तांत्रिक लेखनाचा करिअर म्हणून कसा विचार करता येईल, याविषयी-

टेक्निकल रायटिंग’ हा शब्द अनेकांना नवा असेल. नव्याने उदयाला येणारे हे क्षेत्र आहे. आजकाल बरीच मुले अभियांत्रिकीकडे वळताना दिसतात आणि पदवीनंतर अनेक जण एमबीए करून नोकरी पत्करतात. परंतु या सगळ्यापेक्षा आणखी एका मागणी असलेल्या क्षेत्रात तुम्हाला पुढे जाता येईल. शिक्षण सुरू असतानाच जर या क्षेत्राशी ओळख करून घेतली तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यामध्ये शिरकाव करणे तुम्हांला सोपे जाईल. तसे पाहता युरोप, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये हे क्षेत्र बऱ्यापकी प्रस्थापित झालेले आहे. भारतात मात्र गेल्या काही वर्षांपासून हे क्षेत्र आकाराला येत आहे.
टेक्निकल रायटिंग हा शब्द कदाचित बोजड वाटू शकतो. साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर टेक्निकल रायटिंग म्हणजे तांत्रिक लेखन. आपण मोबाइल अथवा तत्सम कोणतीही इलेक्ट्रॉनिक गॅजेट विकत घेतले की त्यासोबत ते कसे वापरायचे याविषयी एक पुस्तिका (यूजर गाइड) आपल्याला मिळते. अशा पद्धतीच्या लेखनासाठी टेक्निकल रायटर्सची गरज असते. अभियांत्रिकी, विज्ञान तसेच इतर क्षेत्रांतील तज्ज्ञ लोक हे टेक्निकल रायटिंग करतात. मात्र, मुद्रितशोधन, संपादन आणि त्या दस्तावेजाच्या योग्य रचनेसाठी त्यांना कुशल व व्यावसायिक टेक्निकल रायटर्सची गरज भासते. टेक्निकल रायटिंग हे व्यवसायासाठी, ग्राहकांसाठी अथवा टेक्निकल गोष्टींसाठी केले जाते. म्हणजे प्रत्येक व्यवसायात एका विशिष्ट प्रकारच्या लिखाणाची आवश्यकता असते. जसे वर उल्लेखल्याप्रमाणे टेक्निकल रायटर हा सॉफ्टवेअर प्रोग्रामरकडून टेक्निकल माहिती घेऊन लोकांना समजेल असे ‘यूजर मॅन्युअल’ बनवतो. सरकारी व खासगी ऑफिसेसमध्ये अनेक प्रकारचे अहवाल, विविध लेख लिहावे लागतात. तांत्रिक माहितीचे प्रभावीपणे सादरीकरण करावे लागते. आजच्या तंत्रज्ञानाच्या चाकांवर चालणाऱ्या जगात पावलोपावली नवनवे तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगावे लागते. त्याचप्रमाणे करविषयक अर्ज, माहिती पुस्तिका अथवा अगदी लहान मुलांची खेळणी ज्यात त्या खेळाच्या जोडणीबद्दल माहिती द्यावी लागते, अशी विविध क्षेत्रे समाविष्ट आहेत. वैद्यक क्षेत्रातही अनेक लेखकांची गरज भासते. प्रत्यक्ष उत्पादन व सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना तांत्रिक माहिती समजावून सांगण्याची आवश्यकता असते.
यातील सर्वात महत्त्वाचे असे की, तंत्रविषयक लेखन करणाऱ्याला इंग्रजी भाषा चांगली ठाऊक असणे हे गरजेचे ठरते.
‘टेक्निकल रायटरला’ ‘टेक्निकल कम्युनिकेटर’देखील म्हणतात. तंत्रविषयक लेखनामध्ये दस्तावेज तयार करणे, त्याची रचना करणे व ते योग्य क्रमवारीने संगणकामध्ये सेव्ह करणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. या दस्तावेजामध्ये ऑनलाइन हेल्प, व्हाइट पेपर्स, यूजर गाइड्स, अहवाल, इन्स्टॉलेशन गाइड, उत्पादनाविषयीची माहिती, प्रकल्प योजना अशा अनेक प्रकारचे लेखन केले जाते.
ग्राहकांसाठी जेव्हा तंत्रविषयक लेखन केले जाते तेव्हा लोकांचा विचार करून त्यांना एखादी वस्तू, प्रक्रिया अथवा तत्सम गोष्टींबद्दल सोप्या शब्दांत माहिती उपलब्ध करून दिली जाते. मुळात म्हणजे आपण कोणासाठी लिहित आहोत, हे त्या तंत्रविषयक लेखकाला माहीत असणे गरजेचे असते. म्हणजे तो वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून व त्यांना पडणारे प्रश्न लक्षात घेऊन काम करू शकतो.
बऱ्याचदा असे म्हटले जाते की, टेक्निकल रायटर हा सर्वसामान्य लोक आणि तंत्रज्ञ यांच्यामधील दुवा असतो. अतिशय किचकट व कठीण माहिती तज्ज्ञांकडून समजून घेऊन ती ग्राहकांना समजेल अशा भाषेत त्याला मांडावी लागते. यात नुसते भाषांतर न करता ग्राहक कोण आहेत, त्यांच्यासाठी काय लिहायचे आहे व त्यांच्यापर्यंत काय पोहोचले पाहिजे अशा अनेक बारीक गोष्टींचा विचार त्याला करावा लागतो. हे एक विशेष ज्ञानक्षेत्र म्हणून आकाराला आले आहे.
जर प्रोजेक्ट मोठा असेल तर वेळप्रसंगी टेक्निकल रायटर्सला ग्राफिक डिझाइनर्स, कॉम्प्युटर प्रोग्रामर्ससोबतही काम करावे लागते. तेच कंपनी आणि प्रोजेक्ट दोन्ही लहान असतील तर एकटय़ा टेक्निकल रायटरला वर नमूद केलेल्या लोकांची कामेदेखील करावी लागतात. लेखनातील भाषा ही साधी, सोपी आणि सुटसुटीत वाक्यांची असावी लागते. इथे ओघवती अथवा साहित्यिक भाषा चालत नाही. अभियंत्यांसाठी हे एक उत्तम क्षेत्र आहे. कारण त्यांना त्यांच्या क्षेत्रातले ज्ञान तर असतेच व त्यांना तांत्रिक भाषादेखील ठाऊक असतात. त्यामुळे त्या फक्त योग्य आणि सुटसुटीत भाषेत इतरांपर्यंत पोहोचवल्या की झाले! टेक्निकल रायटिंगमध्ये संवाद, व्यवस्थापन, विश्लेषण, सॉफ्टवेअर टुल्स आणि कन्टेन्ट डेव्हलपमेंट अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
हे लेखन करण्याच्यादेखील काही विशिष्ट पद्धती आहेत. जसे उटर- ‘शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाइल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट मॅन्युअल ऑफ स्टाइल फॉर टेक्निकल पब्लिकेशन’ या दोन गाइडलाइन्सचा वापर केला जातो. यात डॉक्युमेंट, त्यांच्यातील माहितीची मांडणी अशा गोष्टींचा समावेश असतो.
या क्षेत्रात नेमके व कमी कालावधी लागणारे प्रशिक्षण घेऊन प्रवेश करता येतो. तंत्रज्ञानाची शैक्षणिक पाश्र्वभूमी असली तर उत्तमच, पण अनिवार्य नाही. सेवानिवृत्त इंजिनीअर्सना या क्षेत्रात सहज प्रशिक्षणाने प्रवेश करता येईल. कारण परदेशी कंपन्यांनाही अशा लेखकांची गरज भासते. आपल्याकडील अभ्यासक्रमात टेक्निकल रायटिंगचे विशेष प्रशिक्षण दिले जात नाही. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पदवी घेत असतानाच या कौशल्याचा अभ्यास करावा. प्रशिक्षण संस्थांची यादी इंटरनेटवर सर्च केल्यास मिळू शकेल. त्यातील काही संस्था म्हणजे टेकवर्ड्स, सिम्बायोसिस, इंग्लिश फाऊन्टन, कॉनफाई इ. तसेच काही कंपन्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षार्थी म्हणूनदेखील घेतात. या अभ्यासाने भाषा व एकूण संप्रेषण कौशल्य सुधारते, तसेच उत्तम कारकीर्द घडविणारे क्षेत्र सहज उपलब्ध होते.
 टेक्निकल रायटिंगमध्ये खूप संधी असून मेडिकल, आयटी, इंजिनीअिरग क्षेत्रात टेक्निकल रायटर्सची गरज खूप मोठय़ा प्रमाणावर भासते. इंजिनीअरिंगच्या कॉलेजांनी यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना वेळीच तयारी करता येईल.    
shruti.sutavani@gmail.com