डिजिटल साक्षरता अभियान किंवा केंद्रशासित नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन योजना ही ५२.५ लाख व्यक्तींकरिता माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याकरिता साकारण्यात आली आहे. यात देशभरातील सर्व राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशांतील अंगणवाडी आणि ‘आशा’ सेविका तसेच अधिकृत रेशन वितरक यांचा समावेश असून माहिती तंत्रज्ञानात निरक्षर असलेल्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानात साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण अंतर्भूत आहे. याद्वारे त्यांचा लोकशाही व विकासप्रक्रियेत सक्रिय परिणामकारक सहभाग निर्माण होईल, तसेच त्यांच्या रोजगारातही भर पडेल अशी अपेक्षा आहे.

प्रशिक्षणाच्या पातळ्या

योजनेचा उद्देश साध्य करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षणाच्या खालील दोन पातळ्या आहेत :

डिजिटल साक्षरतेची महती ओळखणे (पातळी १)

उद्दिष्ट : व्यक्तीला माहिती तंत्रज्ञान साक्षर करणे, ज्यायोगे तो/ती मोबाइल फोन, टॅबलेट यांसारखी डिजिटल उपकरणे वापरू शकेल. ई-मेल पाठवू व (प्राप्त ई-मेल) वाचू शकेल तसेच नेटवर माहितीचा शोध घेऊ शकेल. प्रशिक्षणक्रम कालावधी : २० तास (किमान १० दिवस आणि कमाल ३० दिवस)

डिजिटल साक्षरता मूलतत्त्वे (पातळी २)

उद्दिष्ट : माहिती तंत्रज्ञान साक्षरतेबरोबरच नागरिक वरच्या पातळीवर प्रशिक्षित होऊन सरकार व संस्था नागरिकांना देत असलेल्या विविध ई-गव्हर्नन्स सेवा मिळवू शकण्याची क्षमता.

प्रशिक्षणक्रम कालावधी : ४० तास (किमान २० दिवस आणि कमाल  ६० दिवस)

दोन्ही प्रशिक्षणक्रमांतील सूचनांच्या माध्यम भाषा

भारतातील अधिकृत भाषा

पात्रता निकष

ज्या घरातील १४ ते ६० वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती या माहिती तंत्रज्ञान साक्षर नाहीत, अशा घरातील व्यक्ती या योजनेखाली प्रशिक्षण घेण्यास पात्र समजण्यात येईल.

योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया

योग्य त्या पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या बिगर सरकारी संस्था, उद्योग, अधिकृत सरकारी केंद्रे, सामाईक सेवाकेंद्रे आणि अधिकृत शैक्षणिक संस्था १० लाख नागरिकांना माहिती तंत्रज्ञान साक्षर होण्यासाठी प्रशिक्षित करून सक्षम बनवण्याच्या कामी उपयोगात आणण्याची तरतूद आहे. अंमलबजावणी योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे :

कुटुंबाची पाहणी

  • पात्र कुटुंबे ठरवणे
  • प्रत्येक पात्र कुटुंबातून एक व्यक्ती प्रशिक्षणासाठी निश्चित करणे.
  • निश्चित केलेल्या व्यक्तीचे नाव आधार क्रमांकाचा वापर करून जवळच्या प्रशिक्षण केंद्रात दाखल करणे.
  • लाभार्थीस व्यक्तिगत युजरनेम व पासवर्ड देणे.
  • ई मोडय़ूल वापरून प्रशिक्षणार्थींनी स्वयं-अध्ययन करणे.
  • प्रत्येक मोडय़ूल आधार क्रमांकाचा वापर करून रोजच्या रोज वापरल्यानंतर झालेल्या प्रगतीचे सातत्याने मूल्यांकन करणे.
  • शिकण्याचे किमान तास भरल्यानंतर व मूल्यांकनात समाधानकारक परिणाम दाखवल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होतील.