06 August 2020

News Flash

नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेचा गाभा समजून घेणे आवश्यक ठरते.

यूपीएससीची तयारी : तुकाराम जाधव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेचा गाभा समजून घेणे आवश्यक ठरते. या परीक्षांचा गाभा म्हणजे या परीक्षांचे स्वरूप आणि त्यात यशस्वी होण्याची व्यूहनीती समजून घ्यावी लागते. यूपीएससीतील नागरी परीक्षेचे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी) असे प्रमुख दोन टप्पे आहेत.

यूपीएससीने प्रो. एस. के. खन्ना समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी २०११ सालापासून सुरू केली. या समितीने नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेबाबत काही बदल सुचविले होते. या बदलांनुसार २०११ सालापासून पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन (G.S.) आणि नागरी सेवा कल चाचणी (C-SAT) असे दोन पेपर समाविष्ट केले. सामान्य अध्ययन हा विषय पूर्वीदेखील होता. मात्र आता त्यात काही नवे अभ्यासघटक समाविष्ट करून तसेच पारंपरिक अभ्यास घटकातील काही प्रकरणे अद्ययावत करून महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. दुसरे म्हणजे पूर्वी असणारा वैकल्पिक विषय रद्द करून त्याऐवजी नागरी सेवा कल चाचणी हा नवा पेपर समाविष्ट केला आहे.

पुढे यूपीएससीने नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेबाबत शिफारशी करण्यासाठी प्रो. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. केंद्र सरकारने समितीच्या शिफारशींमध्ये काही सुधारणा करून या शिफारशी स्वीकारल्या. आयोगाने २०१३ सालापासून मुख्य परीक्षांसाठी या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली. नव्या स्वरूपानुसार मुख्य परीक्षेचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात इंग्रजी आणि भारतीय भाषा असे दोन पात्रता पेपर्स असून ते प्रत्येकी ३०० गुणांचे आहेत. या पेपर्समध्ये प्राप्त केलेल्या गुणांची अंतिम यादी तयार करताना समावेश करण्यात येत नसला तरी यामध्ये पात्र ठरल्याशिवाय पुढील पेपर्स तपासले जात नाहीत. मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या भागामध्ये निबंधाचा एक पेपर, सामान्य अध्ययनाचे एकूण ४ पेपर्स आणि वैकल्पिक विषयांचे २ पेपर्स अशा एकूण ७ पेपर्सचा समावेश होतो. हे सातही पेपर्स प्रत्येकी २५० गुणांकरिता असल्याने अंतिम गुणवत्ता यादीत येण्यासाठी एकूण १७५० गुणांची लेखी परीक्षा आणि

२७५ गुणांची मुलाखत अत्यंत महत्त्वाची ठरते. गतवर्षीच्या सामान्य अध्ययनाचे (मुख्य) पेपर्स विचारात घेतल्यास असे दिसते की, प्रश्नांची संख्या वाढविली आहे आणि एकूण शब्दमर्यादाही वाढविली आहे. त्यामुळे वेळेच्या मर्यादेत उत्तरे लिहिण्याचा भरपूर सराव आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाने प्रश्नपत्रिकेतील सर्वच्या सर्व प्रश्न अनिवार्य केले आहेत. नव्या बदलांनुसार सामान्य अध्ययन या विषयाचे महत्त्व निर्णायकरिता वाढवले आहे. स्वाभाविकच आपल्या तयारीचा मुख्य रोख सामान्य अध्ययनावर असणे अपेक्षित आहे. त्यासाठी एका बाजूला सामान्य अध्ययनाच्या तयारीची व्याप्ती वाढवावी लागणार तर दुसऱ्या बाजूला प्रभावी व नेमक्या लिखाणाचा भरपूर सरावही करावा लागणार. या बरोबरीने निबंध आणि वैकल्पिक विषयांकडे योग्य लक्ष दिले जाईल याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न निव्वळ माहितीप्रधान नव्हे तर, विश्लेषणात्मक असणार हे लक्षात ठेवून आपल्या तयारीची दिशा आखावी.

मुलाखतीच्या संदर्भात आपला बायोडाटा म्हणजे व्यक्तिगत माहितीतील घटकांची सर्वागीण तयारी करावी. त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण चालू घडामोडींची जाण व त्याविषयक आपले मत ही बाब मध्यवर्ती ठरते. मुलाखती देण्याचा सराव सातत्याने केल्याने हे कौशल्य विकसित करता येते.

शेवटी, या नव्या पद्धतीनुसार अभ्यास करताना बदललेल्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन, आकलन करणे आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे अत्यावश्यक ठरते. नव्या घटकांच्या तयारीसाठी नवे, अधिकृत आणि अद्ययावत संदर्भसाहित्य वापरणे उपयुक्त ठरेल. संदर्भसाहित्याची उपलब्धता हा मुद्दा एक आव्हान ठरणार आहे, यात शंका नाही. त्यातही वर्तमानपत्रे, नियतकालिके, दरवर्षी अभ्यासक्रमावर प्रसिद्ध केले जाणारे संदर्भग्रंथ आणि आवश्यक तिथे इंटरनेटचा वापर करण्यावर भर हवा. म्हणूनच नव्या यूपीएससीचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक, समग्र आणि नेमका अभ्यास हे धोरणच उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही.

पुढील लेखात आपण या परीक्षेच्या तयारीसाठी नेमकी कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, याची चर्चा करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 12:19 am

Web Title: upsc exam study akp 94 15
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : चालू घडामोडींचा अभ्यास
2 करिअर क्षितिज : जैवमाहिती तंत्रज्ञान
3 यूपीएससीची तयारी : UPSC परीक्षेची तोंडओळख
Just Now!
X