राज्य सेवा पूर्वपरीक्षा

रोहिणी शहा

राज्य सेवा पूर्वपरीक्षा जानेवारीमध्ये प्रस्तावित आहे. पूर्वपरीक्षा पेपर एक – सामान्य अध्ययनामधील अर्थशास्त्र घटकाच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. या लेखामध्ये या घटकावर मागील तीन वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्याआधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पाहू.

प्रश्न १. खालील विधाने विचारात घ्या:

(a) भारतीय नियोजन आयोगाची जागा निती आयोगाने जानेवारी २०१५ पासून घेतली आहे.

(b) प्रमाणक स्थापक (नॉर्मेटिव्ह) नियोजन हे निती आयोगाचे मार्गदर्शक तत्त्व आहे.

पर्यायी उत्तरे:

    १) (a) फक्त बरोबर २) (b) फक्त बरोबर

    ३) (a) आणि (b) दोन्ही बरोबर ४) (a) आणि (b) दोन्ही चूक

प्रश्न २. जून २०१२ मध्ये Rio+२० घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) ठरविण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणते/ती वैशिष्टय़/ष्टय़े ठरविण्यात आलेले नव्हते?

अ. गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता

ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल संरक्षण

क. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास

ड. अतिरेकी संघटनांवर बंदी, परआक्रमणावर बंदी

पर्यायी उत्तरे

    १) फक्त क आणि ड २) फक्त अ, ब आणि क

    ३) फक्त ड ४) फक्त अ

प्रश्न ३. दारिद्रय घटविण्याच्या कोणत्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे कारण..

अ. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे.

ब. वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील (employer) अवलंबित्व वाढविते.

क. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल.

ड. श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील

पर्यायी उत्तरे

    १) फक्त अ अणि ब  २) फक्त ब आणि क

    ३) फक्त क आणि ड ४) वरील सर्व

प्रश्न ४. भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम हे सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केले आहेत?

अ. आम आदमी विमा योजना

ब. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

क. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम

पर्यायी उत्तरे

    १) फक्त अ अणि ब २) फक्त ब आणि क

    ३) फक्त क ४) वरील सर्व

प्रश्न ५. जोडय़ा लावा.

    गट अ (आर्थिक सुधारणा) गट ब ( उद्दिष्टे )

    (a) विमुद्रीकरण (i) काळ्या पैशाचे नियंत्रण

    (b) नवा बेनामी कायदा (ii) खोटे चलन निष्कासित करणे

    (c) दिवाळखोरी कायदा (iii) अनुदानांचे तर्काधिष्टीकरण

    (d) आधार कायदा   (iv) व्यवसाय सरलतेस प्रवर्तित करणे

पर्यायी उत्तरे:

१) (a) – (iv);  (b) – (iii); (c) – (ii);  (d)- (i)     २) (a) – (ii);  (b) – (i); (c) – (iv);  (d) – (iii)

३) (a) – (ii);  (b) – (i); (c) – (iii);  (d) – (iv)    ४) (a) – (i);  (b) – (ii); (c) – (iii);  (d) – (iv)

प्रश्न ६. सन २०११च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोडी लावा.

            शहरे      लोकसंख्या (दशलक्षामध्ये)

      अ.   बृहन्मुंबई   I               ८.७

      ब.  दिल्ली   II               १४.१

     क. कोलकाता  III              १६.३

     ड. चेन्नई  IV               १८.४

पर्यायी उत्तरे:

       १) अ. – III; ब. – IV;  क. – II; ड. – I            २) अ. – I; ब. – II;  क. – III; ड. – IV

       ३) अ. – II; ब. – I;  क. – IV; ड. – III            ४) अ. – IV; ब. – III;  क. – II; ड. – I

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे प्रश्नांचे स्वरूप समजून घेऊन तयारी करण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • बहुविधानी प्रश्नांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विचारण्यात आलेल्या मुद्याबाबत नेमकी अद्ययावत माहिती आणि पारंपरिक मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे.
  • योजनांबाबतच्या प्रश्नांमध्ये पर्यायांबाबत नेमकी माहिती असणे आवश्यक असलेले दिसते. योजना/ धोरणे यांबाबत तरतुदी, कालावधी, उद्देश अशा सर्व बाबी विचारण्यात आल्या आहेत.
  • आर्थिक नियोजन / पंचवार्षिक योजना या घटकाचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी दरवर्षी किमान एक प्रश्न त्यावर विचारलेला आहे.
  • दारिद्रय, लोकसंख्या, महागाई या मुद्यांमधील संकल्पनात्मक बाबींवर जास्त भर आहे पण याबाबतच्या चालू घडामोडी आणि अद्ययावत आकडेवारी यांचीही माहिती असणे आवश्यक आहे.
  • सध्या शाश्वत विकास लक्ष्ये गाठायची असली तरी सहस्रक विकास लक्ष्यांवरही प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे शाश्वत विकास लक्ष्ये आणि सहस्रक विकास लक्ष्ये यांची तुलनात्मक नोट्स काढून तयारी करणे जास्त फायदेशीर ठरते.