रोहिणी शहा

राज्य शासनाच्या विविध विभागांमधील अराजपत्रित गट ब म्हणजेच दुय्यम सेवांसाठीच्या पूर्वपरीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा घटक १०० पैकी १५ गुणांसाठी विचारण्यात येतो. जे उमेदवार या घटकांमध्ये किमान नऊ ते अकरा प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात हे गुणांच्या विश्लेषणावरून लक्षात येते. त्यामुळे या मुद्यांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास चांगले गुण मिळण्याची खात्री वाढते. सराव आणि निरनिराळय़ा युक्त्या लक्षात ठेवणे ही असे प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर या घटकामध्ये अंकगणित, क्षेत्रमापन, तर्कक्षमता आणि बुद्धिमापन असे उपघटक विचारात घ्यावे लागतील. या उपघटकांमधील प्रश्नांचे परत वेगवेगळे प्रकार आहेत. प्रश्नांचे प्रकार कितीही वेगवेगळे असले तरी एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या समजल्या, की त्या सरावाने लक्षात ठेवणे सोपे होते आणि प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणाच्या आधारे या घटकाच्या तयारीसाठी पाहिले तर पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत:

बुद्धिमापन चाचणी आणि तर्कक्षमता

या घटकामध्ये आकृतीमालिका, अक्षरमालिका, व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, इनपुट आऊटपुट काऊंटिंग या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. अभाषिक तार्किक क्षमतेमधील दिशा, घडय़ाळ, दिनदर्शिका, ठोकळे यांवरील प्रश्नही या विभागात समाविष्ट होतात. भाषिक तार्किक क्षमतेमधील विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बैठकव्यवस्था, युक्तिवाद  हे मुद्दे समाविष्ट होतात.

आकृतीमालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. ठरावीक पॅटर्नमध्ये/ दिशेने/ अंशांमध्ये/ बदलणारे भाग शोधणे हा असे प्रश्न सोडविण्यासाठीचा मूलभूत टप्पा आहे.

अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.

संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती कोष्टकामध्ये भरत गेल्यास अचूक उत्तरापर्यंत पोचता येते.

सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.

इनपुट आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द/ संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.

घडय़ाळावरील प्रश्नांमध्ये दोन काटय़ांमधील कोन, आरशातील प्रतिमा आणि घडय़ाळातील वेळ मागेपुढे झाल्यावर होणारा परिणाम अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. दिनदर्शिकेमध्ये दिलेल्या तारखेस असलेला वार शोधणे हा मूलभूत प्रकार आहे. त्यासाठी पुढील वर्षी त्याच तारखेला येणारे वार बदलण्याचे सूत्र, लीप इअरचा परिणाम आणि महत्त्वाचे दिन (स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती इ.) एवढी मूलभूत माहिती असल्यास असे प्रश्न कमी वेळेत सोडविता येतात.

प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.

निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.

नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत.

बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.

युक्तिवादावरील प्रश्न सोडविण्यासाठी आकलन क्षमता आणि बारकाईने मुद्दे समजून घेण्याचे कौशल्य आवश्यक आहे. दिलेल्या युक्तिवादातील त्रुटी शोधणे किंवा त्यासाठी समर्पक उदाहरण शोधणे किंवा त्यातील मध्यवर्ती मुद्दा शोधणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

*  अंकगणित आणि क्षेत्रमापन, मोजणी

शेकडेवारी, व्याज, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ- काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.

नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच, पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

पायाभूत सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.

संख्यामालिका सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या मूलभूत गोष्टींबरोबर अंकाक्षर मालिकाही विचारण्यात येत आहेत.

भूमितीमधील घनफळ, क्षेत्रफळ, परिमिती याबाबतची सूत्रे माहीत असणे व त्यांचा विश्लेषणात्मक वापर करता येणे आवश्यक आहे.

डेटा सफिशिएन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येतात. त्यामुळे सूत्रांचा योग्य वापर करणे आणि त्याचबरोबर नेमक्या कोणत्या बाबींचे उपयोजन आवश्यक आहे त्याचा समज विकसित करणे आवश्यक आहे.

या प्रश्नांच्या सरावासाठी चौथी व सातवी स्कॉलरशिपची गाईड्स, आठवी, नववी,दहावीची, प्रज्ञा शोध परीक्षेची गाईड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा.

जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांत हा घटक समाविष्ट केलेला असतो. फरक असतो तो काठिण्य पातळी आणि अनोळखी प्रश्न विचारण्याच्या प्रमाणाचा. प्रश्नांचे वैविध्य आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो; पण यातील जास्तीत जास्त व शक्य असल्यास सगळय़ाच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप आत्मविश्वास वाढतो. सराव आणि केवळ सराव हाच या घटकासाठी एकमेव अभ्यास आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.