09 March 2021

News Flash

वैकल्पिक विषयाची निवड

यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयाची निवड करताना विषयाची आवड, संदर्भसाहित्याच्या उपलब्धतेची हमी आणि योग्य सल्लामसलत हे मुद्दे लक्षात घेऊनच विषयनिवडीचा अंतिम निर्णय घ्यावा.

| August 5, 2013 08:14 am

यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयाची निवड करताना विषयाची आवड, संदर्भसाहित्याच्या उपलब्धतेची हमी आणि योग्य सल्लामसलत हे मुद्दे लक्षात घेऊनच विषयनिवडीचा अंतिम निर्णय घ्यावा.

केंद्र लोकसेवा आयोगाने स्वीकारलेल्या नव्या योजनेनुसार यूपीएससी मुख्य परीक्षेत आता दोनऐवजी एकच वैकल्पिक विषय निवडायचा आहे. आयोगाने आपल्या अधिसूचनेत नमूद केलेल्या यादीतून उमेदवार कोणत्याही एका वैकल्पिक विषयाची निवड करू शकतो. आयोगाने यासाठी ५०० गुण निर्धारित केले असून त्यात संबंधित वैकल्पिक विषयाचे दोन पेपर (पेपर १, पेपर २) समाविष्ट केले आहेत. एकाअर्थी मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांचे महत्त्व कमी झाले असले तरी एकूण १७५० गुणांच्या मुख्य परीक्षेत ५०० गुणांचे मूल्य असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. म्हणूनच दिलेल्या यादीतून योग्य वैकल्पिक विषयाची निवड करणे अत्यावश्यक ठरते.
अर्थात विद्यार्थ्यांपुढे असा नेहमीच प्रश्न असतो की कोणता वैकल्पिक विषय निवडावा? पुष्कळ वेळा विद्यार्थी इतरांचे पाहून अथवा कोणीतरी सांगितले म्हणून विषय निवडत असतात. विद्यार्थ्यांनी असे न करता स्वयं विचारपूर्वक निर्णय घ्यावा. तांत्रिक शाखेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुख्य परीक्षेत निवडावयाचा वैकल्पिक विषय हा त्यांच्या पदवी शिक्षणातीलच विषय असावा असे काही नाही. आपण जेव्हा मागील काही वर्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या आकडेवारीचे विश्लेषण करतो तेव्हा असे दिसून येते की विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी अथवा वाणिज्य शाखेची पाश्र्वभूमी असणारे विद्यार्थी मानव्य विद्याशाखांतील विषय निवडतात व यशस्वी होतात. त्यामुळे निवडलेला विषय आपण कशा रीतीने अभ्यासतो यास महत्त्व असते. एकंदर विचार करता राज्यशास्त्र, लोकप्रशासन, भूगोल, समाजशास्त्र आणि इतिहास हे वैकल्पिक विषय विचारात घेण्यास हरकत नाही.
वैकल्पिक विषयाची निवड करताना पुढील काही निकष लक्षात घ्यावेत –
(१) स्वतची आवड- वैकल्पिक विषयाची निवड करताना त्यातील आपली आवड व रस तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते. आपणास ज्या विषयात आवड असते, तो विषय अभ्यासणे केव्हाही सुलभ व सोयीस्कर ठरते. समजा एखादा विद्यार्थी चच्रेमध्ये रमत असेल, त्यास चालू घडामोडी विशेषत: आंतरराष्ट्रीय घडामोडीत रस असेल तर त्याने राज्यशास्त्र हा विषय निवडल्यास तो त्या विषयाच्या अभ्यासात गती प्राप्त करू शकतो. म्हणजेच आवडीच्या विषयामुळे वेळ व श्रम दोहोची बचत होते. त्यासाठे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे विषय निवडावेत. त्यासाठी संबंधीत विषयाचा आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आणि गेल्या १० वर्षांतील मागील प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म अवलोकन करणे उपयुक्त ठरते. प्रारंभी आयोगाने दिलेल्या वैकल्पिक विषयांच्या यादीतून चार ते पाच विषय निवडावेत आणि अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे अंतिमत: एका वैकल्पिक विषयाची निवड करावी.
(२) संदर्भ साहित्याची उपलब्धता- आपण जो विषय निवडला आहे, त्या विषयाचे पुरेसे संदर्भ साहित्य म्हणजेच पुस्तके उपलब्ध आहेत का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरते. त्याशिवाय उपलब्ध संदर्भ साहित्य दर्जेदार आणि अद्ययावत असणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच संदर्भ साहित्याची उपलब्धता हा वैकल्पिक विषय निवडीचा दुसरा महत्त्वाची निकस मानावा.
(३) मार्गदर्शन- आपण निवडलेल्या वैकल्पिक विषयासाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध असणे हे ेदेखील महत्त्वाचे असते. कारण प्रत्येक वैकल्पिक विषयात काही मूलभूत संकल्पना, विचार व सिद्धान्त आणि विचारवंत असू शकतात. अशा घटकांचे योग्य रीतीने आकलन होण्यासाठी संबंधित विषयाचे मार्गदर्शन नेहमीच उपयुक्त ठरते. विषयाचा अभ्यास कसा करावा? त्यासाठी कोणते संदर्भ साहित्य वापरावे? प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत? इत्यादी महत्त्वाच्या आयामासंबंधी दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध असणे गरजेचे ठरते.
(४) सामान्य अध्ययनातील मूल्य- वैकल्पिक विषयाची निवड करताना आपला विषय सामान्य अध्ययनात काय भूमिका बजावू शकतो हे पाहणेही खूप महत्त्वाचे ठरते. जर वैकल्पिक विषयामुळे सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी लागणारा वेळ वाचू शकत असेल तर तसा विचार करणे योग्य ठरते. याशिवाय जर वैकल्पिक विषयामुळे सामान्य अध्ययनामधील काही भाग न अभ्यासतानाही अभ्यासून होणार असेल तर तसा विषय निवडणे केव्हाही योग्य ठरते. उदा. राज्यशास्त्र या वैकल्पिक विषयातील भारतीय राज्यव्यवस्था, परराष्ट्र धोरण व मानवी हक्क हे घटक सामान्य अध्ययनातील तीन महत्त्वपूर्ण घटक आहेत. तसेच लोकप्रशासनात समाविष्ट होणारे राज्यघटना, मानवी हक्क व दुर्बल घटकांचे कल्याण हे घटक सामान्य अध्ययनातही समाविष्ट आहेत. त्यामुळे राज्यशास्त्र व लोकप्रशासन यापकी एखादा वैकल्पिक विषय असल्यास त्याचा सामान्य अध्ययनाच्या अनुषंगाने निश्चितच अधिक लाभ होतो. यामुळे वैकल्पिक विषयांची निवड ही सामान्य अध्ययनामधील त्या विषयाची भूमिका पाहून केल्यास फायदाच होतो.
यूपीएससी मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो याचे भान ठेवून योग्य निर्णय घ्यावा. जर वैकल्पिक विषयाची निवड चुकली तर कदाचित केलेले प्रयत्न व वर्षही वाया जाऊ शकते. त्यामुळे स्वतची आवड व रस, मार्गदर्शन व संदर्भसाहित्याच्या उपलब्धतेची हमी आणि योग्य सल्लामसलत याद्वारेच वैकल्पिक विषय निवडीचा निर्णय घ्यावा.
वैकल्पिक विषयाची निवड केल्यानंतर आपल्या नियोजनातील किमान ३० टक्के वेळ तयारीसाठी राखीव ठेवावा. विषयातील सर्व संबंधित अभ्यासक्रमाची तयारी, त्यासाठी योग्य संदर्भाचा वापर, अभ्यासलेल्या प्रकरणांची उजळणी आणि शेवटी सराव चाचण्यांद्वारे लेखनावर प्रभुत्व याद्वारे वैकल्पिक विषयाचे अभ्यासधोरण           राबवता येईल.                        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2013 8:14 am

Web Title: optional subject selection
टॅग : Upsc Exam
Next Stories
1 महिलांची समस्या सोडविणारे संशोधन
2 ‘लाइफ अनलिमिटेड’
3 जैव-तंत्रज्ञानातील संधी
Just Now!
X