विमा क्षेत्रातील अंडररायटर या पदाचा अभ्यास केल्यावर सर्वात जास्त मागणी असलेल्या शाखांचा विचार करूया..
विमा पॉलिसी, त्यातून मिळणारे सुरक्षा कवच, लाभांश हे दीर्घ मुदतीत अनुभवता येणारे फायदे आहेत. ग्राहकाला या करारांद्वारे लगेचच सेवेचा अनुभव घेता येत नाही. त्यात विमा कवच हे ग्राहकास खरा फायदा मृत्यूनंतर मिळवून देणारे उत्पादन आहे. म्हणजेच विमाग्राहक हा इतर ग्राहकांपेक्षा वेगळा ग्राहक ठरतो. जो सेवेचा खरेदीकर्ता असतो, पण उपभोक्ता नसतो. म्हणजेच ‘विमा कराराचे’ विक्रेते, मार्केटिंग डिपार्टमेंट हे विमा कंपनीने दिलेले ‘वचन’ करारांद्वारे ग्राहकास ‘विकत’ असते, परंतु ते वचन दीर्घ मुदतीत ग्राहक उपलब्ध नसताना (मृत्युदावा) पूर्ण होणारे असते. विमा पॉलिसींच्या या वैशिष्टय़ामुळेच ‘विमा विपणन’ (मार्केटिंग) आणि ‘डिस्ट्रिब्युशन’ हे फारच आव्हानात्मक काम ठरते.
जगातील कोणत्याही ‘सेवा’ ‘उत्पादनापेक्षा’ विमा विपणन हे सर्वार्थाने असाधारण आहे. आता या शाखेतील नोकरी-धंद्याच्या संधींबाबत –
विमा विपणन वेगवेगळ्या शाखांद्वारे होते. उदा. बँका, ब्रोकर्स, एजंट्स, ऑनलाइन, डायरेक्ट मार्केटिंग, अल्टरनेट विभाग. या सर्व शाखांमध्ये वर्षभर सेल्स मार्केटिंग मनुष्यबळांची गरज असते. कोणत्याही शाखेचा पदवीधर इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (IRDA)ची एजंट पात्रता परीक्षा देऊ शकतो. त्याचबरोबर नवीन सुधारणांनुसार केवळ एस. एस. सी. पास झालेल्या विद्यार्थ्यांना वय वष्रे अकरा पूर्ण झाल्यावर या परीक्षांना बसता येते. वयाची कमाल मर्यादा नसल्याने गृहिणी, निवृत्तवर्गही या परीक्षांना मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद देताना आढळतो. भारतामध्ये विमा एजंटचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे, परंतु विमा एजंटचे उत्पन्न पूर्णत: कमिशनवर अवलंबून असल्याने दीर्घ मुदतीत पूर्णवेळ व्यवसाय किंवा करिअर म्हणून निवड करणारे उमेदवार अत्यल्प प्रमाणात आढळतात. विमा एजंटची कारकीर्द ही ‘गुंतवणूक सल्लागार’ होण्याइतकी दीर्घ मुदतीत आíथकदृष्टय़ा लाभदायक आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे. विमा एजंट ही यशस्वी वित्तीय सल्लागार होण्यासाठी लागणारी पहिली पायरी आहे. गुंतवणूकसंधींच्या विविध पर्यायांसाठीचा अभ्यास करत अनेक प्रावीण्य परीक्षांना बसून दीर्घ मुदतीत ‘यशस्वी गुंतवणूकदारतज्ज्ञ’ होणे शक्य आहे. नोकरीच्या संधीही सेल्स-मार्केटिंग शाखेद्वारे उपलब्ध आहेत. २००३नंतर खासगीकरणामुळे मोठय़ा प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. व्यवस्थापन अभ्यासक्रमात मार्केटिंग व सेल्स विषयांतील स्पेशलायझेशन केल्यावर वरिष्ठ पदांसाठी उमेदवारांचा विचार केला जातो.
नोकरीतील अनुभव व यशस्वी वाटचालींनुसार दीर्घ मुदतीत आíथकदृष्टय़ा भक्कम मिळकतीचे करिअर उभारता येते. विमा विपणन करण्यासाठी व्यावसायिक वर्गाचीही गरज असते. त्यामुळे धंदेवाईक दृष्टिकोनातून या क्षेत्राचा विचार करणे फायद्याचे ठरते. एक जोडधंदा म्हणून अनेक व्यापारी अर्धवेळ विमा व्यवसाय करताना आढळतात. दीर्घ मुदतीत घरबसल्या मिळणारे उत्पन्न ही जमेची बाजू व्यावसायिक विमा ब्रोकर्स, एजंट उपभोगू शकतात.
विमा पॉलिसी विक्रीसोबत विमा एजंटची गरज विमा क्षेत्रास असते. विमा एजंटचे अयशस्वी होणे अल्पमुदतीत व्यवसाय सोडणे लक्षात घेतले तर नवीन एजंटची भरती वर्षभर चालू असते. मनुष्यबळाचा विकास, त्यांचे सकारात्मक व्यक्तिमत्त्व बळकट करणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन आत्मविश्वास वाढवणे असे कौशल्यगुण असणारे विकास आधिकारी (डेव्हलपमेंट ऑफिसर) हा विमा डिस्ट्रिब्युशन चॅनल्सचा कणा असतो. हे अधिकारी नेतृत्वगुण, सांघिक कौशल्यगुण, व्यवस्थापन या गुणांनी विमा एजंटची कामगिरी उंचावण्याचे मोलाचे काम पार पाडतात. त्यामुळे ‘विमा एजंट डेव्हलपर’ हे अधिकारी पद दीर्घ मुदतीत सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांना वरदान ठरू शकते.
स्वतची कंपनी उभारण्याचे स्वप्न आज भारतीय तरुण पाहात आहे. पूर्णवेळ नोकरीची सुरक्षितता, कायम पगाराची अपेक्षा या मनोद्वंद्वातून मराठी विद्यार्थीही बाहेर पडत आहेत. दूरसंचार माध्यमांच्या, माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे तरुण पदवीधर व्यापारातील जोखमींना अडथळा न मानता व्यक्तिस्वातंत्र्याचे, व्यक्तिमत्त्व विकासाचे अनुभव संपन्नतेचे सूत्र मानू लागला आहे. जोखीम अमर्याद संधी निर्माण करते हेही आता त्यांना पटले आहे. स्वयंरोजगार अनेक रोजगारांना जन्म देणारी संधी आहे. विमा क्षेत्रातील Insurance Marketing Firm, Web Aggregator व्यावसायिक संधी अशा नवोदित व्यापारीवर्गास उत्तम पर्याय ठरतात. सदर व्यवसाय कायदेशीर पूर्तता केल्यावर मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सुरू करता येतात.
विमा मार्केटिंग-सेल्स अभ्यासक्रम – प्रमाणपत्र परीक्षा
* एमबीए अंतिम वर्षांला मार्केटिंग आणि सेल्स विषय
* पदवीधर आणि लायसेन्शिएट / असोसिएट / फेलो इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया
* डिप्लोमा इन हेल्थ इन्शुरन्स / फायर इन्शुरन्स / मरिन इन्शुरन्स
* आयआरडीए इन्शुरन्स एजंट पात्रता परीक्षा
* आयएमएफ, ब्रोकर परीक्षा इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया
लेखिका सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.
भक्ती रसाळ – fplanner2016@gmail.com