श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये तंत्रज्ञान या घटकाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. हा घटक अभ्यासताना आपणाला दोन बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पहिली बाब या घटकामध्ये संकल्पनावर आधारित प्रश्न अधिक प्रमाणात विचारले जातात आणि दुसरी बाब या घटकावर विचारण्यात येणारे जवळपास सर्व प्रश्न हे या घटकाशी संबंधित घडणाऱ्या चालू घडामोडीवर विचारले जातात. हा घटक जरी तंत्रज्ञान या नावाने अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेला असला तरी यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून अभ्यास करावा लागतो. या घटकाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, याची उपयोगिता आणि याचे सर्वसामान्याच्या जीवनावर होणारे परिणाम, तसेच भारतीयाने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मिळवलेले यश, नवीन तंत्रज्ञानाचा विकास याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार व संबंधित मुद्दे इत्यादी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी अशा पद्धतीने या घटकाशी संबंधित मुद्दे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.

या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न.

*   निश्चित मात्रा औषध संयोग (FDCs) या वरून काय समजते? याच्या गुण आणि दोषांची चर्चा करा. (२०१३).

*   जागतिकीकरण झालेल्या जगात बौद्धिक संपदा अधिकार यांना विशेष महत्त्व आहे आणि हे खटल्याचे एक स्रोत बनले आहे. कॉपीराईट, पेटंट्स आणि व्यापार गुपिते यामध्ये सामन्यात:

काय फरक आहे. (२०१४)

*   भारतातील विद्यापीठामधील वैज्ञानिक संशोधन घटत आहे, कारण विज्ञानामधील करिअर हे

इतके आकर्षक नाही की जे व्यापार व्यवसाय, अभियांत्रिकी किंवा प्रशासन यामध्ये आहे आणि विद्यापीठे ही उपभोक्ताभिमुख होत चाललेली आहेत. समीक्षात्मक टिपण्णी करा. (२०१४).

*   प्रतिबंधित श्रमाची कोणती क्षेत्रे आहेत जी यंत्रमानवाद्वारे (Robots) सातत्याने व्यवस्थापित केली जाऊ शकतात? अशा उपक्रमांची चर्चा करा, जे प्रमुख संशोधन संस्थांमध्ये स्वतंत्र आणि नावीन्यपूर्ण लाभदायक संशोधनासाठी चालना देतील. (२०१५).

*   भारताने अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मिळवलेल्या उपलब्धीची चर्चा करा. कशा प्रकारे या तंत्रज्ञानांच्या प्रयोगाने भारतातील

सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत केलेली आहे? (२०१६).

*   भारतातील आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाढ आणि विकास याचा वृत्तान्त द्या. भारतात फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर प्रोग्रामचा (fast breeder reactor programme) काय फायदा आहे? (२०१७).

*   कोणते कारण आहे की, आपल्या देशात जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक सक्रियता आहे? या सक्रियतेने बायोफार्म क्षेत्राला कशा प्रकारे फायदा पोहचवलेला आहे? (२०१८)

*   प्रो. सत्येंद्र नाथ बोसद्वारे करण्यात आलेल्या ‘बोस-आईनस्टाइन सांख्यिकी’ कार्याची चर्चा करा आणि दाखवा की कशा प्रकारे याने भौतिकशास्त्र या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. (२०१८)

*   भारताची स्वत:च्या अवकाश स्थानकाची योजना काय आहे आणि हे आपल्या अवकाश कार्यक्रमाला कशा प्रकारे फायद्याचे ठरेल? (२०१९).

*   शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जैवतंत्रज्ञान कसे साकारी ठरू शकते? (२०१९).

२०१३ मधील जवळपास सर्व प्रश्न हे तंत्रज्ञामधील संकल्पना, या संकल्पनाचा अर्थ आणि यांची असणारी वैशिष्टय़े अशा पैलूवर विचारण्यात आलेले आहेत. निश्चित मात्रा औषध संयोग (FDCs)), डीजिटल स्वाक्षरी (Digital Signature)) आणि ३ आयामी मुद्रण (३ D Printing) तंत्रज्ञान यासारख्या संकल्पना या वस्तुनिष्ठ पद्धतीच्या असतात आणि याची माहिती तुम्हाला असल्याशिवाय उत्तरे लिहिता येत नाहीत. २०१४ मधील प्रश्न हे संकल्पना आणि संशोधनातील स्थिती यासारख्या मुद्दय़ांवर विचारण्यात आलेले आहेत. उदारणार्थ विद्यापीठामध्ये संशोधनात होणारी घट यासारख्या महत्त्वाच्या पैलूवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थोडक्यात, या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी संशोधन हे काय आहे तसेच याकडे उत्तम करिअर म्हणून का पाहिले जात नाही, तसेच या क्षेत्रात इतर क्षेत्राच्या तुलनेत आर्थिक लाभाचे प्रमाण तसेच करिअरची उपलब्धता आणि सुरक्षितता नेमकी किती आहे. तसेच अशी स्थिती का झालेली आहे. याला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत यासारख्या बाबींचा विचार करून याला विद्यापीठामधील संशोधनाच्या आकडेवारीचीही जोड द्यावी लागते. तेव्हाच या प्रश्नाचे उत्तर अधिक समर्पकपणे लिहिता येऊ शकते. २०१५ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचेही स्वरूप संकल्पनाधारित होते तसेच याच्या जोडीला या तंत्रज्ञानामुळे होणारे परिणाम, तंत्रज्ञानाची उपयुक्तता इत्यादी बाबींना गृहीत धरून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. २०१६ मध्ये नॅनो तंत्रज्ञान यावरही प्रश्न विचारण्यात आलेला होता. तसेच २०१७ मध्ये चांद्रयान आणि मार्स ऑर्बिटर मिशन आणि स्टेम सेल थेरपी इत्यादीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. २०१८ आणि २०१९ मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पारंपरिक आणि समकालीन घटनांची सांगड घालून विचारण्यात आलेले होते.

थोडय़ा फार फरकाने प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे स्वरूप सारखेच आहे. कारण हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने अधिक वस्तुनिष्ठ आहे. त्यामुळे संबंधित संकल्पना, या संकल्पनांची वैशिष्टय़े आणि यांची असणारी उपयुक्तता इत्यादी बाबींची माहिती असणे अपरिहार्य ठरते, हे उपरोक्त प्रश्नावरून आपण समजून घेऊ शकतो. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी या घटकाची मूलभूत माहिती देणारे अनेक गाईडस स्वरूपात लिहिलेली पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ही पुस्तके नमूद अभ्यासक्रमानुसार लिहिलेली असतात, त्यामुळे आपणाला प्रत्येक नमूद मुद्याची मूलभूत माहिती मिळते. या घटकाशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस ही इंग्रजी दैनिके, सायन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय यांची संके तस्थळे इत्यादीचा उपयोग करता येऊ शकतो.