मागील लेखांमध्ये आपण एमबीएच्या दुसऱ्या वर्षांतील विशेषीकरणाच्या विषयांपैकी विपणन, वित्त आणि मनुष्यबळ विकास या विषयांची सविस्तर माहिती घेतली. आज आपण माहिती-तंत्रज्ञान आणि उद्योजकता विकास व्यवस्थापन या स्पेशलायझेशन्सचा विचार करूयात.
उद्योजकता विकास किंवा उद्योजकता व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे विशेषीकरण दुसऱ्या वर्षांत घेता येते. मात्र अतिशय कमी विद्यार्थी-विद्यार्थिनी हा विषय घेताना दिसतात. एमबीए झाल्यानंतर सर्वच जण चांगली नोकरी कशी मिळेल याचा विचार करतात आणि त्यामुळे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार फारसे विद्यार्थी-विद्यार्थिनी करीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती अगदी थोडय़ा प्रमाणात का होईना, पण बदलते आहे असे आशादायक चित्र दिसू लागले आहे. या विषयाचा अभ्यास करताना उद्योजकांच्या कार्यपद्धतीची माहिती करून घ्यावी. आपल्या भोवती अनेक छोटे-मोठे उद्योजक आपल्याला दिसतात. यामध्ये अगदी रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांपासून बडय़ा कंपन्यांपर्यंत सर्वाचा समावेश होतो. प्रत्येकाची कार्यपद्धती ही साहजिकच वेगवेगळी असते. या कार्यपद्धतीचा अभ्यास करून प्रत्येक प्रकारच्या उद्योजकाला कोणत्या अडचणी येतात, या अडचणी ते कशा प्रकारे सोडवतात हे पाहणे अत्यंत उपयोगी आहे. एमबीए झाल्यावर जर स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल किंवा एखादे दुकान, हॉटेल किंवा इतर कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात याची माहिती आधीच करून घेता येते. भांडवल उभारणीपासून, वेगवेगळ्या कायद्यांची पूर्तता या सर्व गोष्टी माहीत करून घेता येतात. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योजकांच्या केस-स्टडीज शिकता येतात. यशस्वी उद्योजकांच्या संस्थांचा अभ्यास तर केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर जे उद्योजक दुर्दैवाने अयशस्वी ठरले त्यांचा अभ्यास तर आवर्जून केला पाहिजे. यशस्वी उद्योजकांकडून अनेक गोष्टी शिकता येतातच, पण जे काही कारणांमुळे यशस्वी होत नाहीत त्यांच्याकडूनही खूप काही शिकता येते. अपयशाची कारणे शोधून ती कशी दूर करता येतील हे शिकता येते. याशिवाय ज्या उद्योजकांनी तोटय़ातील उद्योग नफ्यामध्ये आणला (टर्नअराऊंड) त्यांच्या केस स्टडीतूनही खूप काही शिकता येईल.उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सरकारी व खासगी अशा अनेक संस्था आहेत. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन त्यांचे मार्गदर्शन घेता येते. जर स्वत:चा व्यवसाय/ उद्योग सुरू करायचा असेल तर त्याची पूर्वतयारी करण्यासाठी व एकदा स्वत:चा व्यवसाय सुरू झाला की पुढील मार्गदर्शन घेण्यासाठी अक्षरश: अनेक गोष्टी करता येतात. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती व स्वत:ची मनोवृत्ती बदलण्याची नितांत गरज आहे. या दोन गोष्टी आणि धोका पत्करण्याची तयारी असेल तर नोकरीसाठी शोधाशोध न करता स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य आहे. उद्योजकता विकास या विशेषीकरणाप्रमाणेच कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन (फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट) हासुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. पण याही विषयाकडे वळणाऱ्या विद्याथी-विद्यार्थिनींची संख्याही कमी आहे. आपल्या देशामध्ये असंख्य लहान उद्योग असे आहेत की, ज्यामध्ये सर्व कुटुंबच व्यवसायामध्ये गुंतलेले आहे. अर्थात अनेक मोठे उद्योगसमूहसुद्धा फॅमिली बिझनेस या प्रकारात येतात, पण त्यांचे व्यवसाय करण्याचे परिमाण मोठे आहे. याही विषयाचा अभ्यास करताना उद्योग/ व्यवसाय चालवताना येणाऱ्या अडचणी समजणे आवश्यक आहे. यशस्वीपणे सुरू असणारे उद्योग, परिस्थितीतील बदल कसे स्वीकारत गेले व त्याप्रमाणे स्वत:च्या कार्यपद्धतीत कसे बदल घडवत गेले यावरून खूप गोष्टी शिकता येतात. याउलट स्वत:च्या कार्यपद्धतीत, वस्तूंच्या उत्पादनामध्ये तसेच इतर व्यवस्थापनामध्ये बदल न केल्यामुळे काही उद्योग कसे बंद पडले याचे विश्लेषणही खूप काही शिकवून जाते. वरील सर्व विवेचनातून असे लक्षात येईल की, वर्ग आणि पाठय़पुस्तके यांतून आपण महत्त्वाचे सिद्धांत, मूलभूत तत्त्वे इत्यादी शिकतो, ज्याला पर्याय नाही. मात्र त्याबरोबरच पुस्तकांपलीकडच्या अनेक गोष्टी शिकता येतात. यामुळे एमबीएनंतर चांगली करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या दोन्हींसाठी वेळ दिलाच पाहिजे म्हणजे या दोन वर्षांमध्ये वेळ घालवण्यासाठी मोकळा वेळच उरायला नको. असे झाले तर भावी करिअरमध्ये यशस्वी ठरण्यात अडचण नाही, हे नक्की. उर्वरित स्पेशलायझेशन्सचा विचार पुढील लेखात करूयात.. nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2015 रोजी प्रकाशित
उद्योजकता व्यवस्थापन
मागील लेखांमध्ये आपण एमबीएच्या दुसऱ्या वर्षांतील विशेषीकरणाच्या विषयांपैकी विपणन, वित्त आणि मनुष्यबळ विकास या विषयांची सविस्तर माहिती घेतली.
First published on: 31-08-2015 at 12:15 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entrepreneurship management