13 July 2020

News Flash

परदेशस्थ भारतीय

परदेशस्थ भारतीयांचे विस्तृत वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

यूपीएससीची तयारी : प्रवीण चौगुले

आजच्या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपरमधील महत्त्वाचा घटक परदेशस्थ भारतीय (Indian Diaspora)) विषयी चर्चा करणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा घटक म्हणून परदेशस्थ भारतीय या घटकाची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे.

परदेशस्थ भारतीयांसंबंधीच्या एका उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार जगाच्या विविध भागांमध्ये स्थलांतरित झालेल्या आणि आपली स्वतंत्र भारतीय ओळख जपणाऱ्या भारतीयांचा समूह म्हणजे परदेशस्थ भारतीय अशी व्याख्या केली आहे. मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर्सने परदेशस्थ भारतीयांचे अनिवासी भारतीय (NRI) आणि भारतीय वंशाचे लोक (PIO) अशा दोन वर्गामध्ये वर्गीकरण केलेले आहे. परदेशस्थ भारतीयांचे विस्तृत वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

(a)      चरितार्थासाठी जाणारे (शक्यतो कामगार इ.)

(b)     वसाहती कालखंडामध्ये शेतमळ्यांमध्ये काम करण्यास फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद व टोबॅगो, सुरीनाम इ. देशांत गेलेले भारतीय, ज्यांना गिरमिटिया (कल्लीिल्ल३४१ी)ि असे म्हणतात.

(c)      भारतीय नागरिकत्व असणारे, परंतु परदेशामध्ये वास्तव्यास असणारे, ज्यांना ग्रीनकार्डसारख्या सवलती मिळतात.

(d)     पर्यटक, संशोधन करण्यास जाणारे, अल्प कालावधीमध्ये परतणारे (फ्लोटिंग).

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१५च्या पाहणीनुसार, परदेशात गेलेल्यांच्या जगातील एकूण स्थलांतरितांच्या संख्येपकी भारतीयांची संख्या अधिक आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस, करारतत्त्वातील स्थलांतरित कामगारांची दैनावस्था हा मुद्दा गोपाळकृष्ण गोखले यांसारख्या राष्ट्रवादी नेत्याच्या आस्थेचा विषय होता. त्यानंतर दक्षिण-आफ्रिकेतील भारतीय समाजाच्या वतीने आणि गांधीजींच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश साम्राज्याच्या अन्य भागांतील साम्राज्यविरोधी लढय़ाचा विस्तार या दृष्टिकोनातून परदेशस्थ भारतीयांकडे पाहिले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने प्रादेशिक सार्वभौमत्वावर दिलेल्या भरामुळे परदेशस्थ भारतीयांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, परदेशस्थ भारतीयांची परराष्ट्र धोरणाला आकार देण्यातील भूमिका मर्यादित राहिली.

१९९१नंतर अनिवासी भारतीयांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागाबाबत विचार केला गेला.

२००० साली तत्कालीन एन.डी.ए. सरकारने परदेशस्थ भारतीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. या समितीच्या शिफारशींवरून व्हिसारहित व्यवस्थेकरिता PIO कार्डचे संस्थात्मक प्रारूप, प्रवासी भारतीय सन्मान, प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन इ. बाबी अमलात आणल्या गेल्या. गेल्या दशकापासून प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन, परदेशस्थ भारतीयांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, Know India, Study India सारख्या योजना, इंडिया कम्युनिटी वेल्फेअर फंड, प्रवासी सोशल वेल्फेअर योजना इ. कार्यक्रमांद्वारे परदेशस्थ भारतीयांशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

परराष्ट्र धोरण अभ्यासकांच्या मते, नवउदारमतवादी धोरणात्मक पुढाकारांना प्रोत्साहन देणारे घटक म्हणून भारत सरकारला परदेशस्थ भारतीयांच्या आíथक क्षमतेची झालेली जाणीव तसेच परदेशस्थ भारतीयांचा सॉफ्ट पॉवर म्हणून वापर यामुळे परदेशस्थ भारतीयांबाबतच्या सरकारच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडून येण्यास मदत झाली.

परदेशस्थ भारतीयांनी ते ज्या देशात राहतात तेथे केवळ आíथक विकासातच नव्हे तर तिथल्या राजकीय प्रक्रिया व एकंदर विकासातही योगदान दिलेले आहे. बऱ्याच भारतीयांनी राजकारणात चांगला ठसा उमटवला आहे. अशा भारतीयांचा एक दबाव गट तयार करता येईल का, याची चाचपणी करणे आवश्यक ठरते. कारण अशा दबावगटाच्या माध्यमातून भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करता येईल, तसेच भारतामध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण इ. बाबींचा ओघ वाढण्यास मदत होईल. सध्या भारत सरकारचे बहुचíचत कार्यक्रम डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यांनाही फायदा होऊ शकतो.

भारत सरकार परदेशस्थ भारतीयांना विविध मार्गानी भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना भारतामध्ये उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून देण्याची निकड आहे. सध्या प्रचलित असणारे कायदे, कररचना, पर्यावरणीय मंजुऱ्या इ. बाबींमधील क्लिष्टता कमी करणे आवश्यक आहे.

(q) Indian Diospora has an important role to play in South-East Asian countries, economy and society. Appraise the role of Indian Diaspora in South-East Asia in this context.

. भारताचे दक्षिण-पूर्व आशियाशी प्राचीन काळापासून संबंध आहेत. ब्रिटिश राजवटीदरम्यान भारतीयांना मोठय़ा प्रमाणात अनुबंधित मजुरांच्या स्वरूपामध्ये तेथे नेण्यात आले होते. उत्तरामध्ये भारतीयांनी आग्नेय आशियायी देशांमध्ये दिलेल्या योगदानाविषयी थोडक्यात लिहावे लागेल. उदा. सिंगापूरमधील माहिती तंत्रज्ञान, उद्योग, मलेशिया व म्यानमारमध्ये उद्योग, शिक्षण, नागरी सेवा, फिलिपिन्स व इंडोनेशियासारख्या देशांमधील वस्रोद्योगाची निर्यात. भारतीयांनी या देशांमध्ये स्वत:ला योग्य प्रकारे सामावून घेतलेले आहे. परिणामी भारतीय वंशाचे लोक आग्नेय, आशियायी देश आणि भारतीय संस्कृती व वारसा यांमध्ये दूत म्हणून कार्यरत आहेत.

परदेशस्थ भारतीयांना भारताशी अधिकाधिक जोडून भारत आणि ते राहात असलेले देश यांच्या विकासामध्ये त्यांचे सहकार्य प्राप्त करण्याची आवश्यकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2019 4:04 am

Web Title: upsc exam preparation akp 94 16
Next Stories
1 विपाशा
2 कर सहायक मुख्य परीक्षा पदनिहाय पेपर प्रश्न विश्लेषण
3 आंतरराष्ट्रीय संघटना
Just Now!
X