यूपीएससी  मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर-३

श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राचा आढावा घेणार आहोत. कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रे भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानले जातात. आजमितीला कृषी क्षेत्राचा रोजगार निर्मितीतील वाटा हा ४८.९% इतका आहे. तसेच दारिद्रय़ निर्मूलन आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राकडे पाहिले जाते. कृषी क्षेत्र हे अन्नधान्य, चारा आणि उद्योगक्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणारे क्षेत्र आहे.

आत्तापर्यंत राबविण्यात आलेल्या सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राचा अधिकगतीने विकास साधण्यासाठी विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला जमीन सुधारणांवर भर दिला गेला. नंतर १९६६ मध्ये नवीन कृषी धोरण आखले गेले जे हरितक्रांती नावाने ओळखले जाते आणि ते आजतागायत चालू आहे. ज्याद्वारे कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर दिला गेला आणि अन्नधान्य उपलब्धतेमध्ये स्वयंपूर्णता साध्य करण्यात आली. कृषी क्षेत्राचा सर्वागीण विकास साधल्याशिवाय आर्थिक विकासाची गती कायम राखणे अशक्य आहे. कृषी व कृषी संलग्न क्षेत्रांची अपेक्षित वाढ जर साध्य झाली तर देशांतर्गत स्थूल उत्पादनामध्ये वाढ होऊन नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि दरडोई देशांतर्गत उत्पनामध्ये वाढ होईल. तसेच, गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्येवर मात करून खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येईल, हा महत्त्वाचा उद्देश कृषी व कृषी संलग्न क्षेत्रांच्या विकासासाठी सरकारमार्फत आखलेल्या धोरणाचा सुरुवातीपासूनच राहिलेला आहे. या क्षेत्राचा स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटय़ामध्ये उतरोत्तर घट होत आलेली आहे, पण या क्षेत्रावर उपजीविकेसाठी अवलंबून असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्राची शाश्वत वृद्धी साधल्याशिवाय सर्वसमावेशक वाढीचे ध्येय साध्य करणे कठीण आहे.

१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासून कृषी व कृषी संलग्न क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी उपयोजना आखण्यात आलेल्या आहेत, ज्याद्वारे कृषी व कृषी संलग्न क्षेत्राला वित्त पुरवठा व्यवस्थित होईल तसेच नवनवीन तंत्रज्ञानही या क्षेत्रामध्ये येईल व उत्पादकतेमध्ये वाढ होईल आणि या क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायभूत सुविधाचा विकास करता येईल, हा मुख्य उद्देश कृषी व कृषी संलग्न क्षेत्रामधील गुंतवणूक नीतीचा राहिलेला आहे. याचबरोबर भारत सरकारमार्फत दिला जाणऱ्या प्राधान्यक्रम क्षेत्र वित्तपुरवठा अंतर्गत होणाऱ्या एकूण वित्तपुरवठय़ामधील ४०% वित्तपुरवठा हा कृषी व कृषी संलग्न क्षेत्रासाठी केला जातो. ग्रामीण अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. जर प्रगत तंत्रज्ञान, बारमाही जलसिंचनाची सोय, कर्जपुरवठा आणि लागणाऱ्या पायभूत सुविधाची उपलब्धता अधिक सक्षम करण्याची गरज आहे आणि हे साध्य करण्यासाठी सरकारमार्फत अनेक योजना या क्षेत्राचा जलदगतीने विकास घडवून आणण्यासाठी राबविण्यात येत आहेत. तसेच या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांची वेळोवेळी दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी सरकारकडून विशेष प्राधान्य या क्षेत्राला दिले जाते.

या घटकावर विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न

* २०१३ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘भारतीय अर्थव्यवस्थेत जमीन सुधारणा, कृषी उत्पादकता आणि गरिबी निर्मूलन यामधील संबंध प्रस्थापित करा. कृषीपूरक जमीन सुधारणा आराखडा आणि अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांची चर्चा करा.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी जमीन सुधारणा, कृषी उत्पादकता आणि गरिबी निर्मूलन या सर्वाचे मूलभूत आकलन असणे गरजेचे आहे. त्याशिवाय यामधील संबंध नेमके काय आहेत आणि ते कसे परस्परपूरक आहेत, याची माहिती असल्यासच याचे उत्तर अधिक समर्पकपणे लिहिता येऊ शकते.

* २०१७ च्या परीक्षेत ‘स्वातंत्र्यानंतर भारतातील कृषी क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या क्रांती घडलेल्या आहेत याचे
* ष्टीकरण करा. या क्रांतीमुळे भारतातील गरिबी निर्मूलन आणि अन्न सुरक्षेसाठी कशी मदत केलेली आहे’? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१८ च्या परीक्षेत ‘किमान आधारभूत किंमत (MSP) यामुळे तुम्हाला काय समजते? किमान आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे कमी उत्पन्न जाळ्यातून (low income trap) वाचवू शकते.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, तसेच पीक पद्धती, सुपरमार्केट व पुरवठा साखळी व्यवस्थापन यावरही प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* २०१९ च्या परीक्षेत राष्ट्रीय पाणलोट प्रकल्पाचा पाण्याचा ताण असणाऱ्या (water-stressed areas) भागातील शेती उत्पादन वाढीवर झालेल्या परिणामाचा तपशील द्या. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. याव्यतिरिक्त अन्न प्रक्रिया क्षेत्र – या समोरील आव्हाने व सरकारच्या उपयायोजना यांचा तपशील द्या, आणि एकीकृत कृषीप्रणाली शाश्वत कृषी उत्पादनात कशी सहायक ठरू शकते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.

सप्टेंबर २०२० या महिन्यात भारतीय संसदेने The Farmersl Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Bill sqsq, Farmers (Empowerment and Protection) Agreement of Price Assurance and Farm Services Bill, २०२० and Essential Commodities (Amendment) Bill हे तीन बिल पास  केलेले आहेत. यामध्ये असणाऱ्या तरतुदी, यामुळे होणारे बदल व एकूणच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने असणारी उपयुक्तता व शेतकऱ्यांना होणारे फायदे व तोटे अशा सर्व पैलूंनी याचा विचार करणे गरजेचे आहे. २०२० च्या मुख्य परीक्षेत (जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या) यावरती नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. या आधीच्या लेखामध्ये सुचविलेले संदर्भ आणि याच्या जोडीला संबंधित चालू घडामोडीची तयारी करण्यासाठी नमूद केलेले संदर्भसाहित्य याचाच वापर या घटकाची तयारी करण्यासाठी करावा. कारण यामध्ये कृषी व कृषी संलग्न क्षेत्राविषयी उपयुक्त असणारी माहिती आपणला मिळते.