मी आता दहावीनंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा व्हीजेटीआयमधून करीत आहे. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्या वर्षांची टक्केवारी घेतली जाईल. तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

आनंद शिरसाट

आपणास अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्गाला थेट प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी पदविका अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांची एकत्रित टक्केवारी लक्षात घेतली जाते. किमान टक्केवारी खुल्या गटातील संवर्गासाठी ४५ टक्के आहे आणि राखीव गटातील संवर्गासाठी विद्यार्थ्यांची टक्केवारी ४० टक्के आहे. तथापी आपण प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता,दर्जा आणि बाजारातील स्थान लक्षात घेऊन संबंधित संस्थेचा कटऑफ यापेक्षा कितीतरी अधिक राहू शकतो आणि तो दरवर्षी बदलत असतो.  त्यामुळे गेल्या वर्षी जो कटऑफ असेल तोच यंदा वा पुढेही राहील असे ठामपणे सांगता येत नाही. तथापी आपणास ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे, त्या संस्थेत मागील वर्षीचा कटऑफ काय होता याची माहिती घेऊन ठेवावी. त्यापेक्षा तुमची टक्केवारी साधारणत: पाच टक्के अधिक येत असल्यास संधी चांगली राहील. कॉमन अ‍ॅडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप प्रक्रिया संपल्यानंतर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांच्या रिक्त राहिलेल्या जागांच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने काही टप्पे ठरवले आहेत. त्यानुसार तिसऱ्या क्रमांकाच्या टप्प्यावर पदविका धारकांना थेट प्रवेश देण्याची बाब नमूद आहे. मात्र अशा प्रवेशासाठी संबंधित उमेदवाराला पदविका परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.

 

सीए संबंधित कोणत्या संधी आहेत?

रेखा केशवशेट्टी

सीए म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटंट (सनदी लेखापाल)ला अकाऊंटिंग (लेखा तपासणी), ऑडिटिंग (हिशेब तपासणी), कॉर्पोरेट फायनान्स (कंपनी वित्त), टॅक्सेशन (कर निर्धारण), कॉर्पोरेट गव्हर्नन्स (कंपनी सुशासन) असे करिअरचे विविध पर्याय उपलब्ध होतात. या क्षेत्रात ते स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. सार्वजनिक सनदी लेखापाल हा प्रोपायटर म्हणून करिअर सुरू करू शकतो किंवा एखाद्या सनदी लेखापाल फर्ममध्ये त्याला रुजू होता येते. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करनिर्धारणाच्या कार्यात सनदी लेखापाल तज्ज्ञ सल्ला देऊ  शकतो. या शिवाय व्यावसायिक सल्लागार म्हणून वित्तीय अहवाल तयार करणे, वित्तीय पर्यायांची पुनर्रचना करणे, वित्तीय प्रोजेक्शन करणे या सेवा देऊ  शकतो. व्यवसाय आणि उद्योगांकडे असलेल्या संसाधनांच्या प्रभावी वापरासाठी सनदी लेखपाल साहाय्य करतात. वित्तीय व्यवस्थापन, नियोजन आणि वित्तीय धोरण निर्धारण या बाबींमध्ये ते सल्ला देतात. व्यावसायिकांना आणि व्यक्तींना कर नियोजन आणि करांबाबतच्या त्रुटी (कम्प्लायन्स) दूर करण्यासाठी ते साहाय्य करतात. शासकीय संस्थांपुढे ते आपल्या ग्राहका(क्लायंट)ची बाजू सादर करतात. उद्योग आणि शासकीय विभागात सनदी लेखापालांना मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यान्वयन अधिकारी अशासारखी जबाबदारीची पदे भूषविता येऊ  शकतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या माहिती तंत्रज्ञानाशी निगडित लेखापरीक्षण, आंतरराष्ट्रीय करनिर्धारण, आंतरराष्ट्रीय व्यापारी कायदे या विषयांसाठी भारतीय सनदी लेखापालांनाच प्राधान्य देतात. सनदी लेखापालांना पीएचडीची संधी देशातील ९० विद्यापीठे आणि सहा भारतीय व्यवस्थापन संस्था (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट) देतात. नागरी सेवा परीक्षेससुद्धा सनदी लेखापाल बसू शकतात. भारतीय व्यवस्थापन संस्था, बंगलोर प्रवेशासाठी विशेष वेटेज देते.

 

मी वाणिज्य विषयात पदवी घेतली आहे. मी डिप्लोमा इन टॅक्सेशन अँड लॉ या विषयाची परीक्षा देत आहे. मी सध्या लार्सन अँड टुब्रोमध्ये काम करत आहे. माझ्याकडे एक वर्षांचा अनुभव आहे. मला आता आयसीडब्ल्यूएचा अभ्यासक्रम करायचा आहे. आगामी जीएसटीच्या पाश्र्वभूमीवर डिप्लोमा इन टॅक्सेशन हे फायद्याचे ठरेल का?

सानी पंधारे

इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडियाचा फाऊंडेशन अभ्यासक्रम हा वर्षभर करता येतो. तथापी ज्या विद्यार्थ्यांना जून महिन्याच्या सत्र परीक्षेला बसावयाचे असेल त्यांना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करावा लागतो. तर ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या सत्र परीक्षेला बसावयाचे असेल त्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करावा लागतो. अर्हता- किमान १०वी उत्तीर्ण. या संस्थेचा इंटरमिजिएट अभ्यासक्रमसुद्धा वर्षभर करता येतो. तथापि ज्या विद्यार्थ्यांना जून महिन्याच्या सत्र परीक्षेला बसावयाचे असेल त्यांना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करावा लागतो. तर ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या सत्र परीक्षेला बसावयाचे असेल त्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करावा लागतो. अर्हता- किमान १२वी उत्तीर्ण आणि या संस्थेचा फाऊंडेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा ललित कला हा विषय वगळून कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क संकेतस्थळ- http://icmai.in/ जीएसटी (गुड्स अँड सव्‍‌र्हिस टॅक्स) मुळे करनिर्धारण सुटसुटित होणार आहे. कर रद्द केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही करत असलेला टॅक्सेशनचा अभ्यासक्रम सध्यातरी उपयुक्त ठरू शकतो.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com