नजीकच्या काळात जगभरात एका बातमीने सर्व कला रसिकांचे लक्ष वेधले. ती बातमी लिओनाडरे दा विंची या चित्रकाराच्या एका अप्रकशित चित्राविषयी होती. हे चित्र असल्याचे माहिती होणे, ते सदबीज या लिलाव करणाऱ्या कंपनीने लिलावात काढणे, पुढे त्याची खरेदी अबुधाबीतल्या एका शेखने करणे, तेही काही लक्ष पाऊंड खर्च करून. हे सगळे तपशील वाचून जगाला धडकीच भरली. यात किमतीपलीकडे आणखी एक महत्त्वाचा तपशील होता, तो मात्र बऱ्याचजणांकडून दुर्लक्षिला गेला. हे चित्र विक्रीला येण्याआधी या कंपनीशी संबंधित अशा अनेक अभ्यासक आणि संवर्धकांनी त्याचा अभ्यास केला. डागडुजी केली. त्यासाठी तब्बल ४ वर्षांचा काळही घेतला. या सगळ्या मेहनतीमुळे खरे म्हणजे ते चित्र इतके महाग बनले. या सगळ्या गोष्टी येतात कलावस्तू संवर्धन या शीर्षकाखाली. आजचा विषय हाच आहे.

भारतात आपल्या सगळ्यांनाच आपल्या कला-परंपरांचा भलताच अभिमान वगैरे आहे. पण तो दाखवण्यासाठी आपण काय करतो? तर शून्य. आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन आपण करतो का, ही विचार करण्याचीच गोष्ट आहे. आपण कायमच कलानिर्मिती, त्याचा आस्वाद, रसग्रहण, सौंेदर्यशास्त्र या सगळ्याची चर्चा करत असतो. संवर्धनाबद्दल मात्र कोणी फारसे बोलत नाही. खरेतर हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

घरातल्या जुन्या वडिलोपार्जित गोष्टी आपण नीट वापरतो किंवा सांभाळून ठेवतो. काहींचा संग्रह करतो. यातील बहुतांश वस्तू दगड, लाकूड, काच, धातू, कागद, कापड याच्याच बनलेल्या असतात. या सगळ्यावर हवा, पाणी, इतर पदार्थ किंवा वातावरणाचा वेगवेगळा परिणाम होतो. काही वेळा त्यांच्या रासायनिक स्वरूपात बदल होऊ शकतो. त्यामुळे वस्तूंचा रंग बदलणे, भेगा पडणे, ठिसूळ होणे, कडक होणे असे अनेक बदल होतात. काही वेळा या सगळ्यामुळे वस्तू नाश पावते. म्हणूनच त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असते. वैयक्तिक पातळीवर आपण अशा प्रकारे वस्तू, गोष्टी यांच्याशी जोडले गेलेलो असतो. त्यात आपल्या भावना गुंतलेल्या असतात. जे एका वस्तूच्या बाबतीत तेच समाजाच्या बाबतीतही लागू पडते. आपण अनेक संग्रहालये पाहतो. ते वेगवेगळ्या कलाकृती सांभाळून ठेवत असतात. त्यातील काही त्यांनी कष्टाने जमवलेल्या असतात तर काही त्यांना भेट मिळालेल्या असतात. संग्रहालय संपूर्ण समाज, देश, संस्कृती आणि मानवी इतिहासाचा ठेवा याचे एक दस्तावेजीकरण करत असते. इथेही संवर्धनाचा वाटा मोठा आणि महत्त्वाचा असतो. वस्तूचे संवर्धन करण्यासोबतच भविष्यातील हानी रोखण्याची योजनाही करता येते. त्यासाठी अद्ययावत विभाग असणे गरजेचे असते. त्यामुळे संवर्धनशास्त्राचे शिक्षण महत्त्वाचे ठरते.

आता या विषयाचा कलाशिक्षणाशी कशा प्रकारे संबंध आहे, हे माहिती करून घेऊ. कलाशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांला कलावस्तूची जाण असते. चित्र, त्याची माध्यम, अभिव्यक्ती, त्यातील द्रव्ये, चित्राचे पृष्ठभाग या सगळ्याची त्याला ओळख आणि माहिती असते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कलाशिक्षण घेताना आपण कलेचा अभिव्यक्ती म्हणून विचार करतो. उत्स्फूर्तपणे कलानिर्मिती करत असतो. पण कला संवर्धनाचा विचार करता आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकणे गरजेचे असते, ते म्हणजे इथे खूप वेगळ्या पद्धतीने आणि शिस्तीने काम करायचे असते. ते अंगवळणी पडायला वेळ लागू शकतो. पण एकदा का या क्षेत्रात रस निर्माण झाला की, मग हे क्षेत्र व्यापक आहे. यात अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी आहेत. तुम्ही भारतात काम केल्यानंतर याच विषयात अधिक शिक्षण परदेशातही घेऊ शकता. त्यानंतर त्याआधारे परदेशातील कलाक्षेत्रातील विविध मोठय़ा कंपन्या, संग्रहालये किंवा गॅलऱ्या यांच्यासाठी काम करता येते. याचबरोबर यामध्ये संशोधनाचीही संधी आहे. म्हणजे सर्व कलावस्तूंच्या संवर्धनाचा अभ्यास केल्यानंतर एखाद्या विशिष्ट कलाप्रकारात किंवा कलाकारासाठीच संवर्धन करण्याचे काम तुम्हाला करता येते. उदा. केवळ एखाद्या विशिष्ट प्रकारच्या पेंटिंगचे संवर्धन कसे करावे, याविषयी तुम्ही संशोधन करू शकता.

चित्रकला, शिल्पकला, टेक्स्टाइल डिझाइन, मेटल क्राफ्ट, सिरॅमिक्स अशा कोणत्याही शाखेतून फाइन आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यावर संवर्धनशास्त्राचे शिक्षण घेता येते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी आणि कन्झव्‍‌र्हेशन असे अभ्यासक्रम आहेत. दिल्लीच्या नॅशनल म्यूझियममध्ये एम ए इन कन्झव्‍‌र्हेशन असा अभ्यासक्रम आहे. याखेरीज नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नॅशनल प्रॉपर्टी लखनौ इथे सर्टिफिकेट कोर्ससुद्धा करता येतो. याखेरीज INTACH सारख्या संस्थांमध्ये याविषयीच्या कार्यशाळासुद्धा होत असतात. कलावस्तू संवर्धन या विषयातील शिक्षण घेऊन आपण जागतिक वारसा जतन करण्यास हातभार लावू शकतो.

mahendradamle@gmail.com