गेल्या काही वर्षांत अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या क्रीडा क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील करिअर संधींची आणि उपलब्ध प्रशिक्षणक्रमांची ओळख-
यशस्वी खेळाडू म्हणून नावारूपाला यावे, असे अनेकांचे स्वप्न असते, पण प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. अशा वेळेस आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकाराशी संबंधित कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त  करता येईल. आवडीच्या क्षेत्रात काम केल्याने समाधानही मिळते आणि  त्या क्षेत्रात समज आणि स्वारस्य असल्याने वेगाने प्रगतीही करता येते.
क्रीडा क्षेत्राचा करिअर म्हणून विचार केला तर त्यातील कार्यक्षेत्रांत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ- क्रीडा विषयक व्यवस्थापन, प्रशिक्षण, पत्रकारिता, फीजिओथेरपी, जाहिरात नियोजन, अर्थ व्यवस्थापन, समालोचन, प्रायोजक व्यवस्थापन इत्यादी. या कार्यक्षेत्रांची आणि त्यासंबंधित अभ्यासक्रमांची ओळख थोडक्यात करून घेऊयात-

करिअर संधी
क्रीडा औषधोपचार, क्रीडा मानसोपचार, फीजिओथेरपी –
खेळाडूचे शरीरस्वास्थ्य उत्तम राहून, स्पर्धेदरम्यान त्याच्या कामगिरीचा दर्जा उत्तम राहावा याकरता वैद्यकशास्त्राची मदत मोलाची ठरते. क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट या वैद्यक शाखांतील व्यावसायिकांची खेळाडूंना गरज भासते. या तज्ज्ञ व्यक्ती इंडियन असोसिएशन ऑफ स्पोर्टस् मेडिसिनच्या सभासद असतात. याविषयीचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या प्रशिक्षण संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* संचेती इन्स्टिटय़ूूट, पुणे.
* गुरू नानकदेव युनिव्हर्सिटी, अमृतसर.
* लक्ष्मीबाई नॅशनल युनिव्हर्सिटी, ग्वाल्हेर.
* इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस्  सायन्सेस, दिल्ली.
* नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिटय़ूूट, पतियाळा.
क्रीडा पत्रकारिता –
खेळाची आवड जोपासणाऱ्या उमेदवारांनी या कार्यक्षेत्राचा नक्की विचार करावा. आज बहुतांश सर्वच वृत्तपत्रे, मासिके आणि वृत्त वाहिन्या क्रीडाविषयक बातम्यांना महत्त्व देतात.  क्रीडापत्रकारितेचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना निवडीच्या वेळेस प्राधान्य दिले जाते. क्रीडा पत्रकारितेचे  शिक्षण देणाऱ्या काही आघाडीच्या संस्था खालीलप्रमाणे आहेत-
* एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम, चेन्नई.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास
कम्युनिकेशन, ओरिसा.
* सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे.
* झेवियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, मुंबई.
क्रीडा प्रशिक्षक –
खेळाची आवड आणि शिकवण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना क्रीडा प्रशिक्षणाकडे वळता येईल. या क्षेत्रासंबंधीचे अव्वल दर्जाचे प्रशिक्षण पुढील संस्थेत उपलब्ध आहे-
* नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिटय़ूट, पतियाळा. अभ्यासक्रम- स्पोर्टस् कोचिंग.  (कालावधी- दोन वर्षे.). याअंतर्गत अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, स्वििमग, व्हॉलीबॉल, वेटलििफ्टग, रेसिलग या क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. शालेय, अथवा महाविद्यालयीन स्तरावर  खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेत सहा आठवडय़ांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

क्रीडा विपणन –
विपणनाचा उपयोग खेळाडूच्या, क्रीडा संघाच्या अथवा स्पर्धाच्या प्रसिद्धीसाठी केला जातो. क्रीडा विषयक उत्पादनांचा, सेवांचा खप वाढवण्यासाठी प्रसिद्ध खेळाडू त्या उत्पादनाची जाहिरात करतात अथवा एखाद्या उत्पादन कंपनीचे प्रायोजकत्त्व स्वीकारून क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात.
‘स्पोर्टस् मार्केटिंग’ या विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* इन्स्टिटय़ूूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्निकल स्टडीज, नॉयडा, उत्तर प्रदेश.
* तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस् युनिव्हर्सिटी.
* डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, नवी मुंबई.
* इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंट.
क्रीडा आहारतज्ज्ञ –
क्रीडापटूंच्या आहाराची आणि पोषणमूल्यांची गरज लक्षात घेत त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची आणि  त्यांची कार्यक्षमता वाढविण्याची जबाबदारी आहारतज्ज्ञांवर असते. या व्यक्ती एखाद्या विशिष्ट खेळाडूला, संघाला स्वतंत्रपणे मार्गदर्शन करतात अथवा क्रीडा संस्थेच्या अथवा व्यायामशाळेच्या माध्यमातून ही सेवा पुरवतात. याकरता आहारविषयक पदवी   मिळवणे आणि नंतर ‘स्पोर्टस् न्युट्रिशन’मधील प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते. या विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था खालीलप्रमाणे –
* ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.
* निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होमसायन्स, मुंबई.
* व्ही. एल. सी. सी. इन्स्टिटय़ूट. शाखा- दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, सुरत.
* तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस्  युनिव्हर्सिटी.
* इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन
क्रीडा विधिज्ञ/ कायदेतज्ज्ञ –
क्रीडाविश्वात उद्भवणाऱ्या कायदेशीर समस्यांचे निराकरण करणारे कायदेतज्ज्ञ या क्षेत्रात वेगाने प्रगती करू शकतात. उदा. फुटबॉल, क्रिकेट यांच्या लीग स्थापनेकरता आवश्यक ठरणाऱ्या कायदेशीर बाबी, खेळाला लागू पडणारे सरकारी कायदे ठाऊक असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते.   अशा व्यक्तीने कायद्याची पदवी प्राप्त केलेली असावी. क्रीडा क्षेत्रातील कंपन्यांत अथवा संस्थांत कायदेविषयक बाबी हाताळण्याचा अनुभव असल्यास निवडीत प्राधान्य मिळते. अशा व्यक्तीला कायदे शास्त्रातील कॉन्ट्रॅक्ट लॉ, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ, कॉम्पिटिशन लॉ, तसेच स्थलांतर, नागरिकत्व याबाबतच्या कायदेशीर बाबी हाताळाव्या लागू शकतात.
क्रीडा समालोचक –
मदानावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे, स्पध्रेचे हुबेहूब वर्णन रंजक शैलीत दर्शकांपर्यंत-श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम क्रीडा समालोचकाने करावे, असे अपेक्षित असते. उत्तम संवादकौशल्य, समयसूचकता, फर्डा वक्ता, खेळाची आवड, खेळाचा प्रत्यक्ष अनुभव, आणि भाषेवर प्रभुत्व ही गुणकौशल्ये समालोचकाने प्राप्त करायला हवी.
शैक्षणिक पात्रता- पत्रकारिता विषयाचे शिक्षण आवश्यक, क्रीडा सामन्यांच्या समालोचनासाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनियंत्रणा हाताळण्याचा तांत्रिक अनुभव, खेळाच्या नियमांचे अचूक ज्ञान किंवा अनेक वष्रे खेळाडू म्हणून अनुभव गाठीशी असावा.
या विषयातील प्रशिक्षण संस्था खालीलप्रमाणे-
* शहीद भगतसिंग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, फरिदाबाद.
* एम.आय.टी. जनसंवाद, लातूर.
* एमआयटी इंटरनॅशनल, पुणे.
क्रीडा पंच / सामनाधिकारी –
कोणताही खेळप्रकार नियमांनुसार आणि नि:पक्षपणे सुरळीत सुरू ठेवण्यात पंचाची (अम्पायर) भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. यासाठी खेळाची आवड आणि खेळाच्या नियमांचे अचूक ज्ञान आवश्यक असते.
या विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था –   ६ नेताजी सुभास नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस्, पतियाळा.                (उत्तरार्ध)
– गीता सोनी
geetazsoni@yahoo.co.in