मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात स्पर्धापरीक्षांची लक्षावधी संदर्भ पुस्तकं असणारे सुसज्ज असे महर्षी दयानंद फौंडेशन वाचनालय सुरू झाले आहे. व्रज पटेल या सरकारी अधिकाऱ्याच्या अथक परिश्रमातून उभे राहिलेल्या या ग्रंथालयात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या सर्व वैकल्पिक विषयांच्या क्रमिक पुस्तके तसेच संदर्भग्रंथांसह सुमारे एक लाख पुस्तके येथे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील युवावर्ग स्पर्धा-परीक्षांकडे सकारात्मकतेने-आत्मीयतेने पाहू लागला आहे, राष्ट्रीय पातळीवर त्यात यशही मिळवू लागला आहे. मात्र, सामान्यपणे या परीक्षेची तयारी म्हटली की, तीन प्रश्नांची चिंता या विद्यार्थ्यांना आजही लागून राहतेच. योग्य मार्गदर्शन, अपेक्षित पुस्तके आणि दिवसाचे २४ तास उपलब्ध राहू शकेल अशी अभ्यासिका, हे ते तीन प्रश्न. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एखादी मध्यवर्ती वाचनालयासारखी वास्तू सोडली तर विद्यार्थ्यांना अभ्यासिका म्हणून संपूर्णपणे मोफत वापरता येईल अशा फारशा वास्तू नाहीत. शिवाय ही अभ्यासिका २४ तास उपलब्ध नसते, तो भाग वेगळा. मग यावर उपाय काय?
दादरसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात, पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशा दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर- अशा ठिकाणी ‘महर्षी दयानंद फौंडेशन वाचनालय आणि अभ्यासिका’ हे या समस्येचे उत्तर ठरू शकेल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला असणाऱ्या सर्व वैकल्पिक विषयांच्या क्रमिक पुस्तके तसेच संदर्भग्रंथांसह सुमारे एक लाख पुस्तके येथे उपलब्ध आहेत. शालेय पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षेपासून ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षांपर्यंत आणि अभियांत्रिकी-वैद्यकीय शिक्षणासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षांपासून ते जीआरई-टॉफेल यांसारख्या परीक्षांपर्यंत अशा सर्व अभ्यासक्रमांसाठी येथे ‘खाद्य’ आहे. हे वाचनालय आणि विद्यार्थी यांच्यात फक्त एकाच गोष्टीचे अंतर आहे आणि ती गोष्ट म्हणजे या राष्ट्रासाठी काही तरी करण्याची तीव्र इच्छाशक्ती!
कसे काय उभे राहिले असेल हे वाचनालय, काय असेल याची जन्मकथा, असे प्रश्न मनात डोकावल्यावाचून राहत नाहीत. एका महाविद्यालयीन युवकाचे भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न होते. स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाने, त्यांच्या देशाविषयीच्या विचारांनी तो युवक भारावलेला होता, इतका की, महाविद्यालयीन वर्ग, महाविद्यालयाचे वाचनालय आणि रामकृष्ण मठ ही त्याची जणू निवासस्थाने झाली होती. प्रशासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठीचा अभ्यास जोमाने सुरू होता. मात्र म्हणावे, असे यश हाती लागत नव्हते. सलग दुसरा प्रयत्न त्यांना प्रशासकीय सेवेची संधी देऊ शकला नाही. जे आपल्याला जमले नाही ते निदान इतरांना मिळविण्यात हातभार लावता यावा, या भावनेने या युवकाने आपल्याजवळची पुस्तके अभ्यास करण्यासाठी इतरांना द्यावयास सुरुवात केली. त्यातूनच ही वाचनालयाची संकल्पना आकारास आली.
व्रजलाल पटेल असे त्या युवकाचे नाव आहे. मनाने सदैव तरुण-उत्साही आणि झपाटलेपणा अंगी असलेले हे व्यक्तिमत्त्व सध्या ५४ वर्षांचे असून सध्या ते सरकारी सेवेत आहेत. पात्रता असूनही निव्वळ पुस्तकांचा अभाव आणि अभ्यासासाठी अनुकुल वातावरण नसणे यामुळे कित्येक तरुण स्पर्धा-परीक्षांमध्ये यशस्वी ठरू शकत नसताना पाहत होतो, त्यांना मदत करायची आंतरिक तळमळ होती, माझ्याकडे मदत करण्याजोगे एकच होते आणि म्हणून मी वाचनालय सुरू केले, व्रज पटेल सांगतात. या साहेबांची तशी आणखी एक ओळख आहे.. ‘कौन बनेगा करोडपती’च्या पहिल्या पर्वातील पहिलावहिला कोटय़धीश हर्षवर्धन नवाथे आठवतोय? या हर्षवर्धनने ‘फोन अ फ्रेंड’ सुविधेचा वापर करताना व्रजलाल पटेलांशी संपर्क साधला होता, परिणाम अर्थात आपल्यासमोर आहेच.
एकूणच अत्यंत उमदे व्यक्तिमत्त्व आहे त्यांचे. या वाचनालयाचं नाव ‘महर्षी दयानंद’ का या प्रश्नाचे उत्तर देताना ते सांगतात, महर्षी दयानंद यांचा माझ्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. धर्मसुधारणा असोत, राष्ट्रनिष्ठा चेतवणे असो किंवा समाजसुधारणा असोत, दयानंद प्रत्येक बाबतीत आघाडीवर होते. भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील अनेकांचे महर्षी दयानंद हे प्रेरणास्थान होते. वेदांचा अभ्यास करणारे दयानंद कोणत्याही परंपरेच्या चौकटीत न अडकता विज्ञाननिष्ठा आणि विवेकवादाचा पुरस्कार करणारे होते. आज देशातील तरुणांनी-खऱ्या आर्यानी, यापेक्षा काही वेगळं असणं गरजेचं आहे का? असा प्रतिप्रश्न विचारत ते महर्षी दयानंद या नावाची कारणमीमांसा विशद करतात. नि:स्वार्थी, शुद्ध, प्रामाणिक, सर्वस्व झोकून देणारे देशभक्त युवक घडविणे, त्यासाठी त्यांना मूलभूत सुविधा पुरविणे हे फौंडेशनचे मिशन आहे आणि या युवकांनी मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असावे ही फौंडेशनची अपेक्षा आहे.
एका खेडय़ातून आलेल्या, मार्गदर्शनाचा अभाव असलेल्या आणि पुस्तक खरेदीची क्षमता नसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रामाणिक इच्छाशक्ती म्हणजे महर्षी दयानंद फौंडेशन वाचनालय आहे. या वाचनालयामध्ये सामान्य ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, संख्याशास्त्र, भारताचा-जगाचा इतिहास, भारतीय राज्यघटना, लोकप्रशासन, भारतीय तसेच जागतिक भूगोल, तत्त्वज्ञान, अनेक भाषांमधील साहित्ये, अभियांत्रिकी (त्यातही सर्व विद्याशाखा), वैद्यकीय शिक्षण (यामध्ये क्रमिक पुस्तकांसह देश विदेशातील
अत्यंत नामांकित आणि अगदी उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या पुस्तक-ग्रंथांचा समावेश) मानसशास्त्र, समाजशास्त्र,
भौतिक-रसायनशास्त्रे, वनस्पती-प्राणिशास्त्र अशा विविध विषयांचा समावेश आहे आणि समावेश म्हणजे पेढय़ावर
चारोळी असावी तशी एक-दोन नाहीत तर कोणत्याही जिज्ञासू विद्यार्थ्यांला आपली तहान शमवता येईल इतपत ग्रंथसंग्रह
येथे उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठ आणि एशियाटिक सोसायटी या दोन वाचनालयांचा अपवाद सोडल्यास ‘महर्षी दयानंद फौंडेशन वाचनालय’ पुस्तक संख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा आत्मविश्वासपूर्ण दावा पटेल सर करतात. सामान्यपणे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतोच की, ही पुस्तके किती दिवस वापरता येतील? ‘‘मी अभ्यासासाठी म्हणून नेलेली पुस्तके माझा अभ्यास पूर्ण होईपर्यंत पटेल
सरांनी कधीच परत मागितली नव्हती,’’ हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे उद्गार या अनुषंगाने पुरेसे बोलके आहेत.
सुरुवातीस काही हजार पुस्तकांनिशी सुरू झालेले हे वाचनालय हळूहळू जसजसे या कामाचे महत्त्व पटत गेले, तसतसे पटेल यांच्या मित्रांनी त्यांना आपल्याजवळील पुस्तके देण्यास सुरुवात केली. २००० साली हा आकडा २५ हजार पुस्तकांपर्यंत पोहोचला होता आणि आज तो लाखाच्या घरात गेला आहे. केंद्र सरकारतर्फे, देशातील सर्व राज्य सरकारांतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेश तसेच निवड परीक्षांसाठी येथे संदर्भपुस्तके-ग्रंथ उपलब्ध आहेत. शिवाय महाविद्यालयीन शिक्षणासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, रेल्वे-बँका-गुप्तचर खाते-कॅग अशा विविध खात्यांसाठी-विभागांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी आवश्यक ते सर्व साहित्य येथे उपलब्ध आहे. केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी दिल्लीला जातात. विशेषत: भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षांसाठी. तेथे नामांकित क्लासेसच्या नोटस् मिळवतात.. त्यासाठी वाजवीपेक्षा जास्त शुल्क भरतात. पण त्या सर्व क्लासेसच्या नोटस्, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची विविध विषयांवरील टाचणे, एनसीईआरटीची पुस्तके असे सर्व (खास आयएएस परीक्षेसाठी लागणारे) साहित्य इथे आपल्या दिमतीस आहे.
पैसे नाहीत, म्हणून कोणालाही अडवणे स्वभावत:च आवडत नसल्याचे पटेल सांगतात. त्यामुळे या कारणासाठी कोणीही मार्गदर्शनापासून वंचित राहू नये या भावनेपोटी परीक्षा कशी द्यावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, सकारात्मक कसे राहावे, प्रेरणा कशा टिकवाव्यात असे सर्व प्रकारचे मार्गदर्शन देण्याची त्यांची तयारीही असते.
ज्यांना कोणत्याही स्पर्धा-परीक्षेस बसायचे नाही अशांसाठीसुद्धा इथे विविध कथा-कादंबऱ्या-धार्मिक पुस्तके आदी साहित्य उपलब्ध आहे. विशेष म्हणजे कोणत्याही मासिक शुल्काविना ही सुविधा वापरता येऊ शकते, मात्र यासाठी केवळ शिस्तीचा भाग म्हणून अनामत रक्कम जमा करून घेतली जाते, जी परत मिळते. एकूणच अत्यंत उपयुक्त असे हे वाचनालय आणि ही अभ्यासिका.
ग्रंथालयाचा पत्ता – वसंत स्मृती, महर्षी दयानंद फाऊंडेशन, भाजपा कार्यालय, चौथा मजला, फाळके रोड, दादर (पूर्व), वेळ – स. ८ ते रात्रौ १० पर्यंत
 व्रज पटेल यांचा ईमेल आणि संपर्क क्र.- vrajppatel@gmail.com ९८६७२२२२१०

प्रशासकीय सेवा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम
भारतीय जनता पक्षाच्या ‘वसंत स्मृती’ या मुंबई प्रदेश कार्यालयात ‘वसंत स्मृती’ आणि ‘महर्षी दयानंद फौंडेशन वाचनालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय सेवा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणाअंतर्गत सुमारे चार हजार चौरस फुटांचे ग्रंथदालन, अभ्यासासाठी वैविध्यपूर्ण साहित्य, २४ तासांची अभ्यासिका, संपूर्ण मोफत संगणक आणि इंटरनेट प्रणाली, शिवाय बदललेल्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन उपलब्ध होईल. हे प्रशिक्षण सशुल्क असले तरी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल असणाऱ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येईल, असे व्रज पटेल यांनी सांगितले. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात मात्र कुचराई करता कमा नये अशी रास्त अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.