यूपीएससी मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर- ३

श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे या घटकावर परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी, याविषयी आपण चर्चा करणार आहोत.

११ व्या पंचवार्षिक योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या ‘वृद्धीची प्रक्रिया जी व्यापक तत्त्वावर आधारित लाभाची आणि समान संधीची सुनिश्चितता समाजातील सर्व घटकासाठी करेल. थोडक्यात, ही वाढीची प्रक्रिया विस्तृत प्रकारची, सर्वामध्ये विभागली जाणारी आणि गरिबीसन्मुख असणारी असेल,’ अशी करण्यात आलेली आहे.

भारताने १९९१ नंतर आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केल्यानंतर आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळालेली आहे. आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून भारतात मध्यमवर्गाची वाढ वेगाने झाल्याचे दिसत असले, तरी जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था अजून कनिष्ठ मध्यमवर्ग या गटातच मोडते. देशाच्या विकासाचा विचार करत असताना आजवर दरडोई उत्पन्नाचा वाढणारा दर, अर्थव्यवस्था वाढीचा दर, उत्पादनवाढीचा दर, आयात व निर्यात व्यापारातील तूट, वित्तीय तूट अशा मुद्यांचाच प्रामुख्याने विचार केला जात होता आणि अशा आर्थिक प्रगतीचे लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतात की नाही याकडे विशेष लक्ष दिले गेलेले नव्हते.

भारत सरकारने आर्थिक विकास समाजाच्या सर्व स्तरापर्यंत एकसमान पद्धतीने करता यावा आणि  जे लोक या आर्थिक विकासात्मक प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना देशाच्या विकासात्मक प्रक्रियेत सामावून घेऊन देशाच्या आर्थिक विकासात्मक प्रक्रियेचा लाभ त्यांना थेट मिळावा यासाठी सरकारमार्फत विविध धोरणे व योजनांची आखणी करण्यात आलेली आहे.  हे सर्व सर्वसमावेशक वाढ साध्य करण्याच्या धोरणाचा भाग आहे. या योजना दारिद्र्य निर्मूलन, गटामधील समानता, प्रादेशिक समानता, पर्यावरण शाश्वतता, शिक्षण व आरोग्य, शाश्वत पद्धतीने शेतीची वाढ, आर्थिक समावेशकता, पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्राशी संबंधित आहेत. यामुळे होणारी आर्थिक वृद्धी आणि विकासाची प्रक्रिया सर्वसमावेशक वाढीच्या दिशेने जाणारी असेल.

सर्वसमावेशक वाढ हा देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेतील धोरणाचा महत्त्वाचा भाग बनविण्यात आलेला आहे. आर्थिक वृद्धी जर सर्वसमावेशक असेल तरच अधिक प्रमाणात आर्थिक संधी प्राप्त करता येतील. तसेच याच्या जोडीला सर्वाना समान स्वरूपात संधी सुनिश्चित करता येतील, ज्याद्वारे शाश्वत वाढ साध्य करता येईल, हा मुख्य उद्देश सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या धोरणात्मक नीतीचा भाग आहे.

सरकारमार्फत ११ व्या आणि १२ व्या पंचवार्षिक योजनांमध्ये सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी विशेष भर देण्यात आलेला आहे, ज्यामुळे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचे ध्येय साध्य करता येऊन आर्थिक विकासाची प्रक्रिया अधिक प्रमाणात उत्पादनक्षम बनवता येईल. हा अंतिम उद्देश ठेवून सर्वसमावेशक वाढीच्या धोरणाची रणनीती सरकारमार्फत आखण्यात आलेली आहे.

या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना एनसीईआरटीचे ११ वी आणि १२ व्या इयत्तेची भारतीय आर्थिक विकास (Indian Economic Development) आणि Macro Economics ही पुस्तके  वापरता येऊ शकतात. या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेवरील मिश्रा आणि पुरी, दत्त आणि सुंदरम व उमा कपिला या लिखित संदर्भग्रंथांचा वापर करावा. या घटकावर चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न विचारण्यावर अधिक भर दिला जातो ज्यासाठी द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे, योजना व कुरुक्षेत्र ही मासिके, केंद्र सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या योजना, केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल, केंद्रीय अर्थसंकल्प, तसेच इंडिया इयर बुक इत्यादी संदर्भ या विषयाच्या परीक्षाभिमुख र्सवकष तयारीसाठी उपयुक्त ठरतात.

या घटकावर मुख्य परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न

* ‘सर्वसमावेशक वाढीच्या रणनीतीला ध्यानात घेऊन, नवीन कंपनी बिल- २०१३ मध्ये ‘सामूहिक सामाजिक उत्तरदायित्व’ हे अप्रत्यक्षपणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. याला गंभीरपणे राबविण्यासाठी येणाऱ्या समस्या याची चर्चा करा. तसेच या बिलामधील इतर तरतुदींचा व त्यांच्या परिणामाची चर्चा करा.’ (२०१३)

* ‘भांडवलशाहीने जागतिक अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व भरभराटी दिलेली आहे. जरी असे असले तरी भांडवलशाही पुष्कळदा लघुदृष्टितेला प्रोत्साहित करणारी आहे तसेच श्रीमंत आणि गरीब यांच्या मधील विषमतावाढीला साभूत राहिलेली आहे. याच्या प्रकाशझोतात भारतात सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी भांडवलशाहीचा स्वीकार करणे योग्य असेल का?  चर्चा करा.’ (२०१४)

* भारतात सर्वसमावेशक वाढीच्या संदर्भातील आव्हाने ज्यामध्ये निष्काळजी आणि निरुपयोगी मनुष्यबळाचा समावेश आहे, यावर भाष्य करा. या आव्हानांचा सामना करण्याच्या उपाययोजना सुचवा. (२०१६)

* सर्वसमावेशक वाढीची ठळक वैशिष्टय़े काय आहेत? अशा प्रकारच्या वाढीच्या प्रक्रियेचा भारत अनुभव घेत आहे का? विश्लेषण करा आणि सर्वसमावेशक वाढीसाठीच्या उपाययोजना सुचवा. (२०१७)

*    असा युक्तिवाद केला जातो की सर्वसमावेशक वाढीच्या रणनीतीचा हेतू हा सर्वसमावेशकता आणि टिकाऊपणा (inclusiveness and sustainability) या उद्देशांची एकत्रितपणे पूर्तता करणे हा आहे. या विधानावर भाष्य करा. (२०१९)