केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) २०२१ परीक्षेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान, एनडीए परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि पात्रतेवर आधारित निकष अद्याप जारी केलेले नाहीत. यापूर्वी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला कळवले होते की, तिन्ही दलांनी महिलांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये (एनडीए) समाविष्ट करण्यास सहमती दर्शवली आहे.

सूत्रांनुसार, परीक्षा नियोजित वेळेच्या मागे आहे आणि अधिक विलंब टाळण्यासाठी यूपीएससी लवकरच शारीरिक तंदुरुस्तीवर आधारित पात्रता निकष लागू करेल अशी सांगण्यात येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परीक्षा १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले होते की त्यांनी महिला उमेदवारांना एनडीएमध्ये नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे.

महिला उमेदवारांसाठी अर्ज २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान खुले होते. पुरुष उमेदवारांसाठी ९ जून ते २९ जून दरम्यान अर्ज करण्याची प्रक्रिया नियोजित होती. यूपीएससी एनडीए II २०२१ द्वारे एकूण ४०० पदे भरली जातील जिथे एनडीएसाठी ३७० उमेदवार निवडले जातील तर एनएसाठी 30. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर परीक्षेबद्दल अधिक तपशील तपासू शकतात.

यापूर्वी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र जारी केले असून त्यात असे म्हटले आहे की महिला उमेदवारांसाठी प्रशिक्षणाचे विविध पैलू तयार करण्याची गरज आहे. याआधी, १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने महिलांना ५ सप्टेंबर रोजी परीक्षा देण्याची परवानगी देणारा आदेश दिला होता. मात्र, नंतर ही परीक्षा १४ नोव्हेंबरपर्यंत पुनर्निर्धारित करण्यात आली आहे.