Mpsc mantra Human Rights and Resources Current Issues Analytical Regarding studies ysh 95 | Loksatta

एमपीएससी मंत्र : मानवी हक्क व संसाधन : अद्ययावत मुद्दे

मानवी हक्क आणि मनुष्यबळ विकास या घटकाच्या पारंपरिक व विश्लेषणात्मक अभ्यासाबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली.

एमपीएससी मंत्र : मानवी हक्क व संसाधन : अद्ययावत मुद्दे
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

फारुक नाईकवाडे

मानवी हक्क आणि मनुष्यबळ विकास या घटकाच्या पारंपरिक व विश्लेषणात्मक अभ्यासाबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या पेपरशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

मानवी हक्कविषयक मुद्दय़ांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी, निर्णय, ठराव यांचा आढावा हिंदू किंवा इतर वर्तमानपत्रातून घेता येईल. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किंवा शेरा चर्चेत असल्यास त्याची माहिती करून घ्यावी. विविध समाजघटकांबाबत घेण्यात आलेले निर्णय, नवे धोरण यांची माहिती असायला हवी.

मानव संसाधन म्हणजेच भारतातील लोकसंख्येच्या सद्य:स्थितीचा अभ्यास आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेच्या अहवालाचा विश्लेषणात्मक अभ्यास हा मानव संसाधन घटकाच्या अभ्यासाचा तांत्रिक पाया (technical base) आहे. या घटकाचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल. नागरी, ग्रामीण, वयोगट, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, बाल मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर, साक्षरता या मुद्दय़ांसाठी टेबल बनवावे. प्रत्येक मुद्दय़ांमध्ये भारतविषयक आकडेवारी व टक्केवारी, महाराष्ट्राची टक्केवारी आणि राज्यांच्या एकत्रित यादीमधील क्रमांक, महाराष्ट्राच्या तुलनेत मागे व पुढे असलेले एक-एक राज्य/ केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त आणि सर्वात कमी टक्केवारीची तीन-तीन राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची टक्केवारी यांचा समावेश करावा. यामध्ये महाराष्ट्राची जनगणना व्यवस्थित पाहाणे आवश्यक आहे. वरील मुद्दयांबाबत चर्चा केलेल्या पद्धतीनेच प्रत्येक मुद्दय़ांसाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार करून टेबल तयार करावे. शक्य झाल्यास सन २००१ च्या जनगणनेच्या अहवालातील या मुद्दय़ांचा आढावा घ्यावा. यामुळे तुलनात्मक प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होईल.

अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी सामाजिक, आर्थिक व जातिगत जनगणना (SECC) ची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. यातील आपोआप समावेशाचे आणि आपोआप वगळण्याचे (Automatic Inclusion & Automatic Exclusion) निकष आणि या दोन निकषांव्यतिरिक्त ठरविण्यात आलेले वंचिततेचे निकष माहीत करून घ्यावेत. शहरी, ग्रामीण आणि एकत्रित अशी महत्त्वाची आकडेवारी पाहायला हवी. देशाची व महाराष्ट्राची या सर्व निकषांबाबतची आकडेवारी/ टक्केवारी माहीत करून घ्यायला हवी. याबाबत तपशीलवार माहितीसाठी रएउउ चे संकेतस्थळ आणि ठळक मुद्दय़ांसाठी करंट ग्राफ वार्षिकी यांचा वापर करता येईल.

याच पायाभूत अभ्यासामध्ये दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालामधून शिक्षणविषयक आकडेवारी- पटनोंदणी, गळतीचे प्रमाण, साक्षरतेमधील लिंगसमानता याबाबतची टक्केवारी पाहायला हवी. भारत आणि महाराष्ट्र यांची तुलना, राज्यातील जिल्ह्यांची तुलना करणारे टेबल तयार करावेत. असर अहवालातील अद्ययावत आकडेवारी व कल (Trends) समजावून घ्यावेत.

 आरोग्यविषयक आकडेवारी

माता मृत्यू दर, अर्भक/ बाल मृत्यू दर, कुपोषणविषयक आकडेवारी भारत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालामधून पाहणे आवश्यक आहे. विविध साथीच्या रोगांबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर होणाऱ्या अहवालात भारताचा उल्लेख असल्यास त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच रोगमुक्त घोषित केल्या गेलेल्या देशांची माहितीही असायला हवी. पेपर ४ मधील पोषण आणि आरोग्यविषयक मुद्दय़ांची सांगड येथे घालता यायला हवी. नवीन लसीकरण मोहीम/ आरोग्य योजना तसेच नव्या उपचार/ रोगनिदान पद्धती याबाबत अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.

बेरोजगारीचे प्रमाण, कामगारांचा मागणी दर, वेगवेगळय़ा क्षेत्रांतील सेवायोजन इत्यादी गोष्टींच्या नोट्स काढणे आवश्यक आहे. याबाबत भारतातील एकूण आकडेवारी/ टक्केवारी, महाराष्ट्रातील आकडेवारी/ टक्केवारी आणि रोजगाराबाबत राज्यांची तुलना पाहायला हवी.

आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास याबाबत नव्याने लागू झालेले शासकीय नियम, धोरण यांचा नेमका अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच पेपर दोनच्या समांतरपणे मानवी हक्कांची चर्चा असलेले सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडचे निर्णय माहीत असावेत. संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्या संदर्भातील आधीच्या सहस्रक विकास उद्दिष्टांमधील मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि त्यासाठीची अभियाने, योजना यांची माहिती बारकाईने करून घ्यायला हवी.

सर्वच उपघटकांसाठीच्या शासकीय योजनांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये करता येईल. योजनेचे ध्येय, हेतू, असल्यास घोषणा, संक्षिप्त नाव, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, शिफारस करणारा आयोग/ समितीचे नाव, असल्यास आकडेवारी, मूल्यमापन इ.

वेगवेगळय़ा अशासकीय संस्थांचे (NGO) उल्लेखनीय कार्य त्या त्या वर्षीच्या पेपरमध्ये एका प्रश्नासाठी तरी विचारण्यात आलेले आहे. अशा संस्थांचे कार्य, कार्यपद्धती, कार्यक्षेत्र, असल्यास त्यांना मिळालेले पुरस्कार, असल्यास संबंधित प्रमाणित आकडेवारी (authentic figures) व इतर उल्लेखनीय माहिती असल्यास फायदा होईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2022 at 00:02 IST
Next Story
यूपीएससीची तयारी : निबंध लेखन : विषय ओळख