काही शोध हे अगदी अचानक, अनपेक्षितपणे लागतात. चुकून लागलेल्या अशा काही शोधांमुळे मानवी जीवन पार बदलून गेल्याचं आढळतं. या शोधांची जन्मकथा उलगडणारं पाक्षिक सदर..
‘करायला गेलो एक, अन् झालं भलतंच’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. अर्थात यातल्या ‘भलतंच’ या शब्दाचा अर्थ काहीसा नकारात्मक असतो. पण काही वेळा असंही घडतं की, आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि अचानक दुसरीच एखादी चांगली गोष्ट घडून जाते. यासंदर्भात अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर हरवलेली एखादी वस्तू शोधत असताना आपल्याला काही महिन्यांपूर्वी मिळत नसलेली दुसरी एखादी वस्तू अचानक गवसते. खरं म्हणजे ही दुसरी वस्तू आता काही आपल्याला मिळणार नाही, असं म्हणून आपण तिचा नाद सोडून दिलेला असतो. पण अचानक ती वस्तू सापडते आणि मग अनेकदा त्या आनंदात आपण मुळात कोणती वस्तू शोधण्याचा आटापिटा करत होतो हेसुद्धा विसरून जातो.
एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना अचानक दुसरीच एखादी वेगळी गोष्ट सापडावी, याला ‘सेरेंडिपिटी’ असं म्हटलं जातं. अर्थात अपघाताने किंवा अपेक्षित नसलेला हा शोध सुखद असणं ‘सेरेंडिपिटी’मध्ये अपेक्षित आहे.
‘सेरेंडिपिटी’ हा शब्द आला कुठून, असा प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे. १७५४ साली ब्रिटिश लेखक सर होरास व्हॅलपोल यांनी ध्यानीमनी नसताना लागलेल्या पण सुखद किंवा चांगल्या शोधांसाठी ‘सेरेंडिपिटी’ हा शब्द सर्वप्रथम वापरला आणि रूढ केला.
होरास व्हॅलपोल यांचं मूळ नाव होराटिओ व्हॅलपोल. ब्रिटनचे पहिले पंतप्रधान सर रॉबर्ट व्हॅलपोल यांचे ते सर्वात धाकटे चिरंजीव. होरास व्हॅलपोल हे कला व संस्कृतीच्या इतिहासाचे अभ्यासक, साहित्यिक, प्राचीन वस्तुसंग्राहक आणि इंग्लंडमधल्या ‘व्हिग’ या राजकीय पक्षाचे नेते म्हणून प्रसिद्ध होते. ते इंग्लंडच्या संसदेचे सदस्यही होते. साहित्यिकाचा िपड असलेल्या होरास व्हॅलपोल यांचा स्वत:चा छापखाना होता. त्यामुळे त्यांचं लेखन प्रकाशित होण्यास सोपं गेलं. होरास व्हॅलपोल हे आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते आणि ते म्हणजे त्यांनी लिहिलेली पत्रं. त्यांनी सुमारे चार हजार पत्रं लिहिली. इंग्रजी भाषेतून इतक्या मोठय़ा संख्येने पत्र लिहिणारे व्हॅलपोल हे एकमेव समजले जातात. त्यांची ही पत्रं म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज समजला जातो.  
२८ जानेवारी १७५४ या दिवशी होरास मान यांना लिहिलेल्या पत्रात ‘सेरेंडिपिटी’ हा शब्द कसा सुचला याचा खुलासा व्हॅलपोल यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘द थ्री प्रिन्सेस ऑफ सेरेंदीप या पíशयन परिकथेतल्या नायकांना अशा गोष्टींचा शोध लागतो की ज्यांची अपेक्षाही त्यांनी केलेली नसते. या कथेतल्या नायकांचं चातुर्य, त्यांची निर्णयक्षमता आणि अपघाताने घडलेल्या अचानक घटना यांमुळे त्यांना हे शोध लागत जातात. या कथेवरून मला ‘सेरेंडिपिटी’ हा शब्द सुचला’.
‘सेरेंदीप’ हे श्रीलंकेचे प्राचीन नाव. हे नाव कसं पडलं, याचीही गोष्ट मजेशीर आहे. त्याकाळी श्रीलंकेतील काही भूभागांवर केरळच्या, म्हणजे त्यावेळच्या चेरानाडूच्या राजांची राजवट होती. श्रीलंकेतल्या त्या भूभागांना ‘चेरांदीप’ म्हणजे ‘चेरा राज्यांची बेटं’ असं म्हणत. कालांतराने अरब लोक व्यापाराच्या निमित्ताने या ‘चेरांदीप’मध्ये आले आणि त्यांनी या शब्दाचा अपभ्रंश ‘सेरांदीब’ असा केला. पुढे ‘सेरांदीब’चं ‘सेरेंदीप’ झालं. असं म्हटलं जातं की, ‘सेरांदीब’ हा शब्द अरब व्यापाऱ्यांनी ‘सिंहलद्विपा’ (सिंहांचे निवासस्थान) या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश करून वापरात आणला.
ब्रिटिश ट्रान्सलेशन कंपनीने जून २००४ मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. इंग्रजी भाषेतले कोणते शब्द इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी अत्यंत अवघड आहेत, याचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणातून असं आढळून आलं की, नेमकेपणाने इतर भाषेत व्यक्त करण्यासाठी इंग्रजी भाषेतल्या सर्वात अडचणीच्या ठरणाऱ्या १० शब्दांपकी ‘सेरेंडिपिटी’ हा एक शब्द आहे. त्यामुळे हा शब्द अनेक भाषांमधून जसाच्या तसा वापरला जातो.
‘केवळ नशिबाने घडलेल्या घटना’ असा ‘सेरेंडिपिटी’ या शब्दाचा चुकीचा अर्थ काही वेळा अभिप्रेत धरला जातो. पण व्हॅलपोल यांना हा अर्थ अपेक्षित नव्हता. आपल्या आजूबाजूला अपघाताने किंवा अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता असण्याची गरज ‘सेरेंडिपिटी’ या शब्दातून अभिप्रेत आहे. केलेल्या कृतीतून आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि निर्णयक्षमतेच्या बळावर नवनिर्मिती करणं हे संशोधकाचं लक्षण असल्यामुळे अनेक वैज्ञानिक शोध ‘सेरेंडिपिटी’ प्रकारातले आहेत, असं म्हणता येईल.  
‘सेरेंडिपिटी’चं अतिशय सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे पेनिसिलिनचा शोध. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘सेरेंडिपिटी’ समजल्या जाणाऱ्या शोधांची यादी मोठी आहे. क्ष-किरणांचा शोध, सॅक्रीन प्रकारची साखर, मायक्रोवेव्ह ओव्हन, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिसप्लॅटिन या रसायनाचा शोध ही ‘सेरेंडिपिटी’ची काही उदाहरणं आहेत. या शोधांच्या जन्मकथा अतिशय रोचक आहेत. इतर क्षेत्रातही अशी उदाहरणं आहेत. ‘सेरेंडिपिटी’ हे पाक्षिक सदर अशाच अनपेक्षितपणे, काही वेळा अपघाताने लागलेल्या शोधांची जन्मकथा सांगणारं आहे. आपल्याला या शोधांच्या जन्मकथा वाचायला आवडतील, अशी आशा करतो.                                                            
hemantlagvankar@gmail.com