|| अपर्णा दीक्षित
प्रस्तावनेचा परिच्छेद
प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे. दिलेल्या विषयाची प्रमुख भूमिका निश्चित करणे आणि प्रमुख मुद्दा ठामपणे मांडणे हे या परिच्छेदाचे महत्त्वाचे काम आहे. पुढे येणाऱ्या गुंतागुंतीच्या लेखनाला दिशा देणारा हा परिच्छेद आहे. वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारी वाक्ये येथे असली पाहिजेत. अशा प्रकारची सुरुवात खालीलपकी एखादी मांडणी करून केली जाऊ शकते.
- माहितीचा रंजक नमुना.
- आश्चर्यकारक माहिती.
- विषयास लागू असणारा सुविचार.
- आपल्या आजूबाजूला असणारा पण सहज लक्षात न येणारा विरोधाभास.
- अवघड संकल्पनेचे स्पष्टीकरण.
- एखाद्या घटनेचे थोडक्यात वर्णन.
- विचार करण्यास प्रवृत्त करणारा प्रश्न.
थेट विषय प्रवेश
८०० शब्दांपेक्षा कमी शब्दांत लिहिलेल्या निबंधाकरता खूप मोठी प्रस्तावना आवश्यक नाही. परंतु १२०० शब्दांचा निबंध लिहीत असताना सविस्तर प्रस्तावनेतून निबंधाची भूमिका स्पष्ट करणे शक्य होते. अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर इतर स्पष्टीकरणांवर वेळ अथवा शब्द वाया न घालवता प्रमुख मुद्दय़ांच्या मांडणीला सुरुवात करावी. आपण लिहीत असलेल्या विषयांच्या संदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा दाखला देऊन मूळ लिखाणाला सुरुवात करता येते. मात्र अशी सुरुवात करत असताना तोचतोचपणा टाळावा. तसेच सध्या ‘क्ष’ हा अतिशय कळीचा प्रश्न बनला आहे… किंवा मनुष्य कायमच ‘क्ष’ प्रश्न सोडवण्यात व्यग्र आहे…अशा ठोकळेबाज वाक्यांचा वापर टाळावा. इतकी व्यापक मांडणी जवळपास कोणताही महत्त्वाचा मुद्दा कवेत घेऊ शकते, म्हणूनच आपली सुरुवात ही थेट भूमिका असणाऱ्या अचूक वाक्यांनी व्हावी.
- अतिशय व्यापक – गुन्हेगारी ही सर्वच काळातील एक मोठी समस्या आहे.
- मुद्देसूद – बालगुन्हेगारांच्या शिक्षेची तीव्रता व त्यासंबंधीच्या समस्यांनी सध्याचे चर्चा विश्व व्यापले आहे. गेल्या काही वर्षांतील बालगुन्हेगारांच्या वाढत्या नोंदींमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
परिच्छेदांची मांडणी
प्रत्येक परिच्छेद ठरावीक प्रमुख मुद्दा मांडणारा असावा. तसेच मूळ मुद्दय़ाचा व प्रस्तुत परिच्छेदातील मुद्दय़ाचा नक्की कोणता संबंध आहे याचा स्पष्ट उल्लेख परिच्छेदात असावा. अनेक मुद्दय़ांचा भरणा करण्याऐवजी ठरावीक भूमिका निवडून, त्यास अनुसरून लिखाण करावे. परिच्छेदातील लेखनाचा ओघ कायम असावा. परिच्छेदाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठरावीक मुद्दय़ांचे स्पष्टीकरण असावे. आपल्या लेखनाची दिशा बदलते आहे असे वाटल्यास नवीन परिच्छेद सुरू करावा. परिच्छेदाची मांडणी करत असताना एकच परिच्छेद खूप मोठा अथवा खूप लहान होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
परिच्छेदामध्ये एकाच मुद्दय़ावर भर द्यावा. प्रत्येक परिच्छेद म्हणजे विचाराचे छोटे भांडार आहे या दृष्टिकोनातून प्रत्येक परिच्छेद परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. लिहीत असताना विचारांची दिशा बदलते आहे असे वाटल्यास नवीन परिच्छेद सुरू करावा. अशा प्रकारे मुद्देसूद परिच्छेद लिहिण्यासाठी खालील बाबींचा वापर करणे शक्य आहे.
- उदाहरणांच्या मदतीने संकल्पना स्पष्ट करावी.
- विषयाशी निगडित जाणकारांचे सुविचार योग्य ठिकाणी वापरावेत.
- आपण मांडत असलेल्या मुद्दय़ांच्या विरोधातील मुद्दय़ांना उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.
- आपल्या कल्पनांना पुराव्याचे व दाखल्याचे बळ द्यावे.
- सर्वसाधारणपणे माहीत असलेल्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा दृष्टिकोन सादर करावा.
- व्याख्या, कार्यकारणभाव, तुलना यांच्या आधारे विस्तृत चर्चा घडवून आणावी.
निष्कर्ष
निबंधाच्या शेवटचे परिच्छेद प्रभावी असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. निष्कर्षांचे परिच्छेद डौलदार भाषेत, योग्य शैलीचा वापर करून लिहावेत. एखादा संस्मरणीय विचार, चलाख ताíकक युक्तिवाद किंवा सामाजिक परिप्रेक्ष्यातील प्रश्न सोडवण्यासाठीचा कृतीक्रम या किंवा अशा मुद्दय़ांनी निबंधाचा शेवट करावा. निबंध वाचून पूर्ण झाल्यानंतर वाचणाऱ्याच्या मनात कोणती छाप असावी असे आपल्याला वाटते? त्यास धरून निष्कर्ष लिहावा.
निष्कर्षांच्या परिच्छेदामधील आधी लिहिलेले मुद्देच परत लिहिण्याने निष्कर्ष प्रभावी होत नाही. असे केल्याने निष्कर्ष एकसुरी व निष्प्रभ ठरतो. प्रभावी शेवट करण्यासाठी वरती दिलेल्या मुद्दय़ांव्यतिरिक्त विषयाचे महत्त्व पुन्हा एकदा अर्थपूर्ण शब्दांची योजना करून वाचणाऱ्याच्या लक्षात आणून दिले जाऊ शकते.
निष्कर्षांचा परिच्छेद आटोपशीर असावा.
२० ओळींपेक्षा मोठा निष्कर्ष लिहिण्याचे टाळावे. अतिशय हुशारीने तुम्ही विषयाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडत आहात, अशा भूमिकेतून निष्कर्ष लिहिला जाणे अपेक्षित आहे.
पूर्णत: नवीन संकल्पना, विचारांची साखळी या परिच्छेदात मांडू नये. परंतु असे करत असताना निबंधातील मुद्दे पुन्हा पुन्हा देण्याचे टाळावे. अशा प्रकारचा निष्कर्षांचा परिच्छेद लिहिण्यासाठी पुरेसा सराव अत्यावश्यक आहे.