अथांग समुद्र हा सर्वानाच भुरळ घालत असतो. काही तासांच्या समुद्र सफरीमध्ये किंवा क्रुझमध्ये एखादा दिवस एन्जॉय केल्यानंतर आता समुद्रातच राहावे, अशी आपली काहीशी भारावलेली अवस्था होते. पण प्रत्यक्षात समुद्रात काम करणे हे किती खडतर आहे, हे तिथे काही महिने अथवा वष्रे घालविल्यानंतरच लक्षात येते. तरीदेखील असे काही करिअरचे पर्याय आहेत, जे नेहमी तुम्हाला खुणावीत असतात. असाच एक पर्याय म्हणजे मर्चण्ट नेव्हीचा.
साहस, उत्तम वेतन आणि सतत परदेश प्रवासाचे योग या तीनही गोष्टींचा एकत्र अनुभव देणाऱ्या गोष्टींचा तुम्ही शोध घेत असाल तर मर्चण्ट नेव्ही हा तुमच्यासाठी योग्य असा पर्याय आहे. सर्वसाधारणपणे तरुण पिढी करिअरमध्ये ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा करीत असते, त्या इथे आहेत. पण त्याचबरोबर, कुटुंबापासून आणि घरापासून दीर्घकाळापर्यंत दूर राहण्याची आणि अथक परिश्रम करण्याची तयारी हवी. जर ही तयारी असेल तर तुम्ही या क्षेत्रात निश्चितच प्रगती करू शकता. याशिवाय या क्षेत्राचा आणखी एक फायदा म्हणजे इथे तुम्हाला टॅक्स फ्री म्हणजे करमुक्त वेतन मिळते. त्याचबरोबर बढतीदेखील पटकन मिळते. हे सारे फायदे असले तरीही प्रामुख्याने भुरळ घालणारा फायदा म्हणजे वेतन स्वरूपात मिळणारा मुबलक पसा. (त्यातही तुम्ही कामाच्या निमित्ताने आर्थिक वर्षांतील सहा महिने देशाबाहेर राहिलात तर तुमचा चांगलाच टॅक्स वाचतो.) एकतर तरुण वयात तुम्हाला या क्षेत्रात शिरकाव करता येतो. अगदी वयाच्या बाविसाव्या वर्षी तुम्ही तृतीय श्रेणीतील अधिकारी अथवा चतुर्थ श्रेणीतील अभियंता म्हणून किंवा ऑइल टँकरवरील ज्युनियर ऑफिसरच्या श्रेणीत रुजू झाल्यास दरमहा तुम्हाला मिळणारे वेतन हे सुमारे १५०० अमेरिकन डॉलर इतके असते. अर्थात कंपनीच्या स्वरूपाप्रमाणे या आकडय़ात थोडाफार फरक पडू शकतो. या क्षेत्रात काम करणारे बहुतांश अधिकारी हे करारतत्त्वावर (कॉण्ट्रॅक्ट बेसिस) काम करणारे असतात. कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कराराचा हा काळ ६ ते ९ महिने, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हाच काळ ३ ते ६ महिन्यांइतका असू शकतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी की, जेव्हा तुम्ही कामाच्या निमित्ताने जहाजावर असता, तेव्हाच तुम्हाला वेतन व तत्सम स्वरूपाचे फायदे मिळतात.
या क्षेत्राचे प्रत्यक्षात जाणविणारे फायदे खूप असले तरीही इथले काम हे अत्यंत खडतर स्वरूपाचे असते. कामाच्या निमित्ताने बहुतांश वेळेला तुम्ही जहाजावर असता आणि फार थोडा वेळ जमिनीवर असता. जेव्हा तुमचे जहाज एखाद्या बंदरात पोहोचते तेव्हा सर्वचजण किनाऱ्यावर फिरण्यास मोकळे असतात असे नसते. बंदरात पोहोचल्यानंतरही अनेक प्रकारची कामे सुरू असतात. तिथेदेखील प्रत्येक अधिकाऱ्याला अथवा क्रू सदस्याला त्याच्या कामाच्या पाळीनुसार (शिफ्ट) काम करावे लागते. अशा वेळी या सर्व मंडळींना त्या क्षेत्राच्या व्यावसायिक परिभाषेत वॉचेस संबोधले जाते.
तुम्हाला नेमून दिलेले काम पूर्ण केल्यानंतर तुम्ही किनाऱ्यावर फिरायला मोकळे असता. पण जेव्हा तुमचे कामाचे तास सुरू होतात, त्या वेळी तुम्हाला परत येऊन कामाला सुरुवात करावी लागते. आधीच प्रचंड काम करून तुम्ही थकलेले असता, अशा वेळी किनाऱ्यावर फिरायचे की विश्रांती म्हणून झोप घ्यायची असे दोन पर्याय तुमच्यासमोर खुले राहतात. त्यातच अगोदर सांगितल्याप्रमाणे बंदरात पोहोचल्यानंतरही जहाजांवर सेिलग, मालाची चढ-उतार करणे (लोडिंग), डिस्चाìजग कार्गो अशी विविध स्वरूपाची कामे सुरू असतात.
अगोदर जहाज बंदरात बराच काळ थांबत असे. पण हल्ली मात्र तसे नसते. जहाज बंदरात थोडय़ा काळासाठी, इथे खरोखरीच ते अल्प काळासाठीच थांबविले जाते. अर्थात हा थांबण्याचा काळ त्या त्या जहाजाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. जसे कार्गो किंवा बल्क कॅरिअर्स असलेले जहाज असेल तर ते दीर्घकाळासाठी थांबू शकते. तर कंटेनर स्वरूपाचे जहाज असेल तर ते काही तास किंवा फार फार तर चोवीस तासांसाठी थांबते. अशा वेळी वॉचेस मंडळींची बंदरावर सहा तासांची डय़ुटी असते आणि सहा तासांची सुट्टी मिळते. ज्याला सहा तासांची ऑन-ऑफ डय़ुटी असे म्हणतात. त्यामुळेच जेव्हा जेव्हा बंदरात जहाज थांबते त्या त्या प्रत्येक वेळी तुम्हाला किनाऱ्यावर फिरायला वेळ मिळेलच असे सांगता येत नाही. शिवाय सहा तास रग्गड काम केल्यानंतर विश्रांती घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते.
कामाचे हे स्वरूप लक्षात घेतल्यानंतर आता तुमच्या लक्षात आले असेल की, का तुम्हाला इतका भरघोस मोबदला दिला जातो ते. तसे पाहिले तर चारी बाजूंनी समुद्र नि त्यात जहाज आणि तिथले जीवन या कल्पना पुस्तकात किंवा चित्रपटात पाहायला रम्य वाटतात. पण प्रत्यक्षात जीवन जगण्यास खूप खडतर आहेत. कारण बऱ्याचदा असे दिसून येते की, प्रत्यक्ष नागरी वस्तीपासून बंदर खूप लांब असते. त्यामुळे बंदरापासून त्यालगतच्या असलेल्या शहरात जाऊन परत येण्यातच बराचसा वेळ व्यर्थ जातो. शिवाय जेव्हा कधी एखाद्या नवीन शहराला भेट देण्याचा योग येतो तेव्हा तिथले एखादे प्रसिद्ध ठिकाण अथवा तिथल्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा मोह हा सर्वानाच होतो. त्यातच अनेक शहरांमध्ये व्हिसाबाबतीतले नियम हे फारच कडक असतात. अशा वेळी सहा तासांच्या फावल्या वेळात काय काय करावे हा प्रश्नच असतो. त्यामुळे अनेकांचा कल या काळात विश्रांती घेण्याकडे अधिक असतो.
जर मला माझ्या कामाचा उत्तम मोबदला मिळत असेल तर त्यासाठी कष्ट घेण्यात कसला आलाय त्रास, हा दृष्टिकोन ठेवून तुम्ही या क्षेत्रात वावरलात तरच येथील कामाचा, तिथल्या     जीवनशैलीचा ताण तुम्हाला जाणविणार नाही.
ऑफिसर किंवा मरिन इंजिनीअरिंग आणि नॉटिकल (डेक) अशा दोन विशेष श्रेणींमध्ये मर्चण्ट नेव्हीमधील करिअर करता येते. याशिवाय, काही सरकारी व खासगी संस्थांमार्फत सी फेअरर जे प्री-सी कोस्रेस म्हणून ओळखले जातात, हे कोर्स करून तुम्ही सी फेअरर म्हणून रुजू होऊ शकता. (या सर्व कोर्सना डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगची मान्यता लाभलेली आहे). यात पुढील कोर्सचा समावेश होतो :
१) नॉटिकल शास्त्राचा तीनवर्षीय पदवी कोर्स (१०+२) विद्यार्थ्यांसाठी
२) मरिन इंजिनीयिरगचा चारवर्षीय पदवी कोर्स (१०+२) विद्यार्थ्यांसाठी
3) डिप्लोमाधारकांसाठी दोनवर्षीय कोर्स
४) मॅकेनिकल इंजिनीयर पदवीधारकांसाठी एकवर्षीय कोर्स
५) डेक कॅडेटसाठी तीन महिन्यांचा कोर्स (१०+२) विद्यार्थ्यांसाठी
रेटिंग : (दहावी पास विद्यार्थ्यांसाठी)
१) प्री-सी कोर्स फॉर जनरल पर्पज रेटिंग – कालावधी चार महिने
२) प्री-सी कोर्स फॉर डेक रेटिंग – कालावधी तीन महिने
३) प्री-सी कोर्स फॉर इंजिन रेटिंग – कालावधी तीन महिने
४) प्री-सी कोर्स फॉर सलून रेटिंग – कालावधी चार महिने
याव्यतिरिक्त एफपीएफएफ, ईएफए, पीएसएसआर आणि पीएसटी हे चार बेसिक कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी युटीलिटी हॅण्ड किंवा पेटी ऑफिसर (फिटर्स) म्हणून रुजू होऊ शकतात.
 सरकारमान्य प्रशिक्षण संस्था : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्री-सी आणि पोस्ट-सी कोस्रेसचे प्रशिक्षण देणाऱ्या सरकारमान्य अशा एकूण चार प्रशिक्षण संस्था आहेत. तेव्हा जाणून घेऊया त्याविषयी :
१) ट्रेनिंग शिप चाणक्य, नवी मुंबई
२) मरिन इंजिनीयिरग अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट, कोलकत्ता
३) मरिन इंजिनीयिरग अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट, मुंबई
४) लालबहादुर शास्त्री कॉलेज ऑफ अॅडव्हान्स मरिन स्टडीज अॅण्ड रिसर्च, मुंबई
.या सरकारमान्य संस्थेशिवाय इतरही अनेक खासगी स्वरूपाच्या संस्था आहेत, ज्या नॉटिकल शास्त्राबरोबर इंजिनीअरिंग उमेदवारांसाठी दोन्ही दहावी व बारावीसाठी प्री-सी स्वरूपाच्या कोर्सचे आयोजन करतात. या संस्थांची स्वत:ची अशी प्रवेशप्रक्रिया पद्धत असते. असे असले तरीही त्याबाबतची जाहिरात ही वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जाते. या संस्था आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणदेखील देतात आणि त्यांच्या या कोस्रेसना भारत सरकारच्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंगचीदेखील मान्यता लाभलेली असते. परंतु,????????मर्चण्ट शीपमध्ये???? नोकरी मिळविण्यासाठी त्यांना कोर्स पूर्ण झाल्यानंतर कॉम्पिटन्सी परीक्षा द्यावी लागते. याबाबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की, शिपिंग जहाजावर कोणत्याही स्वरूपाचे काम करण्यासाठी उमेदवाराकडे भारत सरकारने प्रमाणित केलेले डायरेक्टोरेट ऑफ जनरल शिपिंगचे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी स्वत:जवळ असणे जरुरीचे असते. या प्रमाणपत्राला भारताबरोबर इतर देशांतही तितकीच मान्यता असते. या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा या डी.जी. शिपिंगच्या मर्कन्टाइल मरिन विभागातर्फे घेण्यात येतात. वर उल्लेखिलेल्या संस्थेमधून उमेदवाराचे प्री- सी प्रशिक्षण आणि जहाजावरील कामाचा योग्य तो अनुभव गाठीशी जमा झाल्यानंतर उमेदवार द्वितीय श्रेणी (सेकंड मेट)च्या मेट (डेक) आणि एमईओ आयव्ही (इंजिनीअरिंग)ची परीक्षा देण्यास पात्र ठरतो. ही प्रमाणपत्राची परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराची शिपिंग जहाजावरील थर्ड ऑफिसर/ फिफ्थ इंजिनीअर पदासाठी नेमणूक करण्यात येते अणि इथून त्याच्या आकर्षक वेतनाला प्रत्यक्ष सुरुवात होते. यानंतर उमेदवाराने एलबीएस (सरकारमान्य)किंवा तत्सम स्वरूपाच्या इतर खासगी संस्थांमधून पोस्ट-सीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यास व त्याच जोडीने इतर आवश्यक त्या परीक्षा दिल्यास त्याला बढतीबरोबर चांगली वेतनवाढदेखील मिळते.
या वर नमूद केलेल्या अधिकार पदाव्यतिरिक्त दहावी पास झालेले उमेदवार मर्चण्ट नेव्हीच्या रेटिंग माध्यमातून प्रशिक्षण घेऊ शकतात. त्यासाठी गणित व शास्त्र विषयात आवश्यक ते गुण मिळवून दहावी पास असणे आणि उमेदवाराचे वय साडेचोवीस वर्षांपेक्षा जास्त नसावे, इतक्याच माफक अटी आहेत. या अटींची पूर्तता करणारा उमेदवार या कोर्ससाठी पात्र ठरतो. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला प्रत्यक्ष जहाजावर सहा महिने प्रशिक्षणात्मक काम करून वॉच कीपिंगचे प्रमाणपत्र मिळवावे लागते. हे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर उमेदवार जहाजावर रेटिंगमध्ये सेल, डेक/ इंजिन रूम/ सलून/ पेटी ऑफिसर अशा विविध पदांसाठी काम करु शकतो नि आकर्षक मोबदला मिळवू शकतो.    
– अनुवाद : सुचित्रा प्रभुणे