फारुक नाईकवाडे

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल व पर्यावरण या उपघटकांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यव्यवस्था या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

भारतीय अर्थव्यवस्था

या घटकावर दरवर्षी साधारणपणे पाच ते सहा प्रश्न विचारलेले दिसतात. सामान्य अध्ययनाच्या एकूण २० पैकी पाच प्रश्न चालू घडामोडी आणि पाच प्रश्न अर्थव्यवस्था या घटकांसाठीच वापरलेले आहेत. त्यामुळे या दोन घटकांची परिपूर्ण तयारी केल्यास किमान सहा ते सात गुणांची व्यवस्था होऊ शकते.

अर्थव्यवस्था विषयाच्या अभ्यासाची सुरुवात राष्ट्रीय उत्पन्न, चलन, बँकिं ग, शासकीय अर्थव्यवस्था, आयात-निर्यात, लेखा व लेखापरीक्षण, महागाई, दारिद्रय़, रोजगार यांच्याशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घेऊन करायला हवी. या मुद्दय़ांबाबतची महत्त्वाची आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी व चालू घडामोडी माहीत असायला हव्यात. घटकनिहाय तयारीसाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

१. भारतीय आयात-निर्यात

भारताच्या परकीय व्यापारातील सर्वाधिक मूल्य असणारे भागीदार देश किंवा गट, मागील तीन  वर्षांतील सर्वाधिक मूल्यांच्या निर्यात होणाऱ्या वस्तू किंवा सेवा, मागील तीन  वर्षांतील सर्वाधिक मूल्यांच्या आयात होणाऱ्या वस्तू किंवा सेवा, ठरावीक क्षेत्रांचा आणि एकूण आयात-निर्यातीचा जीडीपीमधील वाटा याबाबतची आकडेवारी माहीत असायला हवी. आयात-निर्यातविषयक नवी धोरणे, चर्चेतील मुद्दे माहीत करून घ्यावेत. परकीय गुंतवणुकीबाबत गुंतवणूक सर्वाधिक आकर्षित करणारी राज्ये आणि उद्योग, सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश/गट आर्थिक पाहणी अहवालातून पाहून घ्यावेत.

२. राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी, ग्रामीण बँकांची भूमिका – बँकिं गविषयक महत्त्वाच्या संज्ञा आणि संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. चलन आणि बँकिं ग नियमनातील फइक ची भूमिका व कार्ये, बँकांचे प्रकार व त्यानुसार बदलणारी त्यांची कार्यक्षेत्रे व कार्ये, बँकांची अग्रक्रम क्षेत्रे, बेसल नियम या बाबी फारशा अवघड नाहीत आणि उदाहरणे समोर ठेवली तर सहज समजू शकतात अशी आहेत. त्यामुळे व्यवस्थितपणे समजून घेतल्यास याबाबतचे प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात.

३. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण

अर्थसंकल्पाच्या मूलभूत बाबींवर अद्यापि प्रश्न विचारलेले दिसत नसले तरी त्याबाबतच्या घटनात्मक तरतुदी, त्यातील उत्पन्नाचे स्रोत व खर्चाच्या बाबी, उत्पन्न व तूट याबाबतच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. केंद्र व राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल प्रकाशित झाल्यावर त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहून नोट्स काढणे आवश्यक आहे. यामध्ये जीडीपी व त्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा वाटा, कर आणि करेतर महसुलाचा वाटा व त्यातील मागील वर्षांच्या तुलनेत झालेली वाढ/घट, आयात-निर्यातविषयक आकडेवारी, महत्त्वाच्या योजना, नवे प्रस्ताव अशा बाबी समाविष्ट होतात.

४. पंचवार्षिक योजना

पंचवार्षिक योजनांचे उद्दिष्ट, ध्येयवाक्य, महत्त्वाच्या योजना व प्रकल्प आणि त्यांचे प्रतिमान यांचा आढावा घ्यावा. योजनेचे प्रतिमान, ध्येयवाक्य, उद्दिष्ट, केंद्रस्थानी असलेले आर्थिक क्षेत्र, जीडीपीमध्ये झालेली वाढ, योजना काळातील महत्त्वाच्या योजना, प्रकल्प, अन्य महत्त्वाची माहिती यांच्या नोट्स काढल्यास फायद्याचे होईल.

५. किमती वाढण्याची कारणे व उपाय

या उपघटकाबाबत विचारलेले प्रश्न हे बहुधा बहुविधानी अशा प्रकारचे असलेले दिसतात. विशेषत: किंमत निर्देशांक, महागाई निर्देशांकांवर हे प्रश्न आधारलेले आहेत. त्यामुळे किमती वाढण्याची कारणे, महागाई मोजण्यासाठीचे निर्देशांक, त्यावरील उपाय म्हणून राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना व त्या त्या वर्षीचे निर्णय असे मुद्दे अभ्यासावे लागतील. या मुद्दय़ांचा पारंपरिक अभ्यास आणि त्यांच्याबाबतची अद्ययावत आकडेवारी असेल तर तुम्ही हे प्रश्न आत्मविश्वासाने सोडवू शकाल.

भारतीय राज्यव्यवस्था – या घटकावर एक मूलभूत आणि एक चालू घडामोडीवर आधारित असे जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारलेले दिसतात.

भारतीय राज्यव्यवस्था विषयाच्या तयारीचा पाया आहे- राज्यघटनेचा अभ्यास. अर्थात राज्यघटनेची सर्व कलमे तोंडपाठ करणे म्हणजे तिचा अभ्यास नव्हे. महत्त्वाची कलमे व्यवस्थित समजून घेणे आणि चालू घडामोडींच्या अनुषंगाने त्याबाबतची कलमे त्या त्या परीक्षेच्या अभ्यासामध्ये विशेष महत्त्व देऊन अभ्यासणे असा याचा अर्थ होतो.

घटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, राज्यांची नितीनिर्देशक तत्त्वे, केंद्र-राज्य संबंध, घटनात्मक पदे, घटनादुरुस्ती याबाबतची कलमे व तरतुदी नेमकेपणाने समजून घ्याव्यात आणि पाठच कराव्यात.

न्यायालयीन उतरंड, पंचायती राज व्यवस्था, महिला, मुले, अपंग, मागासवर्ग, अल्पसंख्याक या सामाजिक घटकांसाठीच्या तरतुदी यांबाबतच्या कलमांच्या नोट्स काढल्या आणि त्यांची उजळणी केली तर पुरेसे ठरते. मात्र चालू घडामोडींमध्ये यापैकी कोणता मुद्दा चर्चेत असेल तर त्याबाबत जास्त सखोल अभ्यास करायला हवा.

चर्चेत असलेले तसेच प्रस्तावित कायदे, नियम, धोरणे यांचाही अभ्यास आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.

एकूण २० पैकी दोनच प्रश्नांना वाव असल्याने या घटकावर कशा प्रकारे आणि कोणत्या मुद्दय़ावर प्रश्न विचारला जाईल याचा अंदाज बांधणे अवघड असले तरी वरील मूलभूत मुद्दे तयार करणे आणि चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे यापुरती तयारी मर्यादित ठेवायला हरकत नाही.

मेहनत किती घेताय यापेक्षा ती कशी घेताय यावरच यश अवलंबून असते. विश्लेषणावर आधारित अभ्यास व अभ्यासक्रमाच्या चौकटीत केलेली तयारी हीच यशाकडे नेणाऱ्या मेहनतीची गुरुकिल्ली आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.