एमबीए अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे पाक्षिक सदर सुरू करत आहोत. एमबीएच्या प्रवेशपरीक्षा, विविध विद्याशाखा, विषयांचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती यात प्रसिद्ध होईल.
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे द्यावी लागणारी प्रवेशपरीक्षा. प्रवेशपरीक्षा दिल्यानंतर आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढची पायरी म्हणजे आपल्या पसंतीच्या संस्थेमध्ये प्रवेश घेणे. एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश (व्यवस्थापन कोटय़ातील जागा सोडून) हे केंद्रीय पद्धतीने होत असल्यामुळे प्रवेशपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर संस्थेचा पर्याय द्यावा लागतो. म्हणजेच आपल्याला पाहिजे असलेल्या संस्था निवडून त्यांचा पर्याय द्यावा लागतो. यामध्ये प्रवेशपरीक्षेत मिळालेले गुण व संस्थेमधील उपलब्ध जागा यांचा विचार करून केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिला जातो. पहिल्या तीन क्रमांकाचे पर्याय दिलेल्या संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक असते, अन्यथा प्रवेश प्रक्रियेमधून बाद ठरवले जाते. पहिल्या तीन क्रमांकांमध्ये पसंती दिलेल्या संस्थांव्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास आणि दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश न घेतल्यास, प्रवेशप्रक्रियेमधून बाद केले जात नाही तर पुढच्या फेरीसाठी पात्र समजले जाते. उदा. एखाद्या विद्यार्थी/ विद्यार्थिनीला, प्रवेशपरीक्षेमधील गुणांप्रमाणे, त्याने/ तिने दिलेल्या पसंतीक्रमामधील पाचव्या क्रमांकावरील संस्थेमध्ये प्रवेश मिळाला आणि जर काही कारणामुळे या संस्थेमध्ये प्रवेश घेतला नाही तर प्रवेशप्रक्रियेमधून बाद न होता पुढील प्रवेश फेरीसाठी पात्र समजले जाते. म्हणजेच पसंतीक्रमामध्ये पहिल्या तीन क्रमांकातील संख्या मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य आहे. नाही तर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून बाद व्हावे लागते.
आपल्याला पाहिजे त्या संस्थेमध्ये प्रवेश हवा असल्यास पसंतीक्रम अत्यंत काळजीपूर्वक भरला पाहिजे. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या ८० टक्के केंद्रीय पद्धतीने भरल्या जातात. (याला अपवाद म्हणजे अल्पसंख्याकांच्या संस्था) उरलेल्या
२० टक्के जागा या संस्थेच्या अखत्यारीत म्हणजेच व्यवस्थापन कोटय़ामधून भरल्या जातात. अर्थात या
२० टक्क्यांसाठीसुद्धा मान्यताप्राप्त प्रवेश परीक्षेस बसणे हे आवश्यक असते. केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिल्या जाणाऱ्या जागांपैकी ७० टक्के जागा या त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. म्हणजेच एखादी संस्था पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असेल तर केंद्रीय पद्धतीमधील प्रवेश दिल्या जाणाऱ्या जागांपैकी ७० टक्के जागा या पुणे विद्यापीठातून पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. या ७० टक्के जागांपैकी ५० टक्के जागा या खुल्या गटांसाठी व ५० टक्के जागा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. ७० टक्के जागा अशा प्रकारे त्या त्या विद्यापीठांतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींसाठी आहेत. यानंतर उरलेल्या १५ टक्के जागा या इतर विद्यापीठांतील (महाराष्ट्रातील) विद्यार्थ्यांसाठी आहेत. यामध्येही ५० टक्के जागा या खुल्या गटासाठी व ५० टक्के या मागासवर्गीयांसाठी आहेत. यानंतर उरलेल्या १५ टक्के जागा या महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राखीव असतात. या जागांमध्ये मात्र मागासवर्गीयांसाठी आरक्षण नाही, कारण असे आरक्षण फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध आहे.
केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये पसंतीक्रम भरून देताना प्रत्येकाने उपलब्ध जागांची वरीलप्रमाणे नीट माहिती करून घेणे जरूर आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांशी संलग्न अशा स्वायत्त संस्थासुद्धा आहेत. या संस्था केंद्रीय प्रवेशपद्धतीमध्ये सामील असतीलच, असे नाही. या संस्थांमध्ये चालविले जाणारे एमबीए अभ्यासक्रम हे त्या त्या विद्यापीठांशी संलग्नच असतात, हे लक्षात ठेवून या संस्थांची प्रवेशप्रक्रिया समजून घेतली पाहिजे, तसेच अशी स्वायत्तता असलेल्या संस्थांमध्ये एमबीए हेच अभ्यासक्रम असले तरी त्यांचा अभ्यासक्रम हा वेगळा असू शकतो हेही लक्षात ठेवले पाहिजे.
एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी पसंतीक्रम भरताना संस्थांची निवड ही अतिशय काळजीपूर्वक केली पाहिजे. यामध्ये काही निकष लावणे जरुरीचे आहे.
एमबीएला प्रवेश हा आपल्या स्वत:च्या करिअरचा प्रश्न असल्यामुळे, हा अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांची पूर्ण माहिती मिळवणे जरुरीचे आहे. प्रत्येक संस्थेची स्वत:ची वेबसाइट आहे. या वेबसाइटवर संस्थेविषयीची पूर्ण माहिती उपलब्ध असते. यामध्ये संस्थेचे व्यवस्थापन करणारा ट्रस्ट किंवा सोसायटी, संस्थेतील प्राध्यापकवर्ग, संस्थेतील विविध उपक्रम म्हणजे परिसंवाद, कार्यशाळा वगैरे, संस्थेच्या इमारतीमधील सोयी, ग्रंथालय आदी गोष्टींचा समावेश असतो. याशिवाय विद्यापीठ परीक्षेतील निकाल, शुल्करचना यांचीही माहिती असते. ही सर्व माहिती प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने करून घ्यायला हवी. संस्थेमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृह आहे का, याचीही माहिती करून घ्यायला हवी.
एमबीएला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणारी नोकरी म्हणजेच प्लेसमेंट. प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम हा मिळणारी प्लेसमेंट हा असतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उत्तम नोकरी मिळणे हे निश्चितच आवश्यक असते. या दृष्टीने संस्थेचे रेकॉर्ड काय आहे, हेसुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे.
संस्थेची निवड करताना दोन गोष्टी या ठिकाणी सुचवाव्याशा वाटतात- त्यापैकी पहिली गोष्ट अशी की, उपलब्ध संस्थांमधल्या शक्य असतील त्या संस्थांना प्रत्यक्ष भेट देणे. जे विद्यार्थी-विद्यार्थिनी या वर्षी पदवीच्या अंतिम परीक्षेस बसणार आहेत, त्यांना परीक्षा झाल्यानंतर सुमारे दोन महिने सुटी मिळेल. या कालावधीमध्ये जर संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तर त्याचा निश्चितच उपयोग होईल. संस्थांचा पसंतीक्रम देण्यासाठी बराच कालावधी असल्यामुळे, (साधारण जूनमध्ये प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल.) संस्थांची प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य होते. अर्थात सर्वच संस्थांची पाहणी करणे शक्य नसले तरी प्रमुख शहरातील संस्थांना भेटी देणे शक्य होईल. आपल्या स्वत:च्या करिअरबद्दल जागरूक असले तर त्याचा लाभच होतो.
संस्थांच्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतात. संस्थेची इमारत कशी आहे, तिथले कर्मचारी/प्राध्यापक कशा प्रकारे प्रतिसाद देतात, ग्रंथालय कसे आहे, वसतिगृहाची सोय आहे का इ. गोष्टी स्पष्ट होतात. संस्था निवडताना ज्याप्रमाणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याचबरोबर कॉम्प्युटर लॅब, लँग्वेज लॅब याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्यक्ष भेटीमध्ये या सर्व गोष्टी स्वत: पाहता येतात. यामुळे संस्थेने वेबसाइटवर दिलेली माहिती व प्रत्यक्षातील परिस्थिती यांची तुलना
करता येते.
संस्थेची निवड करताना महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे संस्थेत सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संस्थेबद्दलचे मत. यासाठी संस्थेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांना जरूर भेटावे आणि त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. विशेषत: प्लेसमेंटविषयी काही संस्था अतिशयोक्तीची माहिती देण्याची शक्यता असते. ही माहिती, संस्थेतील विद्यार्थ्यांकडून पडताळून बघता येईल. अर्थात काही वेळा नकारात्मक माहितीसुद्धा पुढे येते. म्हणून संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनासुद्धा भेटले पाहिजे. हे सर्व प्रयत्न चांगली संस्था निवडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मुद्दाम नमूद करावेसे वाटते की ज्या संस्था अंतर्गत मार्काचे आमिष दाखवतात किंवा वर्गातील तासांना गैरहजर राहण्याची सवलत देऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, अशा संस्थांपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. एमबीए अभ्यासक्रम हा पूर्णवेळ आहे आणि त्यामुळे पूर्णवेळ अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्येच प्रवेश घेणे फायदेशीर ठरते. नोकरी करता करता किंवा अर्धवेळ करण्याचा हा अभ्यासक्रम नाही, हेही जरूर लक्षात ठेवावे.
सर्व प्रकारे काळजी घेऊनसुद्धा आपल्या पसंतीची संस्था न मिळाल्यास निराश न होता, प्रवेश घेऊन आपली पात्रता कशी वृद्धिंगत करता येईल याचा विचार करून उत्तमोत्तम प्रकारे एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. शेवटी संस्था ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्याला मदत करेल. आपणच आपली करिअर घडवली पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने आजच्या स्पर्धात्मक युगात सतत पात्रता वाढवत नेण्यास पर्याय नाही हेच खरे.                                                          
nmvechalekar@yahoo.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mba entrence exam
First published on: 10-02-2014 at 01:03 IST