मॅकगिल विद्यापीठ, कॅनडा विद्यापीठाची ओळख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅकगिल विद्यापीठ कॅनडामधील प्रमुख विद्यापीठ आहे. क्युबेक प्रांतातील मॉन्ट्रीयल या शहरात स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले तेहतिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. चौथ्या किंग जॉर्जने मान्यता दिलेल्या ‘रॉयल चार्टर’नुसार इसवी सन १८२१ साली या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. स्कॉटीश उद्योजक आणि तत्त्ववेत्ते जेम्स मॅकगिल यांच्या सन्मानार्थ या विद्यापीठास त्यांचे नाव देण्यात आले. मॅकगिल विद्यापीठ हे कॅनडामधील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. मॅकगिल विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. By work all things increase and grow हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

मॅकगिल विद्यापीठ एकूण ऐंशी एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. मॅकगिलचा मुख्य कॅम्पस हा डाऊनटाऊन मॉन्ट्रीयलमध्ये माउंट रॉयल येथे तर दुसरा कॅम्पस सेंट अ‍ॅन बेल्युव म्हणजेच मॉन्ट्रीयल आयलंड येथे आहे. मॅकगिल विद्यापीठामध्ये दीड हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास चाळीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

मॅकगिल विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण अकरा प्रमुख विभाग (फॅकल्टी अ‍ॅण्ड स्कूल्स) कार्यरत आहेत. यामध्ये शेती आणि पर्यावरण, कला, दंतवैद्यक, विज्ञान, विधी शिक्षण, संगीत, औषध अभ्यासक्रम, धार्मिक अभ्यासक्रम, व्यवस्थापन इ. प्रमुख स्कूल्सचा समावेश आहे. हे सर्व विभाग विविध संशोधन केंद्र वा संस्थांना संलग्न आहेत. बहुतांश विद्यार्थी कला, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन या विभागांमधील विषयांना प्राध्यान्य देतात. विद्यापीठातील या अकरा विभागांच्या अंतर्गत एकूण तीनशे पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम चालतात. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. ‘असोसिएशन ऑफ अमेरिकन युनिव्हर्सटिीज’ या संस्थेचे सदस्यत्व अमेरिकेतील विद्यापीठांशिवाय मोजक्या विद्यापीठांनाच मिळालेले आहे. मॅकगिल विद्यापीठ हे त्यापकी एक. त्याबरोबरच ‘ग्लोबल युनिव्हर्सटिीज लीडर्स फोरम’ आणि ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ या दोन्ही प्रथितयश जागतिक संस्थांचे सदस्यत्व मिळवणारी कॅनडात फक्त दोन विद्यापीठे आहेत. त्यातील एक आहे, टोरोन्टो विद्यापीठ आणि दुसरे मॅकगिल विद्यापीठ. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

मॅकगिल विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमांतून आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत, शॉर्ट टर्म लोन, लिमिटेड बर्सरी असिस्टन्स, कॅम्पसमधील जॉब्ज, वर्क-स्टडी प्रोग्राम इत्यादी सुविधा विद्यापीठाने पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. याशिवाय दरवर्षी विद्यापीठाचे ‘स्कॉलरशिप अ‍ॅण्ड स्टुडंट एड ऑफिस’ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मदत करण्याचे नवनवीन मार्ग शोधत असते. विद्यापीठातील पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी बहुतांश जणांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिसरात खात्रीशीर निवासाची सुविधा बहाल करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना स्टुडंट सोसायटीज, विविध क्लब्स, स्कूल असोसिएशन्स, डिपार्टमेंटल ग्रुप्स, मीडिया, अ‍ॅडव्होकेसी, इंटर्नशिप यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

संकेतस्थळ  https://www.mcgill.ca/

कॅनडामध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखांमधील अभ्यासक्रमांसाठी भारतीय विद्यार्थ्यांनी मॅकगिल विद्यापीठास निश्चितच पसंती द्यावी, असे मला वाटते. या शाखांमधील जवळपास सर्वच अभ्यासक्रम हे संशोधनपर आहेत.  पदवीधर विद्यार्थी येथे प्रत्येक सत्रात सरासरी चार ते पाच अभ्यासक्रम घेतात. सामान्यत: अभियांत्रिकीचे विद्यार्थी जास्त अभ्यासक्रम घेताना दिसतात. दररोजचे  वर्गसुद्धा अत्यंत आव्हानात्मक आहेत. उपयोजित अभ्यासक्रमाच्या रचनेमुळे परीक्षेतील प्रश्न सहसा कठीण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रेड्स राखण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. प्राध्यापकांनी दिलेल्या गृहपाठामधील बहुतांश भाग हा आपल्या कल्पनाशक्तीला बराचसा वाव देणारा असतो. विद्यापीठातील प्राध्यापकवर्ग अनुभवी असल्यामुळे त्याचा फायदा होतो.’’   – व्योम भारद्वाज, मॅकगिल विद्यापीठ.

वैशिष्टय़

मॅकगिलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रोडू यांच्यासहित दोन माजी पंतप्रधानांचा समावेश आहे. याशिवाय, कॅनडासह युरोपमधील अनेक ख्यातनाम शास्त्रज्ञ, राजकारणी, उद्योजक, न्यायाधीश, पत्रकार हे  या विद्यापीठामध्ये कधीकाळी शिक्षण घेत होते. आतापर्यंतचे एकूण १२ नोबेल पारितोषिक विजेते, पाच अंतराळवीर, १४५ ऱ्होडस पुरस्कारविजेते आणि नऊ ऑस्कर पुरस्कार विजेते विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आहेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcgill university in canada mpg
First published on: 13-08-2019 at 01:34 IST