सनदी लेखापालाच्या म्हणजेच सी. ए.च्या फायनल परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. या निकालाचे प्रमाण ३.१ टक्के होते. म्हणजेच १००० मध्ये ३१ उत्तीर्ण व ९६९ अनुत्तीर्ण झाले. २५/३० वर्षांपूर्वी हा निकाल ०.००२ म्हणजे हजारांत २ उत्तीर्ण व ९९८ अनुत्तीर्ण असा लागल्याचे ऐकिवात आहे. या निकालाचा विचार केल्यास शंभरात तीनजण उत्तीर्ण आणि ९७ अनुत्तीर्ण  झाले आहेत. म्हणजेच ९७ जणांमध्ये उत्तीर्ण होऊ शकणारे विद्यार्थी नाहीतच का, हा प्रश्न मनात भेडसावतो. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेला चार-पाच वेळा बसलेले व बारावीला उत्तम गुण मिळवून गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थीही आहेत. अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये, म्हणून हा लेखप्रपंच.
या अभ्यासक्रमाला पैसा खर्च होत नाही, असा (गैर)समज आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नसते. या अभ्यासासाठी आवश्यक ठरणारी महागडी पुस्तके, शिकवण्या, अभ्यासक्रमासंबंधित खर्च दोन लाखांच्या घरात जातो. तर अप्रत्यक्ष पगाराचे किमान साडेतीन वर्षांचे ८ ते १० लाखांचे नुकसान होते. याचा अर्थ असा की, या विद्यार्थ्यांची त्यांच्या सी.ए.कडे साडेतीन वर्षांची उमेदवारी सुरू असताना त्यांचा जेमतेम प्रवासखर्च निघेल एवढीच रक्कम त्यांना शिकाऊ मानधन म्हणून दिली जाते. म्हणजेच या शिकाऊ उमेदवारांनी बाहेर नोकरी केली असती व त्यांचा मासिक पगार सरासरी २५ हजार धरला तरी त्यांचे साडेतीन वर्षांचे नुकसान ९ ते १० लाखांच्या घरात होते. तसेच वर नमूद केल्याप्रमाणे शिकवणी वर्ग व पुस्तके यांचा दोन ते तीन लाखांचा खर्च वेगळाच. म्हणजेच ही रक्कम ११-१२ लाखांपर्यंत पोहोचते. मात्र सी.ए. झाल्यावर हीच व्यक्ती उत्तम क्षमतेच्या जोरावर चांगले पैसे कमावू शकते.
सी.ए. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व्यवसाय चांगला चालावा, यासाठी काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. एकीकडे सी.ए.चा अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याचबरोबर आपल्याला व्यवसायात अनेक संधी आहेत, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
अशिलाला मुलाखतीची वेळ दिल्यास त्यावेळी स्वत: वेळेवर उपस्थित राहायला हवे. आतापर्यंत ज्या सीएंकडे उमेदवारी केली त्यांच्याकडून बक्षीसपत्र, भागीदारीपत्र, जागा करार, भाडेकरार इत्यादी नमुन्यांच्या झेरॉक्स मिळवून ठेवाव्यात. व्यावसायिक सेवा हे क्षेत्र असे आहे की, तुम्ही अशिलाला वेळेवर सेवा दिल्यास तुमच्या नावाला व सेवेला आपोआपच प्रसिद्धी मिळते.
अशिलाच्या फाईल्स या स्वत:च्या नावाच्या छापील असाव्यात. फाईलच्या आतील बाजूस अशिलाची पूर्ण माहिती म्हणजे, नाव, कार्यालयीन पत्ता, राहण्याचा पत्ता, सर्व दूरध्वनी क्र., कायम खाते क्र., प्राप्तीकर विभाग, जन्मतारीख याचा उल्लेख असावा. तसेच अशिलांची स्वतंत्र नोंदवही करून त्यामध्ये या माहितीची नोंद ठेवा. अशिलांची अनुक्रमणिका करावी. त्यामुळे त्याचा फाईल नंबर शोधणे सोपे जाते.
दोन मुलाखतींमध्ये साधारणपणे १० मिनिटांचे अंतर ठेवावे. पुढील अशिलाची फाईल टेबलावर काढून ती पाहून ठेवावी. त्यामुळे अशिलाशी घडाघडा बोलता येते. अशील जेव्हा मुलाखतीसाठी वेळ मागतो, तेव्हा त्याला किती वेळाचे काम आहे हे विचारावे. यामुळे नंतरच्याला त्यानुसार मुलाखतीची वेळ देता येते.
या व्यवसायात महत्त्वाचे म्हणजे रोज व्यापार/ आर्थिक व व्यावसायिक विषयाचे वाचन हे कमीत कमी पाऊण तास तरी व्हायला हवे. त्यातील महत्त्वाच्या नोंदी स्वतंत्रपणे एका वहीत मुद्दाम लिहून ठेवाव्यात.
 व्यवसायाची सुरुवात करताना लहान लहान गृहनिर्माण सोसायटीची कामे मुद्दाम घ्यावीत. अशामुळे काही दिवसांनी त्या सोसायटींचे सभासद काहीतरी प्रमाणात नक्कीच तुमच्याकडे त्यांच्या कामासाठी येतील. त्यामध्ये व्यावसायिकही असतील. व्यावसायिक काम चालू असताना लहान सार्वजनिक संस्थांचे काम मुद्दामच एखादे पदाधिकारी म्हणून स्वीकारावे. यानंतर सर्वात महत्त्वाचे काय तर समोरचा अशील काय बोलतोय इकडे जातीने लक्ष ठेवावे. त्याला जराही कमी लेखू नये. त्याच्या म्हणण्याच्या थोडक्यात नोंदी ठेवाव्यात. बरेचसे व्यावसायिक समोरच्याला हो हो म्हणतात व नंतर काहीतरी वेगळाच प्रकार करतात. व्यवसायामध्ये ग्राह्य़ (इम्लाईड) दखल (कॉगनिझन्स), प्रतिसाद (रिस्पॉन्स) व स्पष्टपणा (क्लॅरिटी) यांना फार महत्त्व आहे.
तसेच रोजच्या रोज आलेल्या पत्रांना व दूरध्वनींना त्वरित उत्तरे गेली पाहिजेत. कार्यालयात आवक/जावक टपाल ही रजिस्टर्स मुद्दाम ठेवावीत. आपल्या व्यवसायातील मित्रांचा एक अभ्यासगट तयार करावा. यामध्ये विचारांची/शंकांची देवाण-घेवाण ठरावीक दिवशी मुद्दाम करावी.
जे विद्यार्थी नापास झाल्याने या व्यवसायात शिरत आहेत त्यांनी कायद्याची एलएल.बी. पदवी संपादन करावी. याचे कारण एकदा वकील सनद मिळाल्यावर सरकारदरबारी कुठल्याही कामासाठी अडत नाही. अशिलाच्या वतीने त्या कामासाठी वकीलनाम्यामध्ये सर्व अधिकार मिळतात. म्हणून कायदा पदवीचा उपयोग पदोपदी होतो. तसेच हे नापास विद्यार्थी ऑडिट/सर्टिफिकेशन ही सर्व कामे करू शकतात. ती त्यांनी जरूर करावी व अशा कामांसाठी आपल्या सी.ए. पास झालेल्या मित्रांचे साह्य़ मिळवावे. म्हणून म्हणतो नापास विद्यार्थ्यांनो, जराही नाउमेद होऊ नका. तुमच्याकडे फक्त सी.ए. पदवीच नसली तरीसुद्धा इतर सर्व काही तुमचेच व तुमच्याच हातात आहे. बघा, जोमाने विचार करा मग तुम्हांलाही उत्तम व्यवसाय करता येईल.
http://www.Lntecc.com