सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत, ती शाळेत टिकली पाहिजेत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सातारा जिल्ह्यतल्या कुमठे विभागाच्या(बीट) शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे झपाटल्यागत काम करत आहेत. सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचं काम कसं करता येईल, हे दाखवताना बीटमधल्या ४० पैकी ४० शाळांमधल्या मुलांच्या मनात त्यांनी घर केलंय.-
राज्याच्या शिक्षण विभागात कार्यरत पर्यवेक्षकीय यंत्रणेतील काही अपवाद वगळता जवळपास सगळेच अधिकारी नेहमीच्या जंजाळात अडकलेले दिसतात. शाळा भेटीच्या वेळी विद्यार्थी-शिक्षकांचा हजेरीपट, टाचण वह्यांवर सह्या करायच्या, अभिलेखे तपासायचे, शेरेबुकात शेरा लिहून पुढे व्हायचे.. बस्स! झाली शाळा भेट!
शाळेत गेल्यावर वर्गात जाऊन तिथे काय आणि कशा पद्धतीचे कामकाज सुरू आहे? शिक्षकांच्या कामाची दिशा योग्य आहे का? मुलं नीट शिकताहेत का? काही अडचणी आहेत? आणखीन बरेच काही.. याबाबत बहुतांश अधिकारी फारसे ‘जागरूक’ दिसत नाहीत, असेच अनिच्छेनं म्हणावं लागतं. समजा, याविषयी विचारलंच तर शाळेच्या अन् मुलांच्या अंतरंगात डोकवायला वेळ कुठंय, असा प्रतिप्रश्न विचारला जातो.
सातारा जिल्ह्यातल्या कुमठे विभागाच्या(बीट) शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे मात्र याला पूर्णपणे अपवाद आहेत. सहा वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यावर भराडे मॅडमनी प्रशासकीय कार्यभार स्वीकारला. सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत, ती शाळेत टिकली पाहिजेत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी झपाटल्यागत काम करणाऱ्या भराडे मॅडम यांनी सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचं काम करून दाखवलंय. बीटमधल्या ४० पैकी ४० शाळांमधल्या मुलांच्या मनात यांनी घर केलंय. सर्वच शाळांतली जवळपास सगळी मुलं त्यांना ‘भराडे मॅडम’ असं नावानं ओळखतात! यादेखील मुलांना नाव घेऊन हाक मारतात! एखादी अधिकारी व्यक्ती मुलांना थेटच नावानं हाक मारते, हे शिक्षण क्षेत्रातलं दुर्मिळ उदाहरण असावं! हे सहजासहजी होत नाही. या बीटचे खास वैशिष्टय़ म्हणजे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, मुलं, पालक आणि निरनिराळे समाजघटक असे सगळेजण मत्रीच्या रेशीम धाग्याने बांधले गेलेत. एकमेकांशी एकरूप झालेत. एक शैक्षणिक कुटुंब असं याचं नेमकं वर्णन करता येईल.
भराडे यांच्या बीटमध्ये एकूण शाळा आहेत ४०. तिथं राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची संख्या आहे तब्बल ६६! उपक्रम असे की, मुलांना सर्वागाने समृद्ध करणारे. याचे कारण जे करायचं ते कोणासाठी, काय करायचं, नेमकं कसं करायचं, याची स्पष्टता इथे काम करणाऱ्या प्रत्येकाकडे आहे. २००३ साली भराडे यांनी कुमठे बीटचा पदभार स्वीकारला. खरं तर काही ‘वेगळं’ करायचं, असं त्यांच्या डोक्यात अजिबात नव्हतं. जे काम करतो ते तळमळीनं, जिद्दीनं, चिकाटीनं आणि प्रामाणिकपणे करायचं असा त्यांचा स्वभाव आणि जोडीला धडपडी वृत्ती. पदभार स्वीकारल्यावर शाळा आणि मुलांना समृद्ध करण्यासाठी काय करता येईल, असा विचार त्यांच्या मनात सुरू होता. ‘आजचं शिक्षण आयुष्यातले आíथक प्रश्न सोडवत नाही,’ असा शिक्षण पद्धतीवर मुख्य आक्षेप घेतला जातो. याबाबत काय करता येईल, यावर त्यांचे चिंतन सुरू असताना शाळेत शेती सुरू करण्याचं त्यांनी मनाशी ठरवलं. पण यातली मुख्य अडचण होती, ती म्हणजे शेती आणणार कोठून आणि कशी? प्रत्येक शाळेला भेट द्यायची, शिक्षकांना मनोदय सांगायचा, गावकऱ्यांशी चर्चा करायची. मार्ग निघतो का बघायचं, असं सुरू असताना बघता बघता प्रत्येक शाळेला एक गुंठय़ापासून पाच गुंठय़ांपर्यंत शेती मिळाली! तीदेखील लोकांच्या सहभागातून. या गोष्टीची परिसरात चर्चा सुरू झाली. सामाजिक कार्यकर्त्यां शैला दाभोळकर यांच्या कानावर ही चर्चा गेली. या कामी त्यांनी सहकार्य देऊ केलं. मिळालेली जमीन काळी कसदार, सुपीक होती, असं काही नव्हतं. खडकाळ, माळरान, नापीक जमिनी ताब्यात घेतल्या. पण ‘जिथे राबतो हात तेथे हरी..’ म्हणतात ना.. मुलं राबू लागली. श्रमप्रतिष्ठा हे भाषण देऊन गळी उतरविण्याचं मूल्य नाही! ते प्रत्यक्ष काम करून अनुभव घेऊन अंगी बनवायचं असतं, हा धडा गिरवत शेण-मलमूत्र-काडी-कचरा, तंबाखू, कडु निंब अशा वनस्पतींचा पाला वापरून नसíगक पद्धतीनं जमिनी लागवडीखाली आणल्या. उजाड, ओसाड माळरानावर तीन महिन्यांत हिरवी पिकं दिमाखानं डोलू लागली. पिकविलेल्या भाजीपाल्याचा वापर मध्यान्ह भोजनासाठी सुरू झाला. याचा आणखी एक परिणाम असा झाला की, मुलं घरीदेखील सेंद्रिय शेतीचा आग्रह धरू लागली. त्याचे फायदे-तोटे पटवून सांगू लागली. मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातल्या विश्वजीत सूर्यवंशी नावाच्या सहावीतल्या मुलानं घराभोवतीची पडीक जमीन स्वत:च्या हिमतीवर तयार करायला घेतली. तेव्हा ‘शिकायचं सोडून हे काय खूळ घुसलंय पोराच्या डोसक्यात?’ असं म्हणणारे आई-वडील मुलानं कष्टानं तयार केलेल्या शेतीत आज खपताहेत. उत्त्पन्न घेताहेत. त्यांच्या प्रपंचाला याचा मोठा हातभार लागतोय!
२००४ मध्ये सर्व शाळांमधल्या तब्बल चार हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. दृष्टिदोष आढळलेल्या एक हजार मुलांना चष्मे दिले. त्यात ३० मुलांना डोळ्यांचे गंभीर आजार असल्याचं निष्पन्न झालं. या मुलांच्या डोळ्यांवर पुण्यात शस्त्रक्रिया केल्या. मुलांना नवी दृष्टी मिळाली. शिक्षकांची बांधीलकी उरली नसल्याची टीका आज शिक्षकांवर होतेय. इथल्या मुलांना तिकडं न्यायला आणायला शिक्षकांनी स्वत:च्या गाडय़ा दिल्या होत्या. सामाजिक कार्यकत्रे गनीभाई यांच्या मदतीनं हे सर्व करता आलं. इतर काही आजार झालेल्या मुलांना तपासणी आणि उपचारासाठी डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी उपचार केले. परंतु मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठं असल्याने आजारांची गुंतागुंत वाढत असल्याचं सांगितलं. मग कुपोषण निर्मूलनाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यासाठी अर्थातच तज्ज्ञांची मदत घेतली. जे घटक कमी पडतात, ते ज्यातून मिळतात अशा भाज्या शेतीत पिकवायच्या. शाळेतच शिजवायच्या. दुपारच्या जेवणात खाऊ घालायच्या, असा हा कार्यक्रम. अजून काही गोळ्या, औषधे दिली. कुपोषण बऱ्यापकी आटोक्यात आलंय.
मुलांच्या भावविश्वात डोकावल्यावर काही मुलांचं विश्व पूर्णपणे पोखरलेलं असल्याचं भराडे मॅडमच्या तरल आणि संवेदनशील नजरेतून सुटलं नाही. कोणाला आई-वडील नाहीत. कोणाला आजारांनी ग्रासलेलं. कोणाला घराची मंडळी मजुरीला पाठवतेय, म्हणून शाळेत येणे शक्य होत नाहीये. कोणाला लिहिता येत नाहीये. कोणाला वाचता येत नाहीये. कोणाला निबंध लिहिता येत नाहीये. कोणाचे अक्षर चांगले येत नाहीये. कुणाला नापास होण्याची भीती सतावतेय.. जेवढी मुलं तेवढे प्रश्न! आतून बाहेर हलवून सोडणारे.. अस्वस्थ करणारे.. मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांना ‘समजून’ घेणं सुरू झालं. सर्व मुलांचा बुद्धय़ांक तपासला. संपादन करण्याची पातळी कमी असलेल्या मुलावर सक्ती केली जात नाही. ते जिथं रमतील तिथं रमण्याचं स्वातंत्र्य त्यांना असतं.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचे संदर्भ बदलताहेत. नवे प्रवाह येताहेत. रचनावाद परवलीचा शब्द बनलाय. भराडे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पहिलीपासून ज्ञानरचनावादी पद्धतीनं संपूर्ण कामकाज सुरू केलंय. म्हणजे असं की, शिक्षकांनी ‘शिकवायचं’ नाही. मुलांना ‘शिकण्या’स मदत करायची! सुलभकाच्या भूमिकेत शिक्षक दिसू लागलेत. हे खरंच अवघड काम होतं. शाळेत बाजार भरवला जातोय. पहिलीची मुलं विक्रेते असतात. शाळेत पिकवलेला भाजीपाला विकायला आणतात. मोठी मुलं लहानग्यांना मदत करतात. सारे गावकरी ग्राहक! पालक काहीतरी खरेदी करताना कौतुकभरल्या नजरेनं सगळं पाहात असतात. २० रुपयांपर्यंतचा व्यवहार ही मुलं इतक्या लहान वयात आत्मविश्वासाने करताहेत. २०० रुपयांपासून एक हजारांपर्यंत ‘उलाढाल’ बाजारात होते. गणिती क्रिया, व्यवहारज्ञानासोबत आपली बाजू सामोरच्याला पटवून देणं, नम्रतेनं वागणं, माणुसकी, संवेदनशीलता असं बरंचसं ‘शिक्षण’ इथं अनुभवातून होतंय! आलेल्या पशांतून गरजू मुलांना मदत केली जाते. कोणी लेझीम पथकाचा गणवेश घेतला तर कोणी आणखीन काही. ‘पीपल्स अॅक्शन फॉर लाइफ सेव्हिंग’ या उपक्रमात मुलं खाऊच्या पशातून बचत करून त्यातून एखाद्या गरजू मुलाला मदत करतात. इथं संबंध सहानुभूतीशी येतो. सांगून-शिकवून किंवा उधार, उसनवार ही सहानुभूती आणता येत नाही! ‘वही वाचवा’सारख्या उपक्रमातून एका २०० पानी वहीत २० पाने वाचतात. दर दहा वह्यांमागे एक वही वाचते! पर्यावरणासारख्या विषयावर निबंधलेखन आणि भाषण स्पर्धा घेण्यापेक्षा तोच विचार बालमनावर असा कृतीतून बिंबबवला जातोय.
दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जातो. विशेषत सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाबाबत आढावा आणि नियोजन होतं. यश-अपयश बघून पुढचे पाऊल टाकलं जातं. मात्र जीव लावलेल्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या की, भराडे यांना खूप वाईट वाटतं. रुजवलेलं विरजण बाजूला जातं. नवीन शिक्षकाला सगळा प्रकल्प समजायला, जुळवून घ्यायला बराच वेळ जातो. हे काम काही एकाएकी उभे राहिलेले नाहीये. उपक्रम आखायचे. यशस्वीरीत्या राबवायचे. शिक्षकांना विश्वासात घेतलं की, त्यांना काम लादल्यासारखं वाटत नाही. ‘प्रेम दिलं, प्रेरणा दिली की प्रेम आपोआप मिळतं. जे पेराल, तेच उगवतं ना!’ असे त्या सांगतात. ‘कधी काही मनाविरुद्ध घडलं, अपयश आलं तर निराशा येत नाही का?’ यावर त्या म्हणतात, ‘आम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे, काही झालं तरी थकायचं नाही. थांबायचं नाही. निराश व्हायचं नाही. हिरमोड होऊ द्यायचा नाही. जे करायचं ते मन लावून. काम आपोआप उभं राहत नाही. त्यासाठी खस्ता खाव्या लागतात. गावोगावी प्रभाव असलेल्या व्यक्ती, सामाजिक कार्यकत्रे यांची अनमोल मदत, शिक्षकांची खंबीर साथ, पालक-मुलांचा उत्साहवर्धक प्रतिसाद, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठींबा यामुळे इथपर्यंत पोचता आलं, असं सांगत मदत करणाऱ्यांविषयी त्या कृतज्ञता व्यक्त करतात.
‘मला एकटीला हे शक्यच नव्हतं,’ असं त्या प्रांजळपणानं कबूल करतात. असं असलं म्हणून त्यांच्या कामाचं महत्त्व तसूभरही कमी होत नाही. राज्याच्या ग्रामीण भागात शिक्षण पुढे नेण्यासाठी झटणाऱ्या बोटांवर मोजण्याइतक्याच स्त्रिया आहेत. प्रतिभा भराडे त्या स्त्रियांच्या साखळीतली एक महत्त्वाची कडी आहेत, एखाद्या अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन काम केलं तर काय घडू शकतं, याचा आदर्श वस्तुपाठ आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
नवनिर्माणाचे शिलेदार:चौकटीत राहून चौकटीबाहेरचं काम
सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत, ती शाळेत टिकली पाहिजेत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सातारा जिल्ह्यतल्या कुमठे विभागाच्या(बीट) शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे झपाटल्यागत काम करत आहेत. सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचं काम कसं करता येईल, हे दाखवताना बीटमधल्या ४० पैकी ४० शाळांमधल्या मुलांच्या मनात त्यांनी घर केलंय.-

First published on: 25-11-2012 at 09:53 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Out of constitutional work within constitution