संगीत क्षेत्रातील विविध संधी, अभ्यासक्रम आणि कामांचे स्वरूप यांचा घेतलेला आढावा-
रुची, गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी या सर्व गोष्टी संगीत क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांत ताल आणि लय यांची जाण, नवनिर्मितीक्षमता, कल्पक वृत्ती आणि मंचावर उभे राहण्याचा आत्मविश्वास असायला हवा. या क्षेत्रातील गायक, वादक, निर्देशक, आरेखक, निर्माते, व्यवस्थापक अशा अनेक प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींना कायमच वेळेची तमा न बाळगता काम करावं लागतं.
संगीत क्षेत्रामध्ये अनेक पोटविभाग आहेत. प्रामुख्यानं भारतीय संगीत (शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावगीत, चित्रपट इ.), पाश्चात्य संगीत (यामध्ये क्लासिकलबरोबरच पॉप, रॉक, जॅझ, फ्युजन इ. समाविष्ट) आणि आता संमिश्र संगीताचा उदय होतो आहे. या क्षेत्रात करिअर करताना वर्षांनुवर्षे उमेदवारी, उत्पन्नाची अनिश्चिती आणि उपजत कलागुणांची सत्त्वपरीक्षा हा या क्षेत्रातील प्रमुख संघर्ष आहे.
पात्रता : या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी विशेष पात्रतेची गरज नसते. मात्र विषयातील एखाद्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक ठरते. संगीताचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. साधारणपणे प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षांचा असून पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा असतो तर पदविका आणि पदव्युत्तर पातळीचे अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचे आहेत.
करिअरचे विविध पर्याय
एखादा कलाकार किंवा कलाशिक्षक होण्याबरोबरच संगीत दिग्दर्शक, गीतलेखक, संगीत प्रसिद्धीकार, संगीत पत्रकार, संगीतोपचारतज्ज्ञ, डिस्क जॉकी, कलाकार व्यवस्थापक/जनसंपर्क अधिकारी असे पर्याय या क्षेत्रात उपलब्ध आहेत.
संगीत दिग्दर्शक/गीतकार : संगीत रचनाकार संगीताची निर्मिती करतो आणि तयार झालेल्या संगीताचा साज एखाद्या गीतावर चढवून एका नवीन गाण्याची निर्मिती करतो. जाहिराती आणि इतर प्रकारच्या प्रसिद्धीसाठी लहान लहान गीते लिहिणाऱ्या जिंगल रायटर्सची एक वेगळीच श्रेणी तयार झाली आहे.
गायक/सादरकर्ते : गायन अथवा वादन या  क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी संगीत क्षेत्रातील उच्च दर्जा आणि तांत्रिक कौशल्य प्राप्त करणे आवश्यक असते.
निर्माते : संगीत क्षेत्रातील ध्वनिमुद्रण सामग्री आणि कलाकार या सर्वाना एकत्र करून त्यांना संचाच्या स्वरूपात सादर करण्याचे निर्मात्याचे काम असते. स्टुडिओ आरक्षित करणे, संगीतकारांना आणि तंत्रज्ञांना करारबद्ध करणे, ध्वनिमुद्रित संगीताचे मूल्यमापन करणे आणि ध्वनिमुद्रणाच्या अंदाजपत्रकावर नियंत्रण ठेवणे ही निर्मात्याची प्रमुख कामे आहेत.
कलाकार/संगीत व्यवस्थापन : कलाकार व्यवस्थापनामध्ये नियोजन, संघटन आणि एखाद्या कलाकाराच्या करिअरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या वाटाघाटींचा समावेश होतो.  या लोकांचा संगीत क्षेत्रातील व्यापारी घडामोडींशी संबंध असतो. एखाद्या विशिष्ट कलाकारासाठी किंवा एखाद्या कलाकारांच्या संचासाठी कलाकार व्यवस्थापन कंपनीमध्ये सादरीकरण संस्थेमध्ये, प्रवासी संगीत समूहामध्ये काम करता येऊ शकते.
संगीत पत्रकारिता : संगीत क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेणे, विविध प्रसारमाध्यमांसाठी कलाकारांच्या मुलाखती घेणे आणि संगीत समीक्षाविषयक लिखाण आदी उपक्रमांचा संगीत पत्रकारितेच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो. संगीत क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन घडामोडी उदा. नवे अल्बम, नवे कलाकार यांची माहिती, त्यांच्या बातम्या देण्याचे काम या व्यक्ती करतात. काही वेळा ते समीक्षक म्हणून काम करीत असतात. संगीत क्षेत्रामधील मुक्तव्यवसाय करण्याच्या पर्यायापैकी हा एक पर्याय आहे. असे पत्रकार विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि वेबसाइटसाठी काम करू शकतात.
संगीत प्रशिक्षक/शिक्षक : शास्त्रीय संगीताची पाश्र्वभूमी असलेले संगीत शिक्षक हे संगीत विद्यालये चालवू शकतात तसेच खासगी शिकवण्याही घेऊ शकतात. अनेक शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे आणि संस्थांमध्ये संगीत प्रशिक्षकाला मागणी असते.
संगीत संशोधक : संगीत संशोधन हा संगीत आणि संगीत इतिहासातील उच्च पातळीचा अभ्यास आहे. संगीताचे उत्तम ज्ञान, संशोधनाची वृत्ती आणि उत्तम संवाद कौशल्य यांच्या आधारावर संगीत संशोधकाला संशोधन संस्थांमध्ये काम करता येते.
व्हिडीओ जॉकी (Vj) आणि डिस्क जॉकी (DJ) : विविध म्युझिक चॅनेल्सच्या प्रसारामुळे संगीतवेडय़ा लोकांसाठी व्हिडीओ जॉकी हा एक अतिशय आवडीचा करिअर पर्याय निर्माण झाला आहे. व्हिडीओ जॉकीला टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करावे लागते, संगीत क्षेत्रातील कलाकार आणि संबंधितांच्या मुलाखती घ्याव्या लागतात.
 व्हीजे आणि डीजे साठी विशेष प्रकारच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीची आवश्यकता नाही. मात्र काही वैयक्तिक गुणवैशिष्टय़े असावी लागतात. त्याचबरोबर जनसंज्ञापन, व्हिज्युअल कम्युनिकेशन किंवा ललितकला यांची पाश्र्वभूमी असणे उपयुक्त ठरते.
संगीत भांडारपाल : प्रशिक्षित संगीततज्ज्ञांना संशोधन किंवा संगीत संग्रहतंत्रांची माहिती असते. अशा व्यक्तींना महाविद्यालये, शाळा, रेडिओ, टीव्ही आणि चित्रपट संस्थांमध्ये काम मिळू शकते. त्याचबरोबर इतर कोणत्याही संगीतविषयक पात्रतेशिवाय त्यांच्याकडे ग्रंथपाल आणि माहिती विज्ञानाची पदवी असणे गरजेचे असते.
संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी उपजत कलेला मेहनतीची जोड दिली तर त्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील.