चंपत बोड्डेवार

UPSC च्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये सामाजिक समस्या या घटकाअंतर्गत जमातवाद हा मुद्दा समाविष्ट केलेला आहे.

वसाहतिक काळापासून ते आजतागायत जमातवाद ही भारतातील एक प्रमुख सामाजिक समस्या असलेली दिसते. स्वातंत्र्योत्तर काळातही या समस्येने आपल्या देशातील सांस्कृतिक विविधतेला मोठा धोका निर्माण केलेला आहे. या मुद्दय़ाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी प्रथमत: जमातवादाची मूळ संकल्पनात्मक धारणा समजून घ्यावी. तद्नंतर सामाजिक प्रक्रियेतील कोणत्या पोकळीतून जमातवादी जाणिवा निपजतात, तसेच जमातवाद हा बहुविध सांस्कृतिक, सामाजिक घटकांवर कसा प्रभाव टाकतो, हे पाहावे.

या सामाजिक मुद्दय़ावर वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये तसेच इतर माध्यमांतून विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध होतात. वसंत पळशीकर यांचे ‘जमातवाद’ या शीर्षकाचे मराठीतील पुस्तक या संदर्भात उपयुक्त आहे. तसेच इंग्रजीतून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राम आहुजा यांच्या Social Problems या पुस्तकामधून ही समस्या समजून घेता येईल. मुख्य परीक्षेत या समस्येवर जमातवादाच्या स्वरूपासंबंधी थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जमातवादाला स्पर्शून जाणाऱ्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. सामाजिक सद्भाव, सामाजिक ऐक्य, सामाजिक वीण, सामाजिक सहिष्णुता, सामाजिक ध्रुवीकरण इत्यादी. कारण हे सर्व मुद्दे वर्तमानात भारतीय समाजव्यवस्थेत उपस्थित आहेत.

Communalism या संकल्पनेला मराठीत ‘जमातवाद’ अथवा ‘सांप्रदायिकता’ असेही शब्दप्रयोग वापरले जातात. धार्मिक मूलतत्त्ववाद या अंगानेही जमातवादाचा अभ्यास केला जातो. सर्वसामान्यांची रूढीप्रियता, धर्मभोळेपणा यांचा आपल्या हितासाठी फायदा घेऊन एखादा राजकीय किंवा धार्मिक समुदाय दुसऱ्या धार्मिक समुदायाविरुद्ध धर्माच्या आधारावर संघर्ष करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा जमातवादाचा जन्म होतो. त्यातून धर्माचे राजकारण आकार घेते. थोडक्यात, जमातवाद म्हणजे दोन समुदायांमध्ये धर्माच्या आधाराने संघर्ष निर्माण होणे होय.

जमातवाद समुदायाच्या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेवर भर देतो. प्रत्येक धार्मिक समुदायाचे हितसंबंध विभिन्न असतात, किंबहुना परस्परविरोधी असतात. परिणामत: एका विशिष्ट धार्मिक समुदायाला आपल्या हितसंबंधाची जपणूक करायची म्हटले तर दुसऱ्या धार्मिक समुदायावर मात करण्याशिवाय पर्याय नसतो. ‘धर्म’ या घटिताच्या आधारे सामाजिक हितसंबंध जपता येतात, असे सांगून त्यासाठी जमातवाद धर्माच्या आधारे संघटन करण्याचा प्रयत्न करतो. जमातवाद हा बहुविध संस्कृती झाकोळून टाकत असतो. विशिष्ट सांस्कृतिक घटकांच्या हितसंबंधांचे राजकारण करून सांस्कृतिक बहुविधतेच्या समर्पकतेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जाते.

वसाहतिक शासनाच्या कूटनीतीतून आणि त्यांच्या इतिहासलेखनातून जन्माला आलेली सांप्रदायिकतेची समस्या ही राष्ट्र-राज्य बनण्याच्या प्रक्रियेत असलेल्या भारतासमोरील मुख्य अडथळा बनून राहिली. स्वातंत्र्य चळवळीपासून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आलेला दिसतो. फाळणीच्या अनुभवानंतर नेहरूंनी जमातवादाला शह देण्यासाठी विविधतेतच भारताची संस्कृती लपलेली असून त्यातूनच एकता निर्माण करणे शक्य असल्याचे सांगितले. पुढील काळात जमातवाद आणि राजकारण यांची सरमिसळ होऊ लागल्याने या समस्येचे निराकरण करणे शासनाच्या आवाक्याबाहेर गेले. जमातवाद ही समस्या केवळ सामाजिक न राहता ती राजकारणावर कुरघोडी करू लागली. त्यातून तिचे राजकीय समस्येत रूपांतर झाले. हे लक्षात घेता जमातवाद आणि राजकारण यांच्या आंतरसंबंधावर प्रश्न येऊ शकतात.

शासनसंस्थेद्वारा जमातवादी प्रक्रियेला गोंजारण्यातून जमातवादाची समस्या अधिकाधिक बळकट होत जाते. परिणामत: सामाजिक लोकशाही अडचणीत येते. सामाजिक मने दुभंगून समाजाची घडी विस्कटू लागते. जमातवादाच्या समस्येचे सामाजिक आणि राजकीय संदर्भ पाहता त्यातील गुंतागुंत समोर येते. विभिन्न समुदायांतर्गत लोकशाही जाणिवा रुजल्याशिवाय राष्ट्राची अखंडता अबाधित राहू शकत नाही. त्यामुळेच जमातवादाचा मुद्दा आंतरिक सुरक्षेसमोर एक मोठे आव्हान उभे करतो. या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो.

जमातवादी प्रक्रियेने संविधानकृत नागरिकांना प्रदान केलेल्या ‘भारतीय’ या विवेकपूर्ण राष्ट्रीय अस्मितेसमोरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसते. यातून आपल्या संविधानाने दिलेली ओळख पुसट करून त्याऐवजी समाजातील व्यक्तींना सांप्रदायिक ओळख देण्याचा प्रयत्न होतो. ‘आपण आणि ते’ अशी समाजाची वर्गवारी केली जाते. सामाजिक ताणाच्या निर्मितीतून संशयाची आणि शत्रुत्वाची भावना उपजते. एकमेकांकडे पाहण्याचे दृष्टिकोनही सांप्रदायिक बनू लागतात. इतिहास आणि सांस्कृतिक प्रतीकांचा आधार घेऊन, भावनिकतेला आवाहन करून लोकांना दुसऱ्या धार्मिक समुदायाविरोधात कृतिसज्ज केले जाते.

खुल्या आर्थिक धोरण प्रक्रियेतील विसंगतीमुळे परिघावर फेकलेल्या समाजघटकांमध्ये ‘सापेक्ष वंचिततेची जाणीव’ तयार होऊन सामाजिक तुटलेपण येऊ लागते. असे नाराज समाज घटक दोन्ही बाजूंनी जमातवादी प्रक्रियेत ओढले जातात किंवा त्या प्रक्रियेचे बळी ठरतात. वाढत्या बेरोजगारीमुळे संसाधनांची कमतरता आणि त्यातून इतरांची संसाधने बळकावण्याची प्रक्रिया जमातवादाच्या उदयाला कारणीभूत ठरते. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात दृक्-श्राव्य माध्यमाच्या वापरातून आपल्या कृतिकार्यक्रमांना सहमती मिळवत जमातवाद आपले भरणपोषण करतो.

जमातवादामुळे सामाजिक सहिष्णुता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही घटनात्मक मूल्ये पायदळी तुडविली जातात. परस्परांच्या संस्कृतीविषयी आदर आणि आपले मत स्पष्टपणे  मांडण्यास आडकाठी येते. सामाजिक सहिष्णुतेच्या वृद्धीसाठी अल्पसंख्याकांना विश्वासात घ्यावे लागते. राष्ट्र-राज्याच्या अखंडतेसाठी सामाजिक लोकशाहीचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनसंस्था आणि नागरी समाज यांना घ्यावी लागते. याउलट विभिन्न समुदायांमध्ये परस्परांविषयी संशयी वातावरण निर्माण झाले तर सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया दूषित होऊन असहिष्णुता वाढीस लागते, त्यातून अभिव्यक्तीची गळचेपी होते.