास (३४ नॉट) वा अधिक तर तीव्र चक्रीवादळात ती ८८ किमी/तास (४८ नॉट) वा अधिक असते आणि अति तीव्र चक्रीवादळातील वाऱ्याची गती ११८ किमी/तास (६४ नॉट) वा अधिक असते. वाऱ्याची गती नॉट या एककात मोजली जाते. एक नॉट म्हणजे १.८५२ किमी/तास वेग होय. अति तीव्र चक्रीवादळांना पश्चिम अटलांटिक महासागर आणि ईशान्य पॅसिफिक महासागरात हरिकेन, पश्चिम पॅसिफिक महासागरात टायफून, दक्षिण पॅसिफिक महासागर; हिंदी महासागर; बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ (Tropical Cyclone) तर ऑस्ट्रेलियाच्या आसपासच्या सागरी प्रदेशात विलीविली या स्थानिक नावांनी संबोधले जाते.

उत्तर गोलार्धात ही वादळे प्रथम पश्चिमेकडे, नंतर वायव्येकडे, नंतर उत्तरेकडे आणि शेवटी ईशान्येकडे सरकतात. ईशान्येकडे सरकल्यानंतर ती समशीतोष्ण कटिबंधात प्रवेश करतात आणि तेथे त्यांचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होते. दक्षिण गोलार्धात सुरुवातीला पश्चिमेकडे, नंतर नैऋत्येकडे, नंतर दक्षिणेकडे आणि शेवटी आग्नेयेकडे सरकल्यावर त्याचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होते. चक्रीवादळांची निर्मिती होते तेव्हा पृथ्वीच्या परिवलनामुळे आवर्त वारे उत्तर गोलार्धात घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात ते घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरुद्ध दिशेने वाहतात.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार हे चक्रीवादळ त्याच्या निर्मितीस्थानापासून पश्चिमेकडे आणि त्यानंतर वायव्येकडील कुडलोर(तमिळनाडू) च्या दिशेने १६ किमी/तास या वेगाने सरकले असून या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांचा वेग १२० किमी/तास होता. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर त्याचा वेग कमी होऊन ते कमकुवत झाले.

चक्रीवादळ एक अरिष्ट

चक्रीवादळाच्या वेळी आकाश ढगाळ असते, वारे वेगाने वाहतात व भरपूर पाऊस पडतो. या वेळी वाहणाऱ्या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अनिश्चित असते. चक्रीवादळाचे पुढे सरकणे आणि वाढणे, निर्माण झालेला झंझावाती वारा, लाटा तसेच त्यामुळे होणारे भूस्खलन आणि अतिवृष्टी हे वादळाचे परिणामच लोकांचे जीवित किंवा स्थावर मालमत्तेचे नुकसान होण्यासाठी कारणीभूत ठरतात. महापूर, वादळे, आवर्त उष्मालहरी अशा प्राकृतिक आणि विनाशकारी घटनांना अरिष्ट म्हणतात आणि जेव्हा मानवी वस्तीमध्ये असे अरिष्ट येते तेव्हा त्यास आपत्ती म्हणतात.

चक्रीवादळ आणि आपत्ती व्यवस्थापन

आपत्तीतील धोके कमी करण्यासाठी सामना करण्याची क्षमता निर्माण होणे आवश्यक असते, म्हणजेच लोकांची संघटनांची आणि व्यवस्थेची, उपलब्ध कौशल्ये व संसाधने यांचा वापर करून आपत्तीना तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे होय. आपत्तीमुळे होणारे नुकसान किंवा हानी यांचा धोका आपत्ती व्यवस्थापन कमी करते. अरिष्टावर लक्ष केंद्रित करून त्यामुळे लोकांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आपत्ती व्यवस्थापनात केला जातो. यात शासनसंस्था, पोलीस दल, स्थानिक स्वराज्य संस्था, लष्करी व निमलष्करी दल, अशासकीय संस्था तसेच शास्त्रज्ञ व नियोजनकार, स्वयंसेवक, वैद्यकीय व्यावसायिक यांचे परस्पर सहकार्य यांचा समावेश होतो.

चक्रीवादळ ‘निवार’चा धोका लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली ठउटउ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली होती. वादळाच्या तीन दिवसांमध्ये त्याला सामोरे जाण्यासाठी ठऊफा अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ३० तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या व आवश्यकता भासल्यास अतिरिक्त २० तुकडय़ा तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात सज्ज ठेवल्या होत्या.

राज्य सेवा पूर्वपरीक्षेमध्ये; वादळाचे नाव, कोणी नाव दिले किंवा अशी नावे देण्याची पद्धत कधी अस्तित्वात आली, वादळ कोणत्या भागात आले या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मुख्य परीक्षेमध्ये उष्ण कटिबंधीय वादळांची निर्मिती प्रक्रिया, दिशा, परिणाम, अरिष्ट आपत्ती व्यवस्थापन या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. हवामानशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापन हे अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे घटक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या घटकावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.