एमपीएससी मंत्र

रोहिणी शहा

राज्य लोकसेवा आयोगाकडून २५ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये काही बदलांची घोषणा करण्यात आली आहे.  पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते. पूर्वी या चाचणीचे गुण अंतिम निकालासाठी विचारात घेतले जात असत. सन २०२०पासूनच्या परीक्षांमध्ये पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेतील शारीरिक चाचणीची मानके बदलण्यात आल्याची घोषणा आयोगाकडून करण्यात आली आहे. याबाबत आजच्या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या गट बमधील अराजपत्रित पदांवरील निवडीसाठी दुय्यम सेवा परीक्षा आयोगाकडून आयोजित करण्यात येते. या निवडीसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक हा संयुक्त म्हणजे तिन्ही पदांसाठी सामायिक असतो. तर मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम आणि टप्पे पदनिहाय वेगवेगळे असतात. यापैकी केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी व मुलाखत असे जास्तीचे दोन टप्पे आहेत. यातील शारीरिक चाचणी या टप्प्याबाबत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत .

दुय्यम सेवांमधील पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जास्तीचे दोन टप्पे आणि त्या आधारावर निकाल अशी पद्धत दिसून येते. शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले आहेत. म्हणजे मुख्य परीक्षेच्या निकालामध्ये या गुणांचा विचार केला जाणार नाही. मात्र मुलाखतीस पात्र ठरण्यासाठी शारीरिक चाचणी किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक करण्यात आले आहे.

शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के  गुण आवश्यक करण्यात आले आहेत. अर्थात मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये ६० गुण मिळवणे पुरेसे ठरेल. हे अर्हताकारी गुण असल्याने त्यांचा अंतिम गुणवत्ता यादीकरता किंवा अंतिम निवडीकरिताही विचार होणार नाही. शारीरिक चाचणी अशा प्रकारे अर्हताकारी केल्याने पोलीस उपनिरीक्षक पदावर निवडीसाठी इच्छुक उमेदवारांवरचा अंतिम निवडीसाठी कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त तयारीचा ताण मोठय़ा प्रमाणावर कमी होणार आहे.

शारीरिक चाचणीतील सर्व घटकांच्या गुणांची बेरीज अपूर्णाकात असल्यास ती अपूर्णाकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल असे आयोगाने विहित केले आहे. उदाहरणार्थ एखाद्या उमेदवारास सर्व घटकांचे मिळून ५९.८७ गुण मिळाले तर त्याला गुण १४ल्ल िऋऋ  करून उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध नसेल. सर्व घटकांमध्ये मिळून कमीत कमी ६० गुण मिळवणे आवश्यकच आहे. अंतिम निकालामध्ये शारीरिक चाचणीचे गुण समाविष्ट केले जात तेव्हा एकेका गुणासाठी अत्यंत कसोशीने मेहनत करावी लागत असे. त्यापेक्षा तरी हे आव्हान निश्चितच सोपे आहे. गुणांचे किमान लक्ष्य पार केल्यावर मुलाखतीस पात्र ठरणार आणि या कमी-जास्त गुणांचा अंतिम निकालावर परिणाम होणार नाही ही खात्री पोलीस उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांना उमेद देणारी ठरेल हे नक्की.

अर्हताकारी शारीरिक चाचणी

याबाबत अन्य दोन पदे व पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेसाठीच्या परीक्षा पद्धतीतील फरक आधी लक्षात घेतला पाहिजे. तो या कोष्टकामध्ये पाहता येईल.