आजही मराठवाडय़ात शिक्षणाविषयीची अनास्था अनेक स्तरांवर दिसून येते. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या नकाशावर मराठवाडय़ातील युवावर्गाची छाप दिसून येते. अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात जिल्हा उपनिबंधकाच्या गुणवत्ता यादीत राज्यातून मुलींमध्ये  पहिली येण्याचा मान परभणी जिल्ह्य़ातील हादगाव या छोटय़ाशा खेडेगावातील क्रांती डोंबे यांनी संपादन केला आहे.
पाथरी या तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या हादगाव येथील क्रांती डोंबे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. घरात तीन बहिणी, आई गावातच अंगणवाडी ताई. क्रांती दोन वर्षांची असतानाच वडिलांचे निधन झाले. मात्र, क्रांतीच्या आईने मुलींच्या शिक्षणासाठी कंबर कसली. प्रसंगी लोकांकडून उसने पैसे घेऊन या मुलींना शिकवले.
क्रांतीचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. शिक्षण घेत असताना क्रीडाशिक्षक कैलास माने यांनी तिच्यातील अभ्यासूवृत्ती, चिकाटी, सभाधीटपणा हे गुण हेरले आणि तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध प्रयत्न केले. वेळोवेळी तिला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी बसण्यासाठी मार्गदर्शन करत राहिले. दहावीनंतर क्रांतीने परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ निवासी गुरुकुलात शिक्षण घेतले. या ठिकाणी तिला शिक्षकांनीच आर्थिक मदत केली. बारावीला कला शाखेतून मराठवाडय़ातून क्रांती दुसरी आली आणि परभणी येथील शासकीय अध्यापक विद्यालयातून तिने डी.एड. पूर्ण केले. मात्र तिच्यातील स्पर्धा परीक्षेला बसण्याची ऊर्मी तिला स्वस्थ बसूू देत नव्हती.
त्यासंदर्भात बोलताना क्रांती म्हणाली, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे अभ्यासासाठी गेल्यानंतर मला स्पर्धापरीक्षेचा सखोल अभ्यास कसा करावा, ते कळले.’
स्पर्धापरीक्षेचा अभ्यास कसा केला हे सांगताना ती म्हणाली, ‘कुठल्याही प्रकाशनाची भरमसाट पुस्तके वाचण्यापेक्षा मी ठराविक- महत्त्वाची पुस्तके, जास्तीत जास्त वेळा वाचली. दररोज आठ ते दहा तास सातत्याने अभ्यास केला. पहिली ते दहावीपर्यंतची पाठय़क्रमावर आधारित पुस्तके सातत्याने अभ्यासली. लोकराज्य योजना, कुरुक्षेत्र ही शासनाची मासिके नेमाने वाचून त्याची टिपणे ठेवली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करताना क्रांती म्हणाली, ‘ कधी कधी विद्यार्थ्यांना जो मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही, त्याकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. मात्र स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तो मुद्दा महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक मुद्दय़ाला सारखेच महत्त्व देऊन अभ्यास करणे उत्तम. नेमाने आपल्या अभ्यासातील उणिवा तपासणे आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न केल्याने खूप फरक पडतो. आकलनावरही विशेष भर द्यावा.’
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केवळ झापड लावून करणे चुकीचे आहे असे क्रांती सांगते. प्रत्येक मुद्दय़ाचा अर्थ समजून घेणे आणि प्रश्नपत्रिका सोडवणे महत्त्वाचे ठरते, असे क्रांतीने सांगितले.  वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय सेवेतील अधिकाऱ्याशी चर्चा केल्याने आपला आत्मविश्वास वाढला, असेही ती म्हणाली.
ग्रामीण भागातील मुलींनी स्पर्धा परीक्षेकडे जास्तीत जास्त वळावे यासंदर्भात बोलताना क्रांती म्हणाली की, ग्रामीण  भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांविषयीची माहिती व मार्गदर्शन शालेय स्तरावरच मिळणे गरजेचे आहे. शिक्षक, पालकवर्गाने विद्यार्थ्यांना प्रामुख्याने मुलींना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी उत्तेजन द्यायला हवे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. तरच आगामी वर्षांत शासकीय हुद्दय़ांवर खेडय़ातील तरुणी विराजमान होताना दिसतील. काम करताना लोकाभिमुख प्रशासनासोबतच तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे क्रांतीने नमूद केले.