फारुक नाईकवाडे
या लेखामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असे दोन ठळक टप्पे विचारात घेतले जातात. अभ्यासक्रमामध्ये यातील भारतीय राष्ट्रीय चळवळ हाच घटक समाविष्ट आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे संस्थानांचे विलीनीकरण व घटनानिर्मिती एवढी अभ्यासाची व्याप्ती असायला हवी. संयुक्त महाराष्ट्र चळवळ या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मुद्दय़ावर सन २०१६, २०१७ मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर या मुद्दय़ावर प्रश्न विचारलेले नसले तरी त्याचा आढावा घेणे फायदेशीर ठरू शकते. मुद्देनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यपूर्व इतिहास :
ब्रिटिशांची आर्थिक नीती, महत्त्वाचे चार्टर कायदे, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ.चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने या गोष्टी राष्ट्रवादाचा उदय व संघर्ष अभ्यासण्याआधी समजून घ्यायला हव्यात.
शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७चा उठाव, गांधीयुगातील शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता इ.च्या चळवळी/बंड अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल – कारणे/ पार्श्वभूमी , स्वरूप, विस्तार, वैशिष्टय़े, प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परिणाम,काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्था, ग्रामीण भारतातील उठाव यांचा आढावा टेबलमध्ये घेता येईल.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांतील स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे तुलना करून करता येईल- स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडातील नेत्यांच्या मागण्या, महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडांतील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया,
सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार यांचा पार्श्वभूमी , कारणे व परिणाम या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा.
क्रांतिकारी विचार आणि चळवळींचा उदय हा मुद्दा उदयाची पार्श्वभूमी , स्वरूप, कार्ये, ठळक विचार, घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे स्वरूप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.
गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासाव्यात. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरू झालेले वैशिष्टय़पूर्ण संघर्ष (झेंडा सत्याग्रह, जातीय सरकार इ.) यांचा अभ्यास बारकाईने करावा.
वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करता येईल. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत.
समाजसुधारकांचा अभ्यास करताना त्यांची ठळक वैयक्तिक माहिती – पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी, सोबती, स्थापन केलेल्या आणि महत्त्वाची भूमिका निभावलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र/ नियतकालिक, साहित्य, महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद आणि इतर माहिती.यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा.
स्वातंत्र्योत्तर भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास :
या विभागामध्ये घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका हा घटक राज्यव्यवस्था घटकामधून तयार होईल. याबाबतच्या सर्व मुद्दय़ांचा आढावा घ्यायला हवा.
संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका, विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत सर्वागीण अभ्यास करायला हवा. तसेच उशिरा विलीन झालेल्या संस्थानांबाबत महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्यावात.
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करताना मराठवाडा मुक्तिसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळी महत्त्वाच्या ठरतात. भाषावार प्रांतरचनेची मागणी, मराठी साहित्य संमेलने, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाची मागणी याबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे.
आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंचाहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चर्चेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा.
संदर्भ ग्रंथ
१) राज्य पाठय़पुस्तक मंडळ व ठउएफळ आठवी ते बारावीची इतिहासाची पुस्तके (जागतिक इतिहास वगळून)
२) आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर आणि बेल्हेकर, इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स व इंडीया सीन्स इंडिपेंडन्स – बिपिन चंद्र
३) महाराष्ट्राचा इतिहास – कठारे / गाठाळ
४) महाराष्ट्रातील समाजसुधारक

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History modern india indian national movement period merger post independence institutions event creation amy
First published on: 14-04-2022 at 00:07 IST